मुंबई : ‘ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशन’च्या संशोधकांना पिल्लाला जन्म देणाऱ्या सापसुरळ्यांच्या नव्या कुळाचा आणि पाच नव्या प्रजातींचा शोध लावण्यात यश आले आहे. पिल्लाला जन्म देणाऱ्या सापसुरळीची ही भारतीय द्वीपकल्पामधील पहिलीच नोंद आहे. या संशोधनामध्ये ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनचे संशोधक ईशान अगरवाल, तेजस ठाकरे आणि अक्षय खांडेकर यांचा सहभाग आहे. जर्मनीमधून प्रकाशित होणाऱ्या ‘व्हर्टिब्रेट्स झुऑलॉजी’ या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकातून या संशोधनावर शिक्कामोर्तब झाले आहे.
द्रविडोपेप्स नामकरण
नव्याने शोधलेल्या कुळाला ‘द्रविडोसेप्स’ नाव देण्यात आले आहे. ‘द्रविड’ या संस्कृत आणि ‘सेप्स’ या ग्रीक शब्दांवरून हे नामकरण केले आहे. दक्षिण भारतातील आढळ क्षेत्रासाठी ‘द्रविड’ आणि सापसदृश्य ठेवणीसाठी ‘सेप्स’ यांच्या जोडणीतून कुळाचे नाव ठेवले आहे. अंड्यांऐवजी पिल्लांना जन्म देणे, डोळ्यांवरील खालची पापणी पारदर्शक असणे आणि जनुकीय संचाच्या वेगळेपणावरून ‘द्रविडोसेप्स’ हे कूळ ‘सबडोल्युसेप्स’ या कुळापासून वेगळे केले आहे. (Marathi Tajya Batmya)
८९ नमुने केले गोळा
संशोधनामध्ये सापसुरळ्यांचे ३३ ठिकाणांवरून ८९ नमुने गोळा करण्यात आहे. तमिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रात पाच वर्षे सुरू असलेल्या संशोधन मोहिमांच्या शेवटी संशोधकांना नवीन कूळ आणि पाच नवीन प्रजातींचा शोध लावण्यात यश आले. या संशोधनामध्ये सापसुरळ्यांची शरीरवैशिष्ट्ये, जनुकीय संच, भौगोलिक आढळ क्षेत्र आणि या आढळ क्षेत्राचा भौगोलिक इतिहास तसेच या प्रजातींच्या उत्क्रांतीचा कालखंड यांचा अभ्यास करण्यात आला. (Latest Marathi News)
आढळ क्षेत्रावरून नामकरण
१) नव्याने शोधलेल्या पाचही प्रजाती तमिळनाडू राज्यातील आहेत. ‘द्रविडोसेप्स जिंजीएन्सीस’, ‘द्रविडोसेप्स जवाधूएन्सीस’, ‘द्रविडोसेप्स कलक्कडएन्सीस’, ‘द्रविडोसेप्स श्रीविल्लीपुथुरेन्सीस’ आणि ‘द्रविडोसेप्स तमिळनाडूएन्सीस’ या पाचही प्रजातींचे नामकरण त्यांच्या आढळ क्षेत्रावरून केले आहे.
२) ‘रायोपा गोवाएन्सीस’, ‘सबडोल्युसेप्स पृदी’ आणि ‘सबडोल्युसेप्स निलगिरीएन्सीस’ या तीन प्रजातींच्या वर्गीकरणातील स्थान बदलून नव्याने शोधलेल्या कुळामध्ये निश्चित केले आहे. नव्या कुळात समाविष्ट केलेली द्रविडोसेप्स गोवाएन्सीस ही प्रजाती उत्तर गोव्यातील उत्सुम तसेच महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग (अंबोली) आणि कोल्हापूर जिल्ह्यातून नोंदवली गेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तिचा आढळ राधानगरी, पंडिवरे (भुदरगड), तळये (गगनबावडा) आणि वाशी (पन्हाळा) या ठिकाणांवरून नोंदवला गेला आहे.
सापसुरळीची पहिलीच नोंद
सरीसृपांमध्ये पिल्लांना जन्म देण्याचे समायोजन हे कमी तापमानाच्या अधिवासाशी जोडलेले आहे. कमी तापमानामध्ये अंडी उबविण्याच्या अडचणींवरील उपाय म्हणून थेट पिल्लांनाच जन्म देण्याचे समायोजन उत्क्रांत झाले असावे, असा मतप्रवाह आहे; पण पिल्लांना जन्म घालणाऱ्या सरीसृपांच्या सर्वाधिक प्रजाती उष्ण कटिबंधीय प्रदेशामधून नोंदवलेल्या आहेत. भारतामध्ये सापसुरळ्यांच्या ४० हून अधिक प्रजातींची नोंद आहे. यातील भारतीय द्वीपकल्पासाठी पिल्लाला जन्म देणाऱ्या सापसुरळीची ही पहिलीच नोंद आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.