Microsoft Outage : मायक्रोसॉफ्टची विंडो अचानक क्रॅश झाल्याने जगभर शुक्रवारी मोठा हाहाकार माजला होता. या आयटी धक्क्यातून जग हळूहळू सावरू लागले असून शनिवारी अनेक देशांतील विमान, रेल्वे सेवा पूर्वपदावर येऊ लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. बहुतांश ठिकाणचे आर्थिक व्यवहार देखील सुरळीत होऊ लागले आहेत. दरम्यान विंडो प्रणालीतील तांत्रिक बिघाड अद्याप कायम असून ही स्थिती पूर्वपदावर यायला वेळ लागेल आयटी क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.
‘मायक्रोसॉफ्ट विंडो’मध्ये फॉल्टी सॉफ्टवेअर अपडेट झाल्याने ही आणीबाणीसदृश्य स्थिती उद्भवल्याचे ‘क्राउडस्ट्राइक’ या सायबर सिक्युरिटी फर्मने म्हटले आहे. या कंपनीकडून आज शनिवारी जगभर निर्माण झालेल्या आयटी संकटाची सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यात आली तसेच नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागल्याबद्दल माफीनामाही प्रसिद्ध करण्यात आला.
या गोंधळाचा सर्वांत मोठा फटका हा कॉर्पोरेट आयटी कंपन्या, बँका, रुग्णालये आणि विमानसेवा पुरविणाऱ्यांना कंपन्यांना बसला होता. या सगळ्या गोंधळाबद्दल ‘क्राउडस्ट्राइक’ कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी माफी मागितली असून ही समस्या पूर्णपणे दूर होण्यासाठी आणखी कालावधी जाऊ द्यावा लागेल असे त्यांनी म्हटले आहे. अनेक बड्या विमान कंपन्यांची सेवा शनिवारी पूर्ववत झाली होती. कॉर्पोरेट कंपन्यांनी देखील प्रलंबित कामे वेगाने मार्गी लावायला सुरुवात केली आहे. ब्रिटन, इस्राईल आणि जर्मनीतील आरोग्य सेवेलाचा याचा मोठा फटका बसला होता.
अनेक विमानतळांवर चेक-इन प्रणाली आणि पेमेंट स्वीकारणाऱ्या प्रणालीमध्ये अडथळे येत असले तरीसुद्धा विमानांची उड्डाणे मात्र पूर्ववत झाली आहेत. हाँगकाँग आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणे ही पूर्ववत झाली असल्याचे चिनी माध्यमांनी म्हटले आहे. अमेरिकेतील सर्वांत मोठी बँक ‘जेपी मॉर्गन चेस’ने आम्ही एटीएम सेवा पूर्ववत करण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहोत असे म्हटले आहे.
या सायबर गोंधळाचा मोठा आर्थिक फटका हा क्राउडस्ट्राइक या सायबर सिक्युरिटी फर्मला देखील बसला आहे. या कंपनीच्या समभागांमध्ये तब्बल बारा टक्क्यांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान या विंडो क्रॅशची समस्या सर्वप्रथम ऑस्ट्रेलियामध्ये डिटेक्ट झाली त्यानंतर जगभरच अशा प्रकारचा तांत्रिक बिघाड झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान या सगळ्या गोंधळामुळे नेमके किती आर्थिक नुकसान झाले हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
या सायबर संकटाचा मोठा फटका हा भारतातील विमान सेवेला देखील बसला होता पण शनिवारी बहुतांश भागातील विमान सेवा पूर्ववत झाल्याचे नागरी विमान वाहतूक खात्याचे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ‘‘ आम्ही सर्व प्रणालीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत लवकरच ही प्रणाली पूर्वपदावर येईल,’’ असे मोहोळ यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.