general leslie groves and robert oppenheimer google
विज्ञान-तंत्र

oppenheimer : अणुच्या अंतरंगात ओपनहायमर

नोलनच्या नव्या सिनेमाने अणुबॉम्बचे जनक ज्युलिअस रॉबर्ट ओपनहायमर आणि भगवदगीता या दोन्ही गोष्टी एकदम चर्चेत आणल्या. पण एक प्रश्न पडतो की, भगवदगीता समजून घेताना हा शास्त्रज्ञ कुठे कमी तर पडला नाही ना...

स्वाती केतकर-पंडित

रवींद्र मिराशी

'अणुबॉम्बचे जनक' म्हणून अमेरिकेचे थोर भौतिकशास्त्रज्ञ ज्युलियस रॉबर्ट ओपनहायमर यांची ओळख जगाला आहे.

६ आणि ९ ऑगस्ट रोजी हिरोशिमा आणि नागासाकी घटनेची आठवण येतेच. ओपनहायमर यांनी त्यांच्या दोन यशस्वी प्रसंगात भगवद्गीतेतील दोन श्लोकांचा आधार घेतला.

मात्र शेवटी एक प्रश्न पडतो. एवढ्या मोठ्या शास्त्रज्ञाची आणि भगवद्गीता अभ्यासकाची भगवद्गीता आकलनामध्ये चूक तर झाली नसेल ना

अणूचा शोध प्रथम महर्षी कणाद यांनी इ.स. पूर्व सुमारे पाचशे वर्ष लावला असे मानले जाते. याच कालावधीच्या दरम्यान ग्रीक तत्ववेत्ता डेमोक्रिटस याने अणूचा शोध लावला, असे पाश्चिमात्य लोक मानतात.

महर्षी कणाद आणि डेमोक्रेटिस यांच्या नंतर खूप वर्षांनी म्हणजे १८०३ मध्ये ब्रिटिश शास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांनी अणू सिद्धांत प्रथम मांडला.

अणूच्या केंद्रकाभोवती एक कण वेगाने घिरटया घालत असतो. जसे चंद्र पृथ्वी भोवती फिरतो. या कणाचा शोध ब्रिटिश भौतिक शास्त्रज्ञ जोसेफ थॉमसन यांनी १८९७ मध्ये लावला.

जो कण सर्वांना इलेक्ट्रॉन म्हणून परिचित आहे. हा ऋणभारांकित असतो.

ज्यांना न्यूक्लिअर फिजिक्स मधील पितामह म्हटले जाते, ते ब्रिटिश भौतिक शास्त्रज्ञ अर्नेस्ट रुदरफोर्ड हे देखील थॉमसन यांचे नोबेल पुरस्कार प्राप्त विद्यार्थी.

रुदरफोर्ड यांनी १९२० मध्ये अणूचा उपकण प्रोटॉनचा शोध लावला. जो धनभारांकित असतो. रुदरफोर्ड यांचा विद्यार्थी ब्रिटिश भौतिक शास्त्रज्ञ सर जेम्स चॅडविक यांनी १९३२ मध्ये न्यूट्रॉनचा शोध लावला.

न्यूट्रॉन वर कोणताही विद्युत भार नसतो. या शोधासाठीच त्यांना १९३५ मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला. यामध्ये अजून एका व्यक्तीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. ती व्यक्ती म्हणजे डेन्मार्कचे थोर भौतिक शास्त्रज्ञ नील्स बोहर.

अणूमधील प्रोटॉनच्या संख्येत बदल घडवून आणल्याशिवाय नवीन मूलद्रव्य तयार होत नाही, एवढे ढोबळ मानाने लक्षात ठेवले तरी चालू शकते.

सर जेम्स चॅडविक यांनी १९३२ मध्ये न्यूट्रॉनचा शोध लावला, आणि थोर इटालियन भौतिक शास्त्रज्ञ एन्रिको फर्मी यांच्या संशोधनाला गती प्राप्त झाली.

तेंव्हा युरेनियम हे मूलद्रव्य सर्वाधिक अणुवस्तुमान असलेला पदार्थ होता. युरेनियम- २३८ चा अणुक्रमांक ९२ (न्यूट्रॉन १४६), युरेनियम- २३५ (न्यूट्रॉन १४३).

जर्मन रसायन शास्त्रज्ञ मार्टिन क्लॅपरॉथ यांनी १७८९ मध्ये युरेनियम या नवीन मूलद्रव्याचा शोध लावला.

फर्मी यांनी युरेनियम वर न्यूट्रॉनचा मारा करून, युरेनियम पेक्षा अधिक वस्तुमान असलेला अणू निर्माण केला. आणि अणू संशोधनाला एक वेगळी दिशा प्राप्त झाली.

मात्र त्यांना अणू विखंडनाची शक्यता कदापी मान्य नव्हती.

फर्मी रोम मध्ये संशोधन करत असताना, इटलीचा हुकूमशहा मुसोलिनी होता. त्यातच फर्मी यांची पत्नी ज्यू होती. १९३८ मध्ये फर्मी नोबेल पुरस्कार प्राप्त करण्याच्या निमित्ताने इटलीतून बाहेर पडले.

स्टॉकहोम येथे पुरस्कार प्राप्त करून फर्मी यांनी थेट अमेरिका गाठली, आणि कोलंबिया विश्वविद्यालयात चांगल्या पदावर रुजू झाले.

याच कालखंडात दोन जर्मन रसायन शास्त्रज्ञ ओट्टो हान आणि त्यांचे सहकारी फ्रेडरिक स्ट्रासमन यांच्या सहित ऑस्ट्रियन भौतिक शास्त्रज्ञ लाइस मेटनर अशी ही त्रयी युरेनियम वर न्यूट्रॉनचा मारा करण्याचे प्रयोग करतच होती.

या तिघांनी युरेनियम पेक्षा अधिक वस्तुमान असणाऱ्या अणूची मूलद्रव्ये शोधली देखील. या प्रयोगात चांगले यश येत असताना मेटनर यांना पुढील प्रयोगात साथ देता आली नाही.

कारण त्या देखील जन्माने ज्यू होत्या. १९३३ मध्ये हिटलर सत्तेत आला, आणि संशोधनाची गणिते बदलली. मेटनर या जर्मनी मधील भौतिक शास्त्राच्या पहिल्या महिला प्राध्यापक. १३ जुलै १९३८ रोजी डच शास्त्रज्ञांच्या मदतीने त्यांनी नेदरलँड गाठण्याचे पक्के केले.

जर्मनीची सीमा ओलांडण्यासाठी प्रसंगी सीमा चौकीदाराला लाच देण्यासाठी ओट्टो हान यांनी आपली हिऱ्याची अंगठी दिली. (अर्थात गरज पडली नाही.) सीमेवरून सुटका करून घेण्यात त्या यशस्वी झाल्या. परंतु अखेर त्या स्वीडन मध्ये स्थायिक झाल्या.

इकडे ओट्टो हान यांचे संशोधन चालूच होते. एका प्रयोगात त्यांना अल्कली मृत्तिका धातू (अर्थ मेटल) बेरियम पदार्थ मिळाल्याची खात्री झाली. ते स्वतः रसायनशास्त्रज्ञ असल्याने हा निष्कर्ष काढणे त्यांना शक्य झाले.

म्हणजेच या प्रयोगात प्रथमच अणू विखंडन झाल्याचे सिद्ध होणार होते.

त्यांनी मेटनर यांच्या कडून या भौतिक शास्त्रातील खळबळजनक प्रयोगाची खात्री करून घेतली. लाईस मेटनर यांचा पुतण्या ऑस्ट्रियन- ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ ओट्टो रॉबर्ट फ्रिश यांनी १३ जानेवारी १९३९ रोजी प्रयोगाद्वारे पुन्हा एकदा खात्री केली.

या क्रांतिकारी प्रयोगासाठी ओट्टो हान यांना १९४४ मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.

अणू विखंडन (भंजन) सिद्ध झाल्यानंतर एन्रिको फर्मी यांनी अमेरिकन भौतिक शास्त्रज्ञ लिओ त्सिलार्ड यांच्या साथीत नव्याने संशोधन चालू केले.

एका न्यूट्रॉनने युरेनियमच्या एका अणुवर मारा केल्यास त्याची दोन शकले होतात (क्रिप्टॉन आणि बेरियम). त्याचबरोबर दोन-तीन न्यूट्रॉन्स ही बाहेर पडतात.

या न्यूट्रॉन्सना नियंत्रित केल्यास अणुविखंडनाची शृंखला किंवा साखळी अखंड सुरू राहू शकते. अन्यथा न्यूट्रॉन युरेनियम मध्ये शोषले न जाता आरपार निघून जातात. न्यूट्रॉन्सची गती नियंत्रित करण्यासाठी फर्मी यांनी मंदक (मॉडरेटर) म्हणून ग्राफाईटचा वापर सुचविला.

या अभिक्रियेत घट झालेल्या वस्तुमानाचे आईन्स्टाईनच्या सापेक्षता सिद्धांतानुसार वस्तूमानाचे उर्जेत रूपांतर होते. याच सिद्धांतानुसार या प्रयोगात एकूण वस्तुमान हिशेब पण जुळला. हा महत्वपूर्ण शोध फर्मी यांना लागला.

यामुळे वीज निर्मिती साठी अणुभट्टी दृष्टीक्षेपात येऊ लागली.

वीज निर्मिती प्रमाणेच अणुबॉम्ब देखील दृष्टीक्षेपात येऊ लागला. याच कालावधीत जर्मनीने युरेनियम विक्रीवर बंदी आणल्याने लिओ त्सिलार्ड यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

याबद्दल विस्तृत माहिती अमेरिकेच्या अध्यक्षांना द्यायला हवी, या हेतूने त्यांनी एक खास पत्र तयार केले. २ ऑगस्ट १९३९ रोजी हे 'आईन्स्टाईन- त्सिलार्ड' पत्र रुझवेल्ट यांना आईन्स्टाईनच्या स्वाक्षरीने देण्यात आले.

अमेरिकेच्या अध्यक्षांनी केवळ आभाराचे पत्र लिहून आईन्स्टाईनची बोळवण केली.

१ सप्टेंबर १९३९ रोजी जर्मनीने पोलंड वर आक्रमण केले. हा दुसऱ्या महायुद्धाचा प्रारंभ ठरला. मात्र या युद्धात अमेरिकेचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता.

७ डिसेंबर १९४१ रोजी जपानी सैन्याने पर्ल हार्बर वर केलेल्या आकस्मिक हल्ल्याने अमेरिकेच्या अभेद्यतेचा भ्रम चिरडला गेला.

अमेरिकेने द्वितीय विश्वयुद्धात उडी घेतली. हा एक महत्त्वाचा वळणबिंदू होता. जसे युद्ध पुढे सरकले तसे अमेरिकेने अणुबॉम्ब निर्मितीकडे लक्ष वळवले.

सप्टेंबर १९४२ मध्ये, लेस्ली ग्रोव्हस या मेजर दर्जाच्या लष्करी अधिकाऱ्याने 'मॅनहटन' या गुप्त संशोधन प्रकल्पाची जबाबदारी स्वीकारली.

या अधिकाऱ्याला भौतिक शास्त्राचे ज्ञान नव्हते.

मात्र वेळ न दवडता ग्रोव्हसने कॅलिफोर्निया विद्यापीठ- बर्कले येथील भौतिकशास्त्रज्ञ ज्युलियस रॉबर्ट ओपनहायमर यांची भेट घेऊन, अणुबॉम्बची रचना आणि त्याची चाचणी करता येईल अशा प्रयोगशाळेच्या निर्मितीवर चर्चा केली.

ओपनहायमरच्या ज्ञानावर ग्रोव्हस प्रभावित झाले. ऑक्‍टोबर १९४२ मध्ये प्रदीर्घ संभाषण केल्‍याने ग्रोव्हस यांना खात्री पटली की, ओपनहायमरला पूर्ण माहिती आहे.

याच महिन्यात दोघांनी लागलीच 'न्यू मेक्सिको' मधील जागेची तपासणी देखील केली. ग्रोव्हसने ओपनहायमर मधील महत्त्वाकांक्षा टिपली. जी प्रकल्पाला यशस्वी निष्कर्षापर्यंत नेईल. परंतु काहींनी या निवडीवर नाके मुरडली.

कारण ओपनहायमरला फारसा प्रशासकीय अनुभव नव्हता आणि नोबेल पारितोषिक मिळालेले नव्हते. शास्त्रज्ञांवर प्रभाव पाडण्यासाठी लेस्ली ग्रोव्हस यांना ज्या पदा मध्ये 'जनरल' शब्द आहे, असे 'ब्रिगेडियर जनरल' नावानं पदोन्नती दिली गेली. ओपनहायमर यांना सैन्यात नियुक्त करण्याचा घाट घातला गेला.

लेफ्टनंट कर्नल पदासाठी त्यांना लष्कराच्या शारीरिक चाचणी साठी उभे केले गेले. परंतु हा प्रयत्न अपयशी ठरला. लष्कराच्या डॉक्टरांनी कमी वजनाचे कारण दिले, तसेच तीव्र खोकल्याचे निदान क्षयरोग म्हणून केले. (अर्थात पुढील काळात त्यांचा क्षयरोग बरा झाला.)

साखळी पद्धतीने धूम्रपान करणाऱ्या ओपनहायमर यांना 'नैराश्य' आजार पण होता. बर्कले येथे संस्कृत विभागाचे प्रमुख आर्थर डब्ल्यू. रायडर यांच्या मार्गदर्शनाने ते संस्कृत भाषा शिकले. तसेच हिंदू ग्रंथ आणि भगवद्गीता वाचू लागले. भौतिकशास्त्र या विषयाच्या आवडीने सुद्धा त्यांनी आपल्या नैराश्यावर मात केली.

मॅनहटन प्रकल्प वेगाने आकार घेत होता. हजारो लोक या प्रकल्पावर कार्यरत होते. लेस्ली ग्रोव्हस लागेल ती गोष्ट तत्परतेने उभी करून देत होते.

अगदी न्यूट्रॉनचा शोध लावलेल्या ब्रिटिश भौतिक शास्त्रज्ञ सर जेम्स चॅडविक या शास्त्रज्ञाशी सुद्धा त्यांनी मदतीसाठी संवाद साधला होता. ९ मार्च १९४४ रोजी ग्रोव्हस यांची तात्पुरती मेजर जनरल म्हणून पदोन्नती करण्यात आली.

पुढे बॅटल ऑफ द बल्ज लढाईत झालेल्या मोठ्या नुकसानीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट चिंताग्रस्त होते.

डिसेंबर १९४४ च्या उत्तरार्धात राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांनी ग्रोव्हस बरोबरच्या झालेल्या भेटीत जर्मनीवर अणुबॉम्ब टाकण्याची सुचना केली.

मात्र अणुबॉम्ब साठी काही महिन्याचा अवधी लागणार असल्याचे ग्रोव्हस यांनी सांगितले. हा खरंतर आणखी एक वेगळाच वळण बिंदू ठरला असता.

परंतु तसे झाले नाही. राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांचे १२ एप्रिल १९४५ रोजी निधन झाले. हॅरी ट्रुमन अमेरिकेचे ३३ वे अध्यक्ष झाले.

२८ एप्रिल १९४५ रोजी मुसोलिनी युद्ध सोडून स्वित्झर्लंडला पळून जाण्याच्या बेतात असताना, वाटेतच '५२-गारिबाल्डी ब्रिगेड' ने त्यांना इटली मध्येच गोळ्या घालून ठार मारण्यात आले.

३० एप्रिल १९४५ रोजी रेड आर्मी बर्लिन वर कब्जा करणार या खात्रीने, पराभवाच्या छायेत हिटलरने जर्मनीत आत्महत्या केली.

नाझी जर्मनीच्या बिनशर्त शरणागती नंतर, ८ मे १९४५ रोजी ट्रुमन यांनी आपल्या ६१ वाढदिवसाला युरोप मधील युद्ध संपल्याची विजयी घोषणा केली.

स्टॅलिन यांना हिटलर जिवंत स्थितीत हवा होता. पुढे स्टॅलिन यांनी आपला मोर्चा जपान कडे वळवला.

मुसोलिनी, हिटलर यांच्या मृत्यू नंतर पूर्णतः सैन्याची पार्श्वभूमी असणाऱ्या स्टॅलिन, चर्चिल, ट्रुमन आणि चीनचे चियांग कै शेक या चौकटीने निम्मे युद्ध जिंकले होते.

पुढील घटनेत, अमेरिकेच्या भात्यात एक अनोखे अस्त्र असल्याचा इशारा ट्रुमन यांनी प्रथमच स्टॅलिन यांना दिला.

अर्थात याची माहिती स्टॅलिन यांना आधीच होती. ( धूर्त ब्रिटन देखील कमी नव्हता. हिटलरच्या धोक्यापासून सुरक्षित जागा म्हणून ब्रिटनने कॅनडामध्ये अणुकार्यक्रमाची सुरुवात केली होती. त्याचे प्रमुख केंब्रिज येथे शिकलेले सर जॉन कॉकरॉफ्ट होते. नोबेल पुरस्कार विजेता शास्त्रज्ञ हायजेनबर्ग आणि हिटलर या दोघांचा अणुबॉम्ब निर्मिती प्रकल्प, हा एक स्वतंत्र विषय होऊ शकतो.)

बॉम्बस्फोटानंतर उमटणारा आगीचा प्रचंड लोळ

१६ जुलै १९४५ रोजी प्लूटोनियम- २३९ चा वापर करून बनविण्यात आलेल्या अणुबॉम्बची मेक्सिकोच्या वाळवंटात जगातील पहिली यशस्वी चाचणी घेण्यात आली. जी जगाला 'ट्रिनिटी' या कोडनावाने परिचित आहे.

या बॉम्बची क्षमता १८.६ किलोटन होती. या चाचणीनंतर आपल्या प्रतिक्रियेसाठी ओपनहायमरने भगवद्गीतेतील ११.१२ श्लोकाचा आधार घेतला.

( ज्या मध्ये विश्वरूप परमात्म्याचे वर्णन आहे - भगवंताचे विराट रूप जसे की आकाशात हजार सूर्य एकाच वेळी उदय पावल्यावर जसा प्रकाश पडेल...)

६ ऑगस्ट १९४५ रोजी हिरोशिमा वर जो पहिला अणुबॉम्ब टाकला गेला, त्याची क्षमता १६ किलोटन यिल्ड इतकी होती. जो ६४ किलो अतिशय समृद्ध - शुद्ध युरेनियम वापरून बनविण्यात आला होता.

९ ऑगस्ट १९४५ रोजी जो नागासाकी वर अणुबॉम्ब टाकला, त्याची क्षमता २१ किलोटन यिल्ड (२१००० टन टीएनटी) इतकी होती. जो ६.२ किलो प्लुटोनियम- २३९ वापरून बनविण्यात आला होता.

हा दुसरा बॉम्ब टाकल्यानंतर ओपनहायमर याने आपल्या प्रतिक्रियेसाठी भगवद्गीतेतील ११.३२ श्लोकाचा आधार घेतला. (जसे की भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी लोकांचा नाश करणारा महाकाल आहे. तू युद्ध केले नाहीस, तरी या सर्वांचा नाश होणारच आहे. तू केवळ निमित्त मात्र आहेस....)

हिरोशिमा, नागासाकी नुसते बेचिराख झाले नाही, तर पुढील कित्येक मानवी पिढ्या प्रारणांच्या परिणामा मुळे झालेल्या कर्करोगाने बरबाद झाल्या.

२९ फेब्रुवारी १९४८ रोजी लेस्ली ग्रोव्हस निवृत्त होणार होते. मॅनहटन प्रकल्पाच्या त्यांच्या नेतृत्वाची ओळख म्हणून, त्यांना २४ जानेवारी १९४८ रोजी काँग्रेसच्या विशेष कायद्यानुसार 'लेफ्टनंट जनरल' म्हणून मानद पदोन्नती दिली गेली.

ही बढती १६ जुलै १९४५ च्या ट्रिनिटी अणुचाचणी पासून अंमलात येणारी होती. १८ फेब्रुवारी १९६७ रोजी थोर भौतिक शास्त्रज्ञ

ओपेनहायमर यांचे प्रिन्स्टन येथे घशाच्या कर्करोगाने निधन झाले.

अखेरीस एक प्रश्न पडतो. एवढ्या मोठ्या शास्त्रज्ञाची आणि भगवद्गीता अभ्यासकाची भगवद्गीता आकलनामध्ये चूक तर झालेली नसेल ना ! कारण...

एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः । प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतोऽहिताः ॥ १६-९ ॥

ज्या कृत्यांमुळे जगाचा नाश होतो अशा कृत्यात हे आसुरी स्वभावाचे लोक दंग असतात.

येथे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, हे लोक अल्प बुद्धीचे आहेत.

जडवादी लोकांना ईश्वराची कल्पना नाही, म्हणून त्यांना वाटते की आपण प्रगती करत आहोत. परंतु हे लोक बुद्धिहीन आणि विचारशून्य असतात.

असे सर्वांवर अपकार करणारे क्रूरकर्मी लोक जगाच्या नाशाला कारण ठरतात. ॥ १६-९ ॥

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections Results: राज्यात सत्ता स्थापनेसाठी बंडखोर ठरणार किंग मेकर! महाविकास आघाडीची रणनीती ठरली, काल मुंबईत काय घडलं?

AUS vs IND 1st Test: बुमराहने जिंकला टॉस! नितीश रेड्डी अन् हर्षित राणाचे भारताकडून पदार्पण; पाहा 'प्लेइंग-11'

Sakal Podcast: दहावी-बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर ते पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच?

दहावी-बारावी बोर्डाचे ठरलं वेळापत्रक! यंदा परीक्षेचे सीसीटीव्हीत होणार रेकॉर्डिंग; निकालापर्यंत फुटेज साठविण्याचे केंद्रांना बंधन; केंद्रांवरील सुविधांची १५ डिसेंबरपर्यंत पडताळणी

Panchang 22 November: आजच्या दिवशी शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

SCROLL FOR NEXT