उंचच उंच शिखरे, सुळके लांबूनच सुंदर दिसतात. प्रत्यक्षात तेथे जाऊन पाहण्याचा आनंद सर्वांनाच असतो. थेट तेथे चढाई करून जाण्याचा मोह काहींना आवरता येत नाही. अतिउत्साहाने केलेला हा प्रयत्न काही अंतर गेल्यावर अपयशी ठरतो. मार्गात अवघड, जीवघेणे असे चिंचोळे चढ येतात. काही वेळा निर्णयक्षमतेचा कस लागतो.
अशावेळी साहित्याचा अभाव आणि तंत्र माहीत नसेल, तर हा प्रसंग जीवघेणाही ठरतो. त्यामुळे तंत्रशुद्ध प्रशिक्षण अत्यावश्यक आहे. तंत्रशुद्ध प्रशिक्षणाशिवाय अशा मोहिमांना जाणे धोक्याचेच ठरते. यामुळे छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील तरुण हिमाचलसह उत्तराखंड, दार्जिलिंग, सिक्कीम येथील गिर्यारोहण संस्थेत साहसी खेळाचे तंत्रशुद्ध धडे गिरवत आहेत.
काही युवक-युवती अर्धवट ज्ञानावरही ट्रेकिंगसाठी रवाना होतात. प्रसंगी कोणत्या खडकावर कसे चढायचे, यासाठी वापरावयाच्या साहित्याची परिपूर्ण माहिती असावी लागते. यासाठी तंत्रशुद्ध प्रशिक्षण बहुमूल्य ठरते. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील गिर्यारोहणाची आवड असणाऱ्या युवक-युवतींचा टक्का वाढत आहे.
शंभरहून अधिक युवकांनी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दार्जिलिंग, सिक्कीम येथील नामांकित गिर्यारोहण संस्थांमध्ये यंदाच्या हंगामात २८ ते ५० दिवसांच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे. विशेष म्हणजे, विविध प्रशिक्षण प्रवेशाकरिता पात्रता चाचणीही घेतली जाते. त्यातही या तरुण-तरुणींनी यश मिळवले आहे.
हिमाचल प्रदेशातील अटलबिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट माउंटेनिअरिंग, मनाली, नेहरू माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट, उत्तर काशी (उत्तराखंड), जवाहर इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग अॅन्ड विंटर स्पोटर्स् पहलगाम (जम्मू-काश्मीर), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग अलायईड स्पोटर्स् अरुणाचल प्रदेश, इंडियन हिमाचल सेंटर अॅडव्हेंचर अॅन्ड इको टुरिझम, सिक्कीम, हिमालयीन मॉउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट, दार्जिलिंग या शासन मान्यताप्राप्त संस्थांमधून महिनाभराचे रॉक आणि आईस क्राफ्टचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते.
बेसिक रॉक क्राफ्ट, आईस क्राफ्ट, ट्रेकिंग-माउंटेनिअरिंग ज्ञान, बेसिक नॉट (चढाईसाठी दोरीच्या गाठी मारण्याचे प्रकार), क्लाईम्बिंग रोप, बर्फात चालणे, क्लाईम्बिंग, उभी चढण, उतरण, अॅडव्हान्स प्रशिक्षणात हिमकडा यावरील आरोहण, हिमखुंट्या आदी साहित्यांची ओळख आणि प्रत्यक्षात पर्वत किंवा सुळके कसे चढायचे याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण या संस्थांमधून दिले जाते.
उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात गिर्यारोहण करण्यासाठी तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येते. त्यामुळे मोठ्या मोहिमा या प्रशिक्षणाशिवाय करू नये, मोहिमेचा आनंद घ्यायचा असेल तर प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. केवळ अर्धवट ज्ञानावर मोहीम आखून स्वतःसह दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालू नये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.