Henry Ford esakal
विज्ञान-तंत्र

Henry Ford : पहिलंवहिलं बाईक इंजिन बनवणाऱ्या अवलियाची गोष्ट

हेनरी फोर्ड हे वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत ‘शेतमजूर’ म्हणून काम करायचे.

डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

जॉनशी हितगूज करणारी ती व्यक्ती म्हणजे ‘हेनरी फोर्ड' (Henry Ford) १९०३ ला आजच्याच दिवशी आपलं पहिलंवहिलं बाईक इंजिन बनवलं होतं त्यानिमित्तानं सहज!

आज अशा माणसाची गोष्ट सांगतो जो वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत ‘शेतमजूर’ म्हणून काम करायचा. विल्यम आणि मेरी यांच्या सात अपत्यांपैकी तो एक. कामचलाऊ शिक्षण (Education) घेत शेतात काम करणे हे त्याची दैनंदिनी. शेतातील कामंही तो सचोटीनं करायचा पण त्याचा पिंड संशोधकाचा होता. काहीतरी नवं शिकावं-वेगळं काही करावं म्हणून वयाच्या सोळाव्या वर्षी त्यानं डेट्रॉईट (Detroit)या शहराकडे आपला मोर्चा वळवला आणि एका घड्याळाच्या दुकानात ‘हरकाम्या’ म्हणून रुजू झालां. इथे काम अर्थात शेतीपेक्षा कमी होते. जुजबी गोष्टी शिकायलाही मिळाल्या पण एका टप्प्यानंतर फक्त वेळ चालला होता. जॉब सॅटिस्फॅक्शन (Job Satisfaction) नावाची गोष्ट नव्हती त्यामुळे तो पुन्हा गावी परतला.

शेतीसोबत इथेच त्याने नवे काम शोधायला सुरूवात केली आणि गाव आणि शहराच्या मधोमध असलेल्या एका संस्थेत त्याला ‘मेकॅनिक’ (Mechanic) म्हणून काम मिळाले. इथे मुख्यत्वे इंजिनावर काम चालायचे. गडी इथे चांगलाच रमला इतका की रिकाम्या वेळातही तो वर्कशॉपमध्ये खटाटोप करत बसे. मुख्य कामाव्यतिरिक्त सततच्या खटपटींमुळे कधीकधी मालक त्याला रागावतही असे पण याचे उद्योग काय थांबत नव्हते. असेच एके दिवशी पठ्ठ्याने गवत कापण्याचे यंत्र ट्रॅक्टरच्या इंजिनला जोडून स्वयंचलित गवत कापणी मशीन बनवून टाकले. याच दरम्यान त्याचे लग्न झाले आणि त्याला एक मुलंही झालं. वयाची तिशी आली पण ‘ॲचिव्हमेंट’ (Achievement) ज्याला म्हणतात तसं आयुष्यात काही अद्यापही झाले नव्हते.

खरं तर त्याने पुढे त्याच्या जीवनात कमावलेल्या गोष्टी बघता “काही करून दाखवायचे तर त्याचं ठराविक वय असतं” म्हणत संपु्र्ण आयुष्य एकाच गिल्टमध्ये घालवणाऱ्यांसाठी त्याचं आयुष्य एक धडा ठरावं. लग्न-मुल जबाबदारी वाढली होती.’इंजिनावर किती दिवस खेळणार? म्हणत त्यानं पुनःश्च एकवार डेट्रॉईट गाठले. यावेळी डेट्रॉईटमध्ये एडिसनचा प्रचंड बोलबाला होता. एडिसन संशोधकाच्या भूमिकेतून बाहेर पडत कधीच उद्योजक झाला होता. आयुष्यात नेहमी ‘योग्य वेळी योग्य गाडीत बसणं महत्वाचे असते’ तो ही एडिसनच्या एका कारखान्यात रुजू झाला. एडिसन ‘माणूस’ म्हणून कसा होता? हा भाग बाजूला ठेवता एडिसनला माणसांची पारख होती. काही महिने याचं काम बघितल्यानंतर एडिसननं त्याला मुख्य अभियंता म्हणून पदोन्नती दिली.

सोबत इथे त्याच्यावरची जबाबदारीही वाढली. वीजेचा प्रवाह २४X७ सुरळीत राहिल याची काळजी घेणं हे त्याचं मुख्य काम. अर्थात मोबदलाही तसा चांगला मिळत असे. एकुणच त्यालाही हे काम आवडले पण इथे कायम अलर्ट रहावे लागत असल्याने दोन गोष्टी हरवल्या त्या म्हणजे प्रयोग आणि स्वप्नरंजन. ‘वेळ मिळत नाही’ हा बहाणा असतो ‘वेळ काढावा लागतो’ त्यानं वेळ काढून गॅसोलिनवर चालणारी अनोखी चारचाकी सायकल बनवली.

संशोधक-अभियंता वर्तुळात त्याची चर्चा झाली. अर्थात १८९३लाही त्यानं प्रयत्न केले होते पण तेव्हा तो अपयशी ठरला होता, मात्र यावेळी तीन वर्षांनंतर किमान तो आपल्या नावाची ‘चर्चा’ उडवून देण्यात तरी यशस्वी झाला होता. इथे तुम्ही कन्फ्यूज व्हाल की मध्यंतरी ‘मर्सिडिज’च्या गोष्टीत तर गॅसोलिनचे इंजिन डॅमलर आणि बेंझनं बनवल्याचे वाचलंय, बरोबर. गॅसोलिन इंजिन त्यांचेच पण त्यांनी हे तिथेच सोडले, याने ते विकसित केले.

विकसित केलं म्हणणं खूप सोप्पं वाटतं. यासाठी त्यानं त्याचं तेव्हापर्यंतच कमावलेलं सर्व पणाला लावलं कारण त्याला अजून संशोधन करायचं होतं-आपलं काम अधिक उत्तम करायचं होतं. दरम्यान त्याला काही स्पॉन्सर्सही मिळाले पण त्यांना चुटकीसरशी रिझल्ट हवा होता, त्यामुळे त्यांचे फार दिवस पटलं नाही आणि याला घाईगडबडीत काहीही करायचं नव्हते. आपल्या एका प्रयोगादरम्यान त्यानं काही रेसिंग कारही बनवल्या. १८९६ते १९०३ मोठा वेळ संशोधनात घालवल्यानंतर त्यानं आपली कंपनी स्थापन केली आणि आपल्याकडे काळीपिवळी किंवा वडाप म्हणतात, तश्या प्रवासी वाहनांच्या निर्मितीत तो उतरला.

कंपनी सुरू तर झाली पण पाच आठवड्यातच त्याच्यावर गॅसोलिन इंजिनाच्या पेटंट संदर्भात केस झाली. गॅसोलिन इंजिन त्याचं नव्हतं, त्यानं ते विकसित केलं होतं त्यामुळे अर्थात तो ही केस हरला. ‘हरणं’ ही मानसिकता असते. त्यानं तसाही कधी मीच इंजिन बनवलं याचा दावा केला नव्हता. पुढच्या कोर्टात केस पुन्हा स्टॅंड झाली आणि दोन वर्षांनी तो न्यायालयात आपलं म्हणणं मांडण्यात यशस्वी झाला. “बरं हे कुठं काय मी माझ्या एकट्यासाठी करतोय? तंत्रज्ञान केवळ पैश्यांवाल्याकडच असावं का?गाड्या शेवटी जनतेच्या सेवेतच उतरणार ना.” अशी त्यानं न्यायालयात केलेली मांडणी ऐतिहासिक ठरली. वृत्तपत्रांनी याची दखल घेतली आणि तो रातोरात जनतेच्या मनात ‘नायक’ ठरला. १९०८ ला त्यानं आपली पहिली गाडी ‘टी’ आणली तेव्हा तिचे दिड करोड मॉडेल अमेरिकेत-दहा लाख कॅनडात आणि अडिच लाखाहून अधिक ब्रिटनमध्ये विकले गेले.

त्यानं कारनिर्मिती क्षेत्रात भुतो न भविष्यती बदल केले. ‘स्पीड’ हा त्याचा मंत्र होता. मोजून फक्त ९३ मिनिटात कार असेम्बल होऊ लागली. तांत्रिकदृष्ट्या त्यानं अक्षरश: धुमाकूळ घातलाच पण मानवी दृष्टिकोनातूनही तो नेहमीच सजग राहिला. कुठलंही काम असो कामगाराला किमान पाच डॉलर्स दिवसाचे मिळालेच पाहिजे असा त्यानं दंडकच घालून दिला. त्याकाळी कामगारांना फार तर डेली २.३४ डॉलर्स मिळायचे. तो सातत्यानं प्रयोग करत राहिला. त्याच्या गाडी विक्रीचा रेट २४सेकंदाला एक असा होता. यानंतर त्यानं नवं मॉडेल लॉंच करत ‘टी’ ची किंमत तब्बल तिपटीनं कमी केली.

एव्हाना त्याची कंपनी इतकी स्वावलंबी झाली होती की गाडीचे सगळे भाग एकाच छताखाली “कामगार जोपर्यंत स्वत: गाडी घेऊ शकत नाही तोपर्यंत त्याचा काम करून उपयोग नाही” अश्या प्रकारच्या मांडणीमुळे आणि त्यानं अवलंबलेल्या कामगार कल्याण धोरणांमुळे तत्कालिन उद्योग जगतात भूकंप झाला होता.

जितका तो कामगारांचा विचार करत असे तितकंच चिंतन जागतिक शांतीबाबतही होते. याचंच एक पाऊल म्हणून पहिल्या जागतिक महायुद्धादरम्यान शिष्टमंडळासोबत एका जहाजानं युरोपात शांती संदेश घेऊन दाखल झाला काही अमेरिकन वृत्तपत्रांनी त्यांची ‘मुर्खांचं जहाज’ म्हणत खिल्ली उडवली त्यामुळे तो पुन्हा मायदेशी परतला.

त्याचं एकुणात वर्तन आणि काम करण्याची पद्धत बघता तो ‘साम्यवादानं प्रेरित असलेला भांडवलवादी’ माणूस वाटत असला तरी तो मुळचा संशोधक असल्याने प्रारंभी कुठल्याही राजकिय पक्षाशी कधीही जोडला गेला नाही, पण राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सनसह सर्वसामान्य लोकंही त्याचे चाहते होते. लोकाग्रहास्तव निवडणूक लढून ती हरल्यानंतर त्याची लोकप्रियता अजूनच वाढली अगदी तो पुढचा राष्ट्राध्यक्ष होईल अशी वातावरण निर्मिती झाली, पण त्यानं बाहेरून पाठिंबा देत सक्रिय राजकिय सहभाग टाळला. प्रत्येत यशस्वी माणसाच्या आयुष्यात उतारचढ येतात तसे त्याच्याही आले. हळूहळू औद्योगिक स्पर्धा वाढली. ”प्रत्येक अमेरिकन माणसाकडे गाडी असावी”’हे त्याचं स्वप्न होतं पण धंद्यात गप्पांना स्थान नसते त्यामुळे स्पर्धा बघता काही निर्णय घेणं अनिवार्य झालं पण तोपर्यंत थोडा उशीर झाला. बाजारातीलं त्याचं नाव थोडं लयाला गेलं आणि याच्या मनातही नकारात्मक विचार सुरू झाले. ज्यू लोकांबद्दल द्वेष निर्माण झाला आणि हिटलरबद्दल आकर्षणही वाढलं.

१९१९ ते १९२७ पर्यंत त्यानं आपलं स्वत:चं साप्ताहिक ‘द डियरबॉर्न इंडिपेंडेंट’ मध्ये ज्यू विरोधी लिखाण केलं आणि थेट एक पुस्तकच लिहिलं ज्याचं नाव होतं ‘द इंटरनॅशनल ज्यूज:द वर्ल्ड्स फॉरमोस्ट प्रॉब्लेम’नाझी जर्मनीत या पुस्तकाची विक्रमी विक्री झाली. या सर्व गदारोळात त्याला जर्मनीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला पण संयमी तटस्थ नागरिकात त्याची लोकप्रियता कमी झाली. असो, सकारात्मक आणि नकारात्मक असे प्रत्येकाच्याच आयुष्याचे पैलू असतात. मला व्यक्तीश: त्याच्यातला ‘सर्वसामान्य माणसाला तंत्रज्ञानाशी जोडणारा संशोधक’ प्रचंड भावतो. आज तंत्रज्ञान इतकं सुलभ झालंय की ते गृहीत धरलं जातं पण या माणसानं मानवी समुहाला विकासाच्या एका टप्प्यावर नेलं ही गोष्ट नाकारता येत नाही.

आयुष्याच्या शेवटच्या दिवसात तो एके दिवशी जॉन नावाच्या एका शालेय विद्यार्थ्याशी हितगूज करत असतांना तो सांगत होता,”आमच्या बालपणी एकाच खोलीची शाळा असायची. लांबून लांबून विद्यार्थी यायचे.”जॉननं त्याला थांबवलं “पण महोदय जग आता बदललंय हे. तंत्रज्ञान खूप पुढं गेलंय. हे आधुनिक जग.”जॉनचं सुरूच होतं पण यावेळी त्यानं जॉनला टोकलं,”बाळा हे आधुनिक जग आहे आणि हे मी आणलंय.”

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT