Facebook Games stealing Data : तुम्ही जर फेसबुकवर अॅक्टिव्ह असाल, तर तुमच्या मित्रयादीतील कित्येकांनी आपले 'एआय'ने तयार केलेले फोटो पोस्ट केल्याचं तुम्ही पाहिलं असेल. कदाचित तुम्ही देखील 'माय पझल्स' सारख्या एखाद्या लिंकवर क्लिक करुन स्वतःचा एआय फोटो तयार करुन तो शेअर केला असेल. मात्र, असं करण्यामागचा धोका तुम्हाला माहिती आहे का?
फेसबुक, इन्स्टाग्राम असे अॅप्स आपला डेटा चोरुन विकतात हे तुम्ही ऐकलं असेलच. मार्क झुकरबर्गला यासाठी कोर्टात देखील खेचण्यात आलं होतं. मात्र, कंपनीच्या मालकांना यासाठी जबाबदार ठरवण्यापूर्वी आपण किती जबाबदारीने सोशल मीडिया वापरतो हे पाहणं देखील गरजेचं आहे. तुमचा डेटा कसा चोरी होऊ शकतो, आणि त्यासाठी तुम्हीच कसे जबाबदार ठरू शकता हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सध्याच्या एआय-फोटोंच्या ट्रेंडबाबतच बघूया. तुमच्या मित्रयादीतील एखादी व्यक्ती जेव्हा स्वतःचा एआय एडिटेड फोटो शेअर करते, तेव्हा त्यासोबत फेसबुकवरील ज्या अॅपचा वापर करुन हे करण्यात आलं, त्याची लिंकही शेअर होते. अधिकाधिक लोकांनी आपलं अॅप वापरावं यासाठी त्या कंपनीने केलेली ही ट्रिक असते. समोरच्या व्यक्तीचा एआय फोटो पाहून आपणही ते ट्राय करावं असं आपल्याला वाटतं, आणि आपण या लिंकवर क्लिक करतो.
यानंतर ती लिंक ओपन होऊन 'प्ले ऑन फेसबुक' हे बटण समोर दिसतं. मात्र, त्यावरती अगदी छोट्या अक्षरांमध्ये असं लिहिलेलं दिसेल, की क्लिक केल्यानंतर 'My Puzzle' कंपनीकडे तुमचा फोटो आणि नाव जाईल. म्हणजेच, हा डेटा त्यांच्याकडे सेव्ह राहील. केवळ हे एकच अॅप नाही, तर आणखीही असे बरेच पझल्स आणि गेम्स असतात, ज्यामध्ये आपला डेटा आपण स्वखुशीने त्यांच्या हवाली करतो.
तुम्हाला कसा जोडीदार मिळेल?, तुम्ही कशा व्यक्ती आहात?, तुमच्यावर किती जण प्रेम करतात? अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या गेम्सही तुम्ही सोशल मीडियावर पाहिल्या असतील. या सर्व गेम्समध्ये सहभागी होताना तुम्हाला बरेच प्रश्न विचारले जातात. तुमचं नाव, जन्मतारीख, जन्मस्थान (गाव), तुमच्या पाळीव प्राण्याचं नाव, तुम्हाला काय आवडतं, कोणती गाणी आवडतात इत्यादी इत्यादी.
एवढंच नाही, तर तुमचे फोटो, प्रोफाईवरील माहिती, ईमेल आणि मित्रयादी यांचा अॅक्सेसही हे अॅप्स मागतात. केवळ मज्जा म्हणून कित्येक लोक ही माहिती भरुन, अशा अॅप्सना हवी ती परवानगी देऊन टाकतो. माय पझल्स हे इथे केवळ एक उदाहरण आहे. असे कित्येक अॅप्स सध्या फेसबुकवर आहेत.
काही जणांना वाटू शकतं, की माझी प्रोफाईल तर अशीही पब्लिक आहे तर मग मला वेगळा काय धोका असेल? मात्र इथेच खरी गोम आहे. कित्येक वेळा या क्विझमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न हे अगदी साधे वाटणारे असले तरी महत्त्वाचे असतात. जेव्हा तुम्ही एखादं ई-मेल अकाउंट सुरू करता, किंवा एखाद्या वेबसाईटवर साईन-अप करता; तेव्हा पासवर्ड विसरल्यास सिक्युरिटी म्हणून काही प्रश्न तुम्हाला विचारले जातात. यामध्ये तुमच्या गावाचं नाव, आवडतं पुस्तक अशा गोष्टींचा समावेश असतो. फेसबुकवरचे हे क्विझ देखील अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारतात.
केवळ एवढाच धोका नाही. कित्येक गेम्सना तुम्ही आपल्या मित्रयादीचा अॅक्सेस देता. यामुळे तुमच्या नावाने, किंवा तुमच्या फोटोचा वापर करून तुमच्या मित्रयादीतील लोकांना मेसेज केले जाऊ शकतात.
सध्या सगळीकडे डीपफेकची चर्चा सुरू आहे. तंत्रज्ञान एवढं पुढे गेलं आहे की एखाद्या फोटोमधील व्यक्तीच्या ओठांची हालचाल करुन तिचा काही बोलतानाचा व्हिडिओही तयार करता येऊ शकतो. शिवाय बॉलिवूड अभिनेत्रींचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार केलं जाण्याचं प्रकरण देखील ताजंच आहे. तुमच्या फोटोंचा देखील असाच गैरवापर करुन तुम्हाला ब्लॅकमेल केलं जाऊ शकतं.
फोमो टाळा : FOMO, म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट. सगळेच एखादी गोष्ट करत आहेत म्हणून आपण करणं नेहमीच गरजेचं नसतं. त्यामुळे सगळेच एखाद्या ट्रेंडमध्ये सहभागी होतात म्हणून त्यात उडी घेणं टाळा.
गांभीर्य ओळखा : डेटा चोरी होणं आणि त्याचा गैरवापर होणं ही दुर्लक्ष करण्याची गोष्ट नाही. 'माझा असा काय डेटा चोरणार' हा विचार करणं सोडा. अगदी छोट्यातील छोटी गोष्टही तुमचं मोठं नुकसान करु शकते.
फाईन प्रिंट वाचा : अशा एखाद्या गेम किंवा पझलवर क्लिक करताना, त्याबाबत दिलेली माहिती नीट वाचून घ्या. गरजेपेक्षा जास्त माहिती अॅक्सेस करण्याची परवानगी ते अॅप मागत असेल, तर पुढे जाणं टाळा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.