Nikola Tesla Esakal
विज्ञान-तंत्र

Nikola Tesla : एडिसननं बल्बचा शोध लावला खरं, पण तुमच्या घरात उजेड पाडला तो या अवलियानं!

Tesla : ‘बल्ब’ बनवत अंधाराला दूर करणारा थॉमस अल्वा एडिसन श्रेष्ठ की अल्टरनेट करंटचा व्यवहारिक वापर करत जगाच्या कानाकोपऱ्यात वीज पोहोचवणारा निकोला टेस्ला संशोधक श्रेष्ठ? याची चर्चा नेहमीच होते.

डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

Nikola Tesla : ही गोष्ट आहे जून १८८४ची, जेव्हा ‘तो’ ऑस्ट्रियाहून न्यूयॉर्कला रवाना झाला. त्याला तत्कालिन महान वैज्ञानिक थॉमस अल्वा एडिसनला भेटायचं होतं. त्याच्याकडं तसं कुणाचं तरी एडिसनसाठी लिहिलेलं शिफारसपत्रही होतं. पत्र देणाऱ्यानं पत्रात एक वाक्य लिहिलं होतं, “मी या जगातल्या दोन महान लोकांना ओळखतो एक तु आणि दुसरा तुझ्यापर्यंत हे पत्र आणणारा”

कुठल्याही कार्यक्षेत्रात ‘सगळ्यात महान कोण?’ हा प्रश्न दरवेळी महत्वाचा असतो. एडिसनला भेटायला जाणाऱ्या त्या अठ्ठावीस वर्षे वयाच्या तरुणानं ‘त्या’ पत्रासोबत या प्रश्नाचं उत्तरंही नेलं होतं. या दोन्हीही वैज्ञानिकांना त्यांच्या ‘विद्युत’ क्षेत्रात दिलेल्या अद्भुत सिद्धांतांबद्दल तसेच अतिशय महत्वपुर्ण जीवनोपयोगी संशोधनाबद्दल ओळखलं जातं आणि म्हणूनच या दोघांची तुलना नेहमीच केली जाते. ‘या दोघात श्रेष्ठ कोण?’ हा आजही चर्चेचा विषय ठरतो.

‘बल्ब’ बनवत अंधाराला दूर करणारा थॉमस अल्वा एडिसन (Thomas Alva Edison) श्रेष्ठ की अल्टरनेट करंटचा (Alternate Current) व्यवहारिक वापर करत जगाच्या कानाकोपऱ्यात वीज पोहोचवणारा ‘तो’ संशोधक श्रेष्ठ? तसं सामान्य लोकांत ‘एडिसन’ निःसंशय एक लोकप्रिय व्यक्तित्व आहे. त्याच्या प्रेरणादायी गोष्टी जगभरातल्या पाठ्यक्रमात शिकवल्या जातात.

लहानग्या एडिसनला कमी ऐकू यायचं, शिकवलेलं लवकर कळायचं नाही. तरीही आपल्या अनोख्या क्षमतांमुळं आणि मोठ्या कष्टातून त्यानं विज्ञानविश्वात आपलं नाव कायमचं कोरलं. हजारो पेटंट घेतले. या आणि अश्या अनेक कहाण्या आपल्या तोंडपाठ असतात परंतू ‘तो’ मात्र या बाबतीत दुर्देवी ठरतो. त्याच्या बद्दल कुणाला फारसं माहितही नसतं आणि तरीही ‘तो’ वैज्ञानिक म्हणून एडिसन समोर तसुभरही कमी ठरत नाही..

तुम्ही बरोबर ओळखलंत. हा महान वैज्ञानिक म्हणजे ‘निकोला टेस्ला.’ निकोला टेस्लांचा (Nikola Tesla) जन्म १८५६ साली तत्कालीन सर्बियात (Born in Serbia) झाला होता. अनोखी प्रतिभा आणि अद्भुत बौद्धिक क्षमता ही जणू त्याची जन्मजात कवचकुंडलंच होती. असं म्हणतात की, वैज्ञानिक मंडळी भाषा-साहित्य यात कच्चे असतात पण टेस्लाच्या बाबतीत तसं अजिबात नव्हतं. तो या प्रांतातही अव्वल होता. तारुण्यात पोहोचेपर्यंत मातृभाषेसोबतच त्याला इंग्रजी, फ्रेंच, जर्मनसह आठ भाषा लिहिता, वाचता आणि बोलताही येत होत्या. गणित-विज्ञान या विषयांचं तर विचारूच नका.

टेस्लानं ऑस्ट्रियातील एका पॉलिटेक्निक संस्थेतून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आणि याच दरम्यान डायरेक्ट करंट (Direct Current) अर्थात डिसी बद्दल जरा ‘वाढीव’ शिकवलं जातंय हे त्याच्या लक्षात आलं. ‘हे सदोष आहे’ हे सांगून उपयोग नाही ‘याला पर्याय दिला पाहिजे’, असं त्यानं तेव्हाच मनोमन ठरवलं.

डिसीत इलेक्ट्रॉन (electrons) केवळ एका दिशेत गतिमान होतात. त्यामुळे वीज दुरवर जाऊ शकत नाही. याउलट एसी मध्ये इलेक्ट्रॉन वारंवार आपली दिशा बदलू शकतात त्यामुळं वीज फक्त दुरवर पोहोचवता येते असं नाही तर वीजेची उपयुक्तताही वाढू शकते.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत डिसीला अगदी जादूप्रमाणं मानलं जात होतं आणि जादुगार होता दस्तुरखुद्द एडिसन. टेस्लालाही नेमका यातच विशेष रस होता आणि शेवटी १८८४ साली त्याची ‘त्या’ पत्रासह एडिसनशी ‘ती’ भेट झाली, जिचा पहिल्या परिच्छेदात उल्लेख केलाय.

‘एडिसन’ हे नाव तोपर्यंत फक्त संशोधक म्हणून राहिलं नव्हतं तर ते ‘उद्योजक’ म्हणूनही ओळखलं जाऊ लागलं होतं. एडिसननं डिसी वीज पुरवठ्यासाठी एक प्लांट बनवला होता आणि यात टेस्लानं ‘सुधारणा’ (Tesla worked with Edison) करावी अशी त्याची मनोमन इच्छा होती. टेस्लाच्या नोंदीनुसार एडिसननं या कामासाठी त्याला तब्बल पन्नास हजार डॉलर्स देण्याचं वचनही दिलं होतं. पण काम झाल्यानंतर एकदमसे हालात बदल गए, जज्बात बदल गए,जिन्दगी बदल गयी.

एडिसननं चक्क ‘अगा जे घडलेची नाही’ म्हणत कानावर हात ठेवले. टेस्लासाठी हा मोठ्ठा झटका होता. प्रश्न फक्त पैश्याचा खचितच नव्हता. त्यानं त्याच क्षणी एडिसनची साथ सोडली. तोपर्यंत अमेरिकन गुंतवणूकदार आणि संशोधकात एसी पॉवर सिस्टिम (AC Power System)आणि एसी मोटर (AC Motors) संदर्भातलं टेस्लाचं (Tesla) काम ‘गेम चेंजर’ ठरणार यावर चर्वितचर्वण सुरू झालं होतं. याच विचारानं ‘वेस्टर्न यूनियन कंपनी’नं (Western Union Company) टेस्लासमोर आपल्यासोबत काम करण्याचा प्रस्ताव ठेवला आणि इथंच टेस्लानं आपलं काम अधिक पुढं नेलं.

काही कालावधीतच या कंपनीनं एडिसनच्या ‘एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनी’ला धोबीपछाड दिली. टेस्लानं आपलं संशोधन ‘वेस्टिंग हाऊस इलेक्ट्रिक कंपनी’ला विकलं आणि या कंपनीनं संपुर्ण अमेरिकेत धुव्वा उडवला. सरतेशेवटी एडिसनला या क्षेत्रातून आपलं चंबुगबाळं आवरावं लागलं. खरं तर हे युद्ध व्यापार कंपन्यांचं होतं पण ते वैज्ञानिक-संशोधक असं झालं आणि टेस्लाचं नाव एका वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचलं. टेस्लानं विकसित केलेल्या एसी ट्रान्सफॉर्मर आणि एसी मोटरनं वीजेचं उपयोजित मुल्य प्रचंड वाढवलं. या शिवाय ‘औद्योगिक क्रांती’च काय या क्रांतीची कल्पनाही झाली नसती. यानंतर टेस्लानं ‘टेस्ला कॉईल’चा शोध लावला. हा एक असा शोध होता ज्याचा वापर एक्स रे पासून वायरलेस कम्यूनिकेशन पर्यंत सर्वत्र झाला.

मात्र याच शोधामुळं टेस्लाची अजून एका उद्यमी संशोधकासोबत जुंपली तो म्हणजे ‘मार्कोनी’. मार्कोनी तोपर्यंत ‘रेडिओ’जगताचा अनिभिषिक्त सम्राट झाला होता पण ‘टेस्ला कॉईल’ सोबतच मी रेडिओ या संकल्पनेवरही काम केलंय असा दावा टेस्लानं केला. झालं...शेवटी मामला अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. मार्कोनींच्या सर्व दाव्यांना छेद देत टेस्लाला या नव्या अविष्काराचं श्रेय दिलं गेले.

टेस्ला इथंही जिंकला होता पण. न्यायालयाचा निर्णय येण्याच्या सहा महिने आधीच त्याचं देहावसान झालं होतं. या अवलियाच्या स्मृतीप्रित्यर्थ एलन मस्कनं आपल्या कंपनीचं नाव ‘टेस्ला’ ठेवलंय (Elon Musk names company Tesla). ही कंपनी आज जगातली सगळ्यात वेगानं प्रगती करणारी ठरलीये.

‘निकोला टेस्ला’ यांचा आज स्मृतीदिन. या महान संशोधकास विनम्र अभिवादन !!!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT