लाटपांचोरमधला राजबिंडा धनेश 
टूरिझम

लाटपांचोरमधला राजबिंडा धनेश

लहानपणी कोकणात एक मोठासा, वक्र चोचीचा पक्षी सहज दिसायचा

सकाळ वृत्तसेवा

लाटपांचोर व महानंदा अभयारण्यात धनेशला शोधत होतो. त्याच्या शोधात आम्ही दीड फूट रुंदीच्या नागमोडी वाटेने एका दरीत उतरू लागलो. स्वतःला सांभाळत दरीत उतरलो. शोध घेऊ लागलो. दहा मिनिटांतच झाडाकडे निरखून पाहिल्यावर पानांआडून चोच दिसली. तो बाहेर आला आणि तासभर आम्ही मनसोक्त छायाचित्रण केलं...

लहानपणी कोकणात एक मोठासा, वक्र चोचीचा पक्षी सहज दिसायचा. शेतात किंवा अंगणात उभे राहिलो तरी कुठेतरी दूरवर कर्कश्श आवाजात किंचाळल्यासारखा आवाज ऐकू यायचा. गावी त्याला गरुड म्हणत. आत्तासा मात्र दिसत नाही. आम्ही पक्षीछायाचित्रण करू लागलो व या बालपणीच्या आठवणी आल्या तेव्हा लक्षात आले तो गरुड म्हणजे धनेश. एक अत्यंत राजबिंडा पक्षी. हा मलबारी धनेश आता मात्र शोधावा लागतो. काळाच्या ओघात तो नामशेष होतोय की, काय अशीच भीती वाटू लागली आहे.

या धनेशचे नऊ भाऊबंद आपल्या देशात आहेत. सर्वच आकर्षक, रुबाबदार; परंतु सर्वांचीच संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. उत्तर पूर्व भारतात तसेच दक्षिण पूर्व हिमालय क्षेत्रात दिसणारा तपकिरी मानेचा धनेश निःसंशयपणे सर्वांत देखणा आहे. कुठेतरी याचे छायाचित्र पाहिले व तेव्हापासून त्याला कॅमेऱ्यात टिपण्याची ओढ लागली.

पश्चिम बंगालच्या उत्तर भागात असलेल्या लाटपांचोर व महानंदा अभयारण्याच्या परिसरात हा दिसतो, असे कळल्यावर मे २०२० मध्ये जाण्याचा बेत आखला; परंतु कोरोनामुळे तो रद्द झाला. मात्र यावर्षी एप्रिलमध्ये महानंदा-लाटपांचोरची पाच दिवसांची टूर खूपच छान झाली.

बागडोगरा विमानतळावरून लाटपांचोरला पोचलो. पहिल्या दिवशी दुपारचे जेवण झाल्यावर थोडासा वेळ छायाचित्रणाकरिता मिळाला. उद्या प्रयत्न करू या, असे आमचा गाईड पराग गुरुंग म्हणाला. डाईनिंग रूममध्ये चहा घेताना तिथे एक बंगाली छायाचित्रकार लंगडत लंगडत आला. बहुदा पायाच्या हाडाचे फ्रॅक्चर झाले असावे, असे डॉक्टरच्या नजरेतून मी हेरले; पण चेहरा मात्र आनंदी होता... त्याचे कारण कळले तेव्हा धक्का बसला. त्याला धनेश गवसला होता. त्याची छायाचित्रे तो दाखवू लागला. म्हणाला, ‘‘अत्यंत अरुंद पायवाट व खोल दरीजवळून जावे लागले. तपकिरी मानेचा धनेश दिसल्यावर भान विसरलो आणि घसरून पडलो. नशीब दरीत कोसळलो नाही.’’ तो हे सांगत असताना मी धसकाच घेतला. कारण या ट्रीपमध्ये मी ज्या दहा जणांच्या टीमचे नेतृत्व करत होतो व त्यात काही रिटायर्ड सदस्यही होते. त्यामुळे आता चिंता वाढली होती.

दुसऱ्या दिवशी सकाळीच दोन तास तेथील स्थानिक पक्ष्यांचे छायाचित्रण करून झाल्यावर एका टापूवर जमलो. येथूनच तपकिरी मानेच्या धनेशचे क्षेत्र सुरू होणार होते. तिथे अजून एक ग्रुप होता. ते गेले तीन दिवस प्रयत्न करत होते; पण मनासारखी छायाचित्रं त्यांना मिळाली नव्हती. आपल्याला खोल दरीत उतरावे लागेल. रस्ता नागमोडी अन्‌ जेमतेम दीड फूट रुंद. वाटेत दगड व वेली. कॅमेरा, ट्रायपॉड घेऊन स्वतःला सांभाळून उतरायला जमेल ना, असे सर्वांना विचारल्यावर सर्वच उत्साहात तयार झाले. खूप नाही थोडेसेच; पण खोल उतरावे लागेल, असे म्हणत आमचा मार्गदर्शक पुढे निघाला. आम्ही त्याच्यामागे चक्क वीस मिनिटे चालत, स्वतःला सांभाळत दरीत उतरलो. तिथे एका किंचित सपाट जागेवर आम्ही पोहोचलो. शोध घेऊ लागलो. अगदी दहा मिनिटांतच परागने एका झाडाकडे बोट दाखवले. निरखून पाहिल्यावर पानांआडून तपकिरी डोके व मोठी पांढुरकी चोच दिसली. थोडा वेळ धीर धरल्यावर तो बराच बाहेर आला. ९०-१०० सेंमी आकाराचा, आकर्षक तपकिरी रंगाचे डोके, मान व पोटाकडचा भाग, डोळ्याभोवतालचा भाग निळा, गळ्यावर तांबडा पिशवीसदृश भाग, चोच भली लांब व मजबूत आणि विशेष म्हणजे त्या चोचीवर काळसर पट्टे. जितके वर्षे वय तितके पट्टे असतात.

पाठोपाठ मादीही बाहेर आली. जवळजवळ तासभर आम्ही मनसोक्त छायाचित्रण केले व त्यांना अधिक त्रास न देता परतायचे ठरवले. खूप दमलो होतो. येताना उतार होता; मात्र जाताना हाच रस्ता संपूर्ण चढून पार करायचा होता. खूप दमछाक झाली. थांबत थांबत, एकमेकांना आधार देत कसेबसे चढलो. टापूवर पोहोचल्यावर विसावा घेतला व सर्वांना चांगली छायाचित्रे मिळाल्याची खात्री केली. टूरच्या पुढील तीन दिवसांत पुन्हा मात्र हा तपकिरी मानेचा धनेश दिसला नाही.

एकेकाळी येथे सहजपणे दिसणारा या धनेशची येथील संख्याही कमी झाली होती. आम्हाला एक सुंदर, दुर्मिळ पक्षी दिसल्याचा व चांगली छायाचित्रे मिळाल्याचा कोण आनंद झाला होता. पुढील तीन दिवसांतही अनेक आकर्षक पक्ष्यांचे छायाचित्रण करून दीर्घ काळ आठवणीत राहणाऱ्या त्या तपकिरी मानेच्या धनेशाचे छायाचित्रे कॅमेऱ्यात बंदिस्त करून लाटपांचोर दौऱ्याची सांगता केली.

डॉ. सुधीर गायकवाड इनामदार

sudhir_gaikwad03@yahoo.co.in

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chetan Tupe won Hadapsar Assembly Election 2024: हडपसरमधील परंपरा मोडत चेतन तुपे यांचा विजय; प्रशांत जगताप यांचा पराभव

UP By Election: उत्तरप्रदेशात सुद्धा भगवे यश! पोटनिवडणुकीत योगींनी लोकसभेचे अपयश धुवून काढले, जाणून घ्या करणे

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: वांद्रे पूर्वमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई विजयी

Nanded Lok Sabha By Election Result 2024 : पोटनिवडणुकीतही काँग्रेसला मोठा झटका; गमावलेली नांदेडची जागा भाजपनं जिंकली

BJP Pravin Datke Won Nagpur Central Election : नागपूर मध्यचा गड भाजपने राखला, भाजपचे प्रवीण दटके 11516 मतांनी विजयी

SCROLL FOR NEXT