नेटफ्लिक्स हा ओटीटी प्लॅटफॉर्म गेल्या काही वर्षांमध्ये भारतात भरपूर लोकप्रिय झाला आहे. दर्जेदार कंटेंटमुळे कोट्यवधी लोक नेटफ्लिक्सवर सिनेमे किंवा सीरीज पाहत असतात. नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन महाग असल्यामुळे कित्येक जण पासवर्ड शेअर करुन एकच अकाउंट बऱ्याच जणांमध्ये वापरतात. मात्र आता असं करण्यावर बंधन येणार आहे.
भारतातील नेटफ्लिक्स यूजर्स आता आपल्या अकाउंटचा पासवर्ड एकमेकांसोबत शेअर करू शकणार नाहीत. देशातील नेटफ्लिक्स यूजर्सना यासंदर्भात ईमेल येण्यास सुरुवात झाली आहे. एकच अकाउंट एकापेक्षा अधिक डिव्हाईसेसवर वापरणाऱ्या यूजर्सना अशा प्रकारचा ईमेल पाठवण्यात येत आहे.
नेटफ्लिक्सने (Netflix) आपला रेव्हेन्यू वाढवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. जगभरातील कोट्यवधी नेटफ्लिक्स यूजर्स आपला पासवर्ड इतरांसोबत शेअर करतात. यामुळे कंपनीचे मोठे नुकसान होतं. तसेच, यामुळे नवीन टीव्ही सीरीज किंवा फिल्म बनवण्याच्या क्षमतेवर परिणाम होत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आलं.
कुटुंबीयांसोबत करता येणार शेअर
ईमेलमध्ये दिलेल्या माहितीनुसार, यूजर्स आता आपलं अकाउंट केवळ कुटुंबीयांसोबत शेअर करू शकतील. कुटुंबीयांव्यतिरिक्त दुसरी व्यक्ती जर सारखंच अकाउंट वापरत असेल, तर त्याची प्रोफाईल रिमूव्ह केली जाईल. यासाठी कंपनी आता यूजर्स कोणकोणत्या डिव्हाईसेसवर लॉग-इन आहेत हे तपासत आहे. "तुमचं नेटफ्लिक्स अकाउंट हे तुमच्यासाठी आणि तुमच्या घरातील व्यक्तींसाठी आहे" असं म्हणत नेटफ्लिक्सने यूजर्सना मेल केला आहे.
एक अकाउंट एकाच कुटुंबातील व्यक्ती वापरत आहेत हे निश्चित करण्यासाठी नेटफ्लिक्स विविध गोष्टींचा वापर करेल. यासाठी कंपनी व्हेरिफिकेशन कोड, प्रायमरी लोकेशनवरील वायफाय अॅक्सेस असे फीचर्स लाँच करू शकते. तज्ज्ञांकडून याबाबत अंदाज व्यक्त केला जात आहे.
१०० देशांमध्ये लागू
नेटफ्लिक्सची ही नो पासवर्ड शेअरिंग पॉलिसी अमेरिकेत यापूर्वीच लागू करण्यात आली होती. अमेरिकेमध्ये लागू केल्यानंतर काही तासांमध्येच जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये ही पॉलिसी लागू करण्यात आली होती. यानंतर आज भारतासह इंडोनेशिया, क्रोएशिया, केनिया आणि इतर देशांमध्ये ही पॉलिसी लागू करण्यात आली.
कसे आहेत प्लान्स?
नेटफ्लिक्सच्या मोबाईल प्लानची किंमत दरमहा १४९ रुपये आहे, ज्यात तुम्ही केवळ स्मार्टफोनवर नेटफ्लिक्स पाहू शकता. हे एका वेळी एकाच स्मार्टफोनवर चालते. बेसिक प्लानची किंमत १९९ रुपये/महिना आहे. यामध्ये तुम्ही मोबाईल, टॅब, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही अशा कोणत्याही डिव्हाईसवर नेटफ्लिक्स पाहू शकता. मात्र, एका वेळी यांपैकी एकाच ठिकाणी तुम्हाला पाहता येईल.
स्टँडर्ड मासिक प्लानची किंमत ४९९ रुपये आहे, तर प्रीमियम प्लानची किंमत ६४९ रुपये/महिना आहे. प्रीमियम प्लानमध्ये यूजर्सना फोर के रिझॉल्यूशन पर्यंत एकाच वेळी चार डिव्हाईसेसवर नेटफ्लिक्स स्ट्रीम करण्याची सुविधा मिळते. नेटफ्लिक्स केवळ मासिक प्लान्स देतं. वार्षिक सबस्क्रिप्शन उपलब्ध नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.