Scientists Talk To Humpback Whale : कॅलिफोर्निया विद्यापीठातील काही वैज्ञानिकांनी चक्क एका व्हेलशी गप्पा मारल्या आहेत. या व्हेलच्या भाषेत बोलून संवाद साधणं शक्य झाल्यामुळे आता भविष्यात आपण एलियन्स सोबतही संवाद साधू शकणार असल्याचं वैज्ञानिकांनी म्हटलं आहे.
या विद्यापीठातील SETI (सर्च फॉर एक्स्ट्राटेरिस्टिअल इंटेलिजन्स) आणि अलास्का व्हेल फाऊंडेशन या संस्थेने मिळून हे संशोधन केलं आहे. ट्वायन (Twain) नावाच्या एका हम्पबॅक व्हेलसोबत (Humpback Whale) आपण 20 मिनिटं संवाद साधल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. पीअर जे लाईफ अँड एन्व्हायर्नमेंट या नियतकालिकात हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे.
व्हेलसोबत संवाद साधण्यासाठी शास्त्रज्ञांनी समुद्रात एक अंडरवॉटर स्पीकर सोडला, आणि हम्पबॅक व्हेलच्या 'कॉन्टॅक्ट कॉल'चं (Whale Contact Call) रेकॉर्डिंग प्ले केलं. याला ट्वायन नावाच्या एका व्हेलने प्रतिसाद दिला आणि ती व्हेल शास्त्रज्ञांच्या बोटीभोवती फिरु लागली. सुमारे 20 मिनिटे चाललेल्या या संवादात शास्त्रज्ञांनी पाठवलेल्या प्रत्येक प्लेबॅक कॉलला ट्वायनने प्रतिसाद दिला.
या संशोधनाच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ब्रेंडा मॅककॉवन यांनी सांगितलं, की अशा प्रकारे व्हेलच्या भाषेत मानवांनी व्हेलशी साधलेला हा पहिलाच संवाद आहे. अलास्का व्हेल फाउंडेशनचे डॉ. फ्रेड शार्प यांनी सांगितलं, की हम्पबॅक व्हेल या अतिशय हुशार असतात. त्या समूहाने राहतात, घरटी बांधतात आणि हत्यारे देखील तयार करू शकतात. त्या एकमेकांशी संवाद साधण्यासाठी गाण्यांचा देखील वापर करू शकतात.
व्हेलशी संवाद साधणे हे आमच्या रिसर्चचं मुख्य उद्दिष्ट नाही. खरंतर त्याहून वेगळ्या सजीवांशी संवाद साधण्यासाठी आम्ही संशोधन करत आहोत असं या वैज्ञानिकांनी सांगितलं. SETI मधील एका संशोधकाने सांगितलं, की या व्हेलच्या प्रतिसादावरुन याचा अंदाज येऊ शकतो की एलियन मानवांशी कोणत्या प्रकारे संपर्क (Alien Communication) साधू शकतात.
सध्या टेक्नॉलॉजी तेवढी प्रगत नसल्यामुळे आपण एलियन्सशी थेट संपर्क साधू शकत नाही. मात्र जर एलियन्स आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतील, तर आपल्यालाही माहिती असायला हवं की नेमकं काय शोधायचं आहे. यासाठी हे संशोधन फायद्याचं ठरणार आहे; असं संशोधकांनी स्पष्ट केलं.
अंतराळात असणाऱ्या अनेक सिग्नल्सपैकी, एलियन्सनी आपल्याशी संवाद साधण्यासाठी पाठवलेले सिग्नल (Space Signal) वेगळे करता यावेत, यासाठी या संशोधनाचा फायदा होणार आहे. यासोबतच व्हेलप्रमाणे डॉल्फिन, हत्ती आणि कळपाने शिकार करणाऱ्या मांसाहारी प्राण्यांशी संवाद साधण्यासाठी देखील हे संशोधन फायद्याचं ठरेल असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.