जीवसृष्टीचे आजचे अस्तित्व आणि उद्याचे भविष्यही सूर्याचे देणे आहे. त्याच्या अभ्यासासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी एका स्वदेशी सौरवेधशाळेचे स्वप्न पाहिले. दशकभराच्या पराकाष्ठेनंतर आदित्य एल-१च्या उड्डाणाने ते प्रत्यक्षात उतरले. पुण्याच्या आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्राच्या (आयुका) प्रा.ए.एन रामप्रकाश व प्रा. दुर्गेश त्रिपाठी यांनी या मोहिमेत नेतृत्व केले असून, त्यांच्याशी साधलेला संवाद.
- सम्राट कदम
प्रश्न : ‘आदित्य-एल१’चा आजवरचा प्रवास कसा होता?
प्रा. रामप्रकाश ः सूर्याच्या अभ्यासासाठी १०१२-१३ मध्ये आदित्य मोहिमेची मांडणी करण्यात आली. खरं तर सुरवातीला पृथ्वीभोवतीच सुमारे ८०० किलोमीटर अंतरावर ही वेधशाळा स्थापित करण्याचा विचार होता.
‘लो अर्थ ऑर्बिट’मधील या मोहिमेमध्ये फक्त एकाच उपकरणाचा विचार करण्यात आला होता. कालांतराने देशभरातील शास्त्रज्ञांनी यात आपले योगदान देण्यास सुरवात केली आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या मदतीने १५ लाख किलोमीटरवरील एल १ या ठिकाणी आदित्य वेधशाळा पोचविण्याचे ठरले.
मोहिमेची व्याप्ती वाढली तशी यातील उपकरणांची संख्याही वाढू लागली. सौम्य आणि तीव्र क्ष किरणे, अतिनील किरण, दृष्य किरणे, डिस्क इमेजिंग आणि प्रभामंडळाच्या अभ्यासाचाही यात समावेश झाला. अमेरिका आणि युरोपच्या सौर मोहिमांच्या तुलनेत अधिक समावेशक असलेली आजची आदित्य-एल१ मोहीम अस्तित्वात आली.
मोहिमेची मांडणी एक दशकापूर्वी झाली, उड्डाणासाठी हाच कालावधी का निवडला?
प्रा. रामप्रकाश : २०१२-१३ पासून ते आजवरचा प्रवास निश्चितच सहज सोपा नव्हता. पण आज आदित्य-एल१ पृथ्वीपासून सूर्याच्या दिशेने १५ लाख किलोमीटर प्रवासावर निघाले आहे. आदित्य सौरवेधशाळेला स्थापित करण्यासाठी एल१ या गुरुत्वाकर्षण नसलेल्या जागेची निवड आपण केली आहे. तसेच सध्या सूर्यावर सर्वाधिक सौरस्फोट किंवा वादळे निर्माण होत आहे.
ज्याला शास्त्रीय भाषेत सौरचक्राचा परमोच्च बिंदू असे म्हटले जाते. साधारणतः पृथ्वीवरील ११ वर्ष एवढा कालावधी हा एका सौरचक्रासाठी असतो. आपली आदित्य वेधशाळा बरोबर या संपूर्ण चक्राच्या अभ्यासासाठी तेथे वेळेवर दाखल झाली आहे. पुढील ५ ते दहा वर्ष या सौरचक्राचा आपल्याला इत्थंभूत अभ्यास करता येईल.
नासा आणि युरोपीय अवकाश संस्थांनीही सौर मोहिमा केल्या आहेत. आपल्या ‘आदित्य-एल१’चे वेगळेपण काय?
प्रा. दुर्गेश त्रिपाठी : अवकाशात जाऊन सूर्याचा अभ्यास करण्याची पद्धत साधारणतः १९७० च्या दशकात सुरू झाली. त्यावेळी पृथ्वीभोवती फिरणाऱ्या आणि सूर्याचे निरीक्षण करणारे उपग्रह सोडले जायचे. पण त्यात एक कमतरता होती. उपग्रह जेव्हा सूर्याच्या विरुद्ध दिशेला म्हणजेच पृथ्वीच्या आड असायचा तेव्हा त्याची निरीक्षणे घेणे शक्य नसायचे.
अशी १२ तासांच्या कालावधीतील निरीक्षणे शक्य होत नसे. म्हणून शास्त्रज्ञांनी पृथ्वी आणि सूर्याचे गुरुत्वाकर्षण जेथे शून्य होते. अशा लँगरेंज म्हणजेच एल १ या अवकाशातील ठिकाणाची निवड केली. म्हणजे या ठिकाणी ठेवलेली कोणतीही वस्तू पृथ्वीप्रमाणेच सूर्याच्या प्रदक्षिणा मारेल. तसेच २४ तास सूर्यावर नजर ठेऊ शकते.
आतापर्यंत अमेरिकेची नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीने सोहो नावाची सौर वेधशाळा या ठिकाणावर पाठवली आहे. जिची तुलना आपण आदित्य- एल १ सोबत करू शकतो. सूर्याच्या प्रभामंडळाबरोबरच चुंबकीय क्षेत्राचाही याद्वारे अभ्यास केला जातो. आपला आदित्य याच्या एक पाऊल पुढे असून, आंतरग्रहीय चुंबकीय क्षेत्राचाही अभ्यास करेल. त्याचबरोबरच सूर्यातून उत्सर्जित होणारे प्रभारीत कण, सौरवादळे यांचा अभ्यास आदित्य करणार आहे.
आयुकाचे ‘आदित्य-एल १’ मधील योगदान काय?
प्रा. दुर्गेश त्रिपाठी : सौर वेधशाळेची संकल्पना आणि सुरवातीचे बीजे आयुकामध्येच रुजली होती. इस्रोनेच प्रक्षेपित केलेल्या ॲस्ट्रोसॅट या सौर वेधशाळेच्या निर्मितीत आयुकातच झाली. आता आदित्य- एल १ मधील सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप (सूट) ची निर्मिती आयुकाने केली आहे. ज्याद्वारे सूर्याच्या वेगवेगळ्या प्रतिमा मिळविल्या जातील.
सुमारे २०० ते ४०० नॅनोमीटर वारंवारितेच्या किरणांचा ११ फिल्टर्सद्वारे अभ्यास होईल. जे आजपर्यंत कोणत्याच सौरवेधशाळेने टिपले नाही. प्रत्येक उंचीवरील प्रभामंडळ तेथील ऊर्जा, वस्तुमान आणि पूर्णतः नवे विज्ञान लोकांसमोर येईल.
‘आदित्य-एल १’ चा सर्वसामान्यांना काय फायदा?
प्रा. दुर्गेश त्रिपाठी : सूर्याचा थेट परिणाम हा जीवसृष्टीवर होतो. त्यामुळे त्याचा अभ्यास करणे आणि वर्तन समजून घेणे एकप्रकारे आपले कर्तव्यच आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे सूर्यावर मोठे स्फोट होतात.
त्यातून निर्माण झालेली सौरवादळे थेट पृथ्वीच्या अवकाशावर तेथील उपग्रहांवर परिणाम करतात. आपण सूर्याचा अभ्यास केला तर वेळेच्या आधीच या संभाव्य धोक्याची पूर्वसूचना मिळेल आणि आवश्यक त्या उपाययोजना करता येतील. सध्या मानवी जीवन उपग्रहांवर अवलंबून आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.