Bhivsula Caves, Near Mahabaleshwa, Panchgani Sakal
टूरिझम

भीवसुळा: अंगावर काटा आणणाऱ्या नैसर्गिक गुहांचा भुलभुलैय्या

Bhivsula Caves: कीर्रर्र जंगलानं वेढलेल्या परिसरात अंगावर काटा आणणाऱ्या नैसर्गिक गुहांचा भुलभुलैय्या असं भीवसुळा गुहांचं वर्णन करता येईल.

सुरज सकुंडे

Bhivsula Caves: सह्याद्रीच्या (Sahyadri) पोटात अनेक रहस्य आणि चमत्कार दडलेले आहेत. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात बंदिस्त असलेला असाच एक चमत्कार म्हणजे भीवसुळा गुहा. कीर्रर्र जंगलानं वेढलेल्या परिसरात अंगावर काटा आणणाऱ्या नैसर्गिक गुहांचा भुलभुलैय्या असं भीवसुळा गुहांचं वर्णन करता येईल .

कसे जाल? (How to go?)

पाचगणी- महाबळेश्वर मार्गावर (Panchgani-Mahabaleshwar Road) पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेलं 'भिलार' (Bhilar) हे गाव आहे. येथून आत गेल्यावर साधारण तीन किलोमीटरवर कासवंड (Kasvand) हे गाव लागतं. या गावातच भिवसुळा हे ठिकाण वसलेलं आहे. कासवंड येथील चोरमले वस्तीपर्यंत आपण वाहनांनी जाऊ शकतो. तिथून पुढे मात्र आपल्याला पायी जावं लागतं.

भीवसुळाला जातानाचा रस्ताही तितकाच सुखावणारा आहे. सुरुवातीला थोडं अंतर पाऊलवाटेनं चढाई करावी लागते. हिरव्यागार झाडीतून वाट काढत, रानमेवा करवंदाचा आस्वाद घेत वाट काढताना वेगळीच मजा येते. यादरम्यान डोंगरावर शेळ्यामेंढ्या चारण्यासाठी आलेले स्थानिक मेंढपाळ आपल्या नजरेस पडतात.

'सडा' (Sada):

साधारणपणे पाच ते दहा मिनिटांच्या चढाईनंतर आपण एका विस्तीर्ण अशा सपाट पठारावर जाऊन पोचतो, ज्याला स्थानिक लोक 'सडा' या नावानं ओळखतात. सुमारे सत्तर एकरावर वसलेलं हे मैदान साधारणपणे पाचगणीच्या सुप्रसिद्ध टेबल लँडएवढं ( Table land) विस्तीर्ण आहे. विशेष म्हणजे या पठाराची उंची जवळपास महाबळेश्वरमधील सर्वात उंच ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या विल्सन पॉइंटइतकीच आहे. या पठारावरून मेढा अर्थात जावळी खोरं, गुलाब पॉईंट,वैराटगड, टेबल लँड, मांढरदेवी, पांडवगड, कमळगड इ. ठिकाणं आपल्या नजरेच्या टप्प्यात आल्याचं पाहायला मिळतं.

जैवविविधतेने संपन्न परिसर (Biodiversity):

हा परिसर जैवविविधतेने संपन्न आहे. या परिसरामध्ये माकड, डुक्कर, तरस इ. प्राण्यांच्या पायाचे ठसे तसेच विष्ठा नजरेस पडतात. याशिवाय साळींदराचे काटे व मोरपिसही पाहावयास मिळतात. या सर्व गोष्टी येथील पशुपक्ष्यांच्या अस्तित्वात साक्ष देतात. रानमेवा करवंदासह गेळा, तोरण ही वैशिष्ट्यपूर्ण झाडंही इथे पाहायला मिळतात . इथे आढळणाऱ्या रामेटा वेलीचा उपयोग पूर्वी वैद्य मोडलेलं हाड बांधायला करत.

भीवसुळा गुहा (Bhivsula Caves):

निसर्गाशी एकरूप होत थोडं अतंर चालल्यानंतर आपण मुख्य आकर्षणाकडे अर्थात भिवसुळा गुहांकडे पोचतो. या गुहा भुकंपामुळे तयार झाल्या असाव्यात, असं जाणकार सांगतात. जिकडं नजर टाकावी तिकडं घनदाट जंगल. सुर्यकिरणंही जमिनीवर सहजासहजी पोचू शकणार नाहीत, इतकं घनदाट... अन् त्यासानिध्यात काळ्याकुट्ट कातळ खडकाच्या कपारीमधून कसाबसा एक माणूस जाऊ शकेल, अशी अरुंद वाट. एकप्रकारे हे भीवसुळा गुहांच्या समुहाचं प्रवेशद्वारच म्हणावं लागेल. इथूनच खरा रोमांच सुरु होतो.

दाट झाडाझुडूपातून, वेलीवगैरेंना बाजूला सारत वाट शोधावी लागते. वाळलेला पाला पाचोळा तुडवत, पक्ष्यांच्या आवाज ऐकत आपण भीवसुळा येथील पहिल्या गुहेजवळ पोचतो. एका मोठ्या झाडाची आडवी आलेली फांदी ओलांडल्यावर आपल्याला गुहेत शिरता येतं. साधारणपणे दोन फूट रुंद आणि पंचवीस फूट लांब खडकामध्ये ही गुहा तयार झालीय. आतमध्ये पुर्णतः अंधार... ही गुहा म्हणजे भीवसुळेची झलकच..! या गुहेपासून पुढे जाऊ तसतशा अनेक छोट्या मोठ्या गुहा लागतात. ज्या आनंद देतात तर कधी अंगावर काटादेखील आणतात. मधूनच एखाद्या प्राण्याचा आवाज घाबरवून टाकतो. माकडांच्या करामती मजा आणतात तर कधी अचानक सरपटत जाणारा साप किंवा कपारीमध्ये लपून बसलेला विंचू पाहून अंगावर शहारे येतात.

वाघाची गुहा (Tigers Cave):

यातून वाट काढत पुढे गेल्यावर आपण पोचतो, भीवसुळेतील मुख्य आकर्षण अर्थात 'वाघाची गुहा' येथे. या गुहेत पूर्वी वाघाचं वास्तव्य असायचं, असं स्थानिक लोक सांगतात. त्यावरूनच या गुहेला 'वाघाची गुहा' हे नाव पडलं. साधारणपणे तीनशे फूट लांबीची ही गुहा सर्वांनाच आचंबित करुन टाकते. विशेष म्हणजे ऐन उन्हाळ्यातही या गुहेतील तापमान सतरा - अठरा अंश सेल्सिअसपर्यंत कमी असतं. या गुहेत जमिनीच्या खाली मोहोळ करणार्‍या वैशिष्ट्यपूर्ण मधमाशांची मोहोळही आढळतात. या गुहेत जसंजसं आतमध्ये जावं तसतशा अनेक गुहा लागतात. एकप्रकारे गुहांचा भुलभुलैय्याच. आपण हळूहळू जमिनीच्या खाली जाऊ लागतो. आपण भुगर्भात जातोय की काय असाच एकंदरीत भास व्हावा. एकेठिकाणी आल्यावर गुहेला एकाचवेळी काही फाटे फुटतात आणि आपण गांगारून जातो. पण हा टप्पा पार केल्यावर आपण या गुहेतील सर्वात सुंदर ठिकाणी पोचतो.

साधारणपणे दोन्ही बाजूला पन्नास फुट उंच खडक आणि त्यावर वेलींची हिरवीगार झालर. वेगवेगळ्या रंगाची फुलं आणि त्यावर पडलेली सुर्यकिरणं. सारं काही स्वप्नवत. विशेष म्हणजे या संपूर्ण गुहेत अंधार असताना फक्त याच ठिकाणी सुर्यनारायण प्रसन्न होतो. मन सुखावतं. इथून आणखी पुढे गेल्यावर आपण आणखी खाली जाऊ लागतो. कधी कधी मोठमोठे खडक चढावे उतरावे लागतात; तर कधी सापासारखं शरीर निमुळतं करून पुढे सरावं लागतं. जसजसं पुढं जाऊ तसतसं वाट अजून अरुंद होते. एकमेकांच्या सहाय्याने एक एक टप्पा पार करत आपण पुढे सरकू लागतो. प्रत्येक टप्प्यावर नवीन आव्हानं. कधी चढत तर कधी उतरत या गुहांचा प्रवास पुर्ण होतो.

वाघाच्या गुहेसारख्या अनेक गुहा:

वाघाच्या गुहेसारख्याच अजूनही अनेक गुहा या भागात आहेत. यातील काही एकाचवेळी शंभर जण सामावून घेऊ शकतील, एवढ्या मोठ्या आकाराच्या आहेत. प्रत्येक गुहा नवीन आव्हान उभं करते आणि खूप काही शिकवून जाते.

कधी भेट द्यावी? (When to visit) :

वनविभागाची परवानगीनं आणि स्थानिकांच्या मदतीने आपण वर्षभरातील तीनही ऋतूंमध्ये भीवसुळेला भेट देऊ शकतो. खासकरून पावसाळ्यात भीवसुळेचं सौंदर्य अजून खुलतं. निसर्गप्रेमींसाठी आणि ट्रेकिंगची आवाड असणाऱ्यांसाठी भीवसुळा गुहा म्हणजे पर्वणीच. तेव्हा महाबळेश्वर पाचगणी भेटीवर आल्यावर भीवसुळेला भेट द्यायला विसरू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election 2024 Results Live : मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT