गजलडोबाच्या टूरमध्ये तब्बल १११ प्रजातींच्या पक्ष्यांची छायाचित्रे आम्ही टिपली. त्यातही लक्षात राहिले दररोज बोटीच्या प्रवासाला जाताना दिसणारे सावरीचे झाड.
- डॉ. सुधीर गायकवाड इनामदार
गजलडोबाच्या टूरमध्ये तब्बल १११ प्रजातींच्या पक्ष्यांची छायाचित्रे आम्ही टिपली. त्यातही लक्षात राहिले दररोज बोटीच्या प्रवासाला जाताना दिसणारे सावरीचे झाड. या झाडावर अनेक पक्षी येतात आणि त्यांची ती मैफल कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी प्रत्येकालाच खुणावणारी होती. सुमारे २५ प्रकारचे पक्षी आम्ही केवळ त्या सावरीच्या झाडावर छायाचित्रित केले, त्या पक्ष्यांच्या झाडाची गोष्ट...
पश्चिम बंगालच्या उत्तर भागात असलेल्या गजलडोबातील बदकांची छायाचित्रे काही वर्षांपूर्वी पाहिली होती, तेव्हापासून गजलडोबने मनात घर केले होते. तिथे जाण्याचे ठरवले होते. तो योग या फेब्रुवारी महिन्यात आला. मुंबई ते बागडोदरा हा विमानाचा प्रवास करून दुपारी सिलिगुडीतील बागडोदराला पोहोचलो व तेथून सव्वा तास अंतरावर असलेल्या गजलडोबाला दुपारी जेवणाच्या वेळेस पोहोचलो. बोरोली हे रिसॉर्ट आधीच बुक केले होते. इंटरनेटवर बोरोली रिसॉर्टची छायाचित्रे पाहूनच ते पसंत केले व त्यातही आमचे तेथील मार्गदर्शक रतन दा यांनीही तेच सुचवले होते. परिसरही खूप छान वाटला. झाडे खूप होती. नंतर कळले, की बोरोली हे तेथील स्थानिक आढळणाऱ्या एका छोट्या चविष्ट माशाचे नाव असून, त्यावरूनच रिसॉर्टचे नाव बोरोली ठेवले होते. जेवण अक्षरशः उरकले; कारण बोट सफारी गाठायची होती.
पूर्वेकडील प्रदेशात सूर्यास्त लवकर होतो. दोनच माणसे बसू शकतील अशा वल्हवायच्या बोटीतून आम्ही निघालो. १२ माणसे होतो, त्यामुळे सहा बोटी बुक केल्या होत्या. अगदी पाचच मिनिटांत मोठी लालसरी बदकांचा थवाच दिसला. गजलडोबाला जायचे निश्चित केले तेव्हा आम्हाला हव्या असणाऱ्या पक्ष्यांच्या यादीत सर्वांत वर नाव होते या मोठी लालसरी बदकाचे (रेड क्रेस्टेड पोचार्ड). आपल्याकडे क्वचित कधी तरी हे दिसते; पण अतिशय लाजरे, निरीक्षण व छायाचित्रणाकरिता अजिबात जवळ येऊ देत नाहीत. त्यामुळे आपल्याकडे त्याची चांगली छायाचित्रे टिपता येत नाहीत. येथे मात्र खूप जवळून त्यांची छान छायाचित्रे टिपता आली. अर्धा तास त्यांची छायाचित्रे टिपून झाल्यावर पुढे निघालो. शेंडी बदकाच्या (टफटेड डक) दोनतीन जोड्या दिसल्या. त्यांचे छायाचित्रण करून पुढे दोन दुर्मिळ बदके दूरवर दिसली. रतन दाने ‘खुरपी बदके (फालकेटेड डक)’ असे सांगत, त्या दिशेने बोटी वळवल्या; पण त्यांनी मात्र फार जवळ येऊ दिले नाही. इतर काही नेहमीचीच बदके दिसली. काळोख होत आला तसे आम्ही माघारी परतलो. सकाळी साडेसहाला तयार राहायला सांगून रतन दा त्यांच्या निवासी परतले.
दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजताच चहा घेऊन आम्ही तयार होतो. बोटीकडे नेण्याकरिता चार सीटवाल्या इलेक्ट्रिक रिक्षा, टोटो यायची वाट पाहत होतो. समोरच काटेसावरीचे झाड होते. पाने गाळून झाडावर लाल रंगाची फक्त फुलेच फुले होती. त्यावर मोठा तांबट (ग्रेट बार्बेट) दिसला. उजाडू लागले तसे अजूनही काही पक्षी येऊ लागले; परंतु आमच्या टोटो आल्यामुळे व आम्हाला आज पाण्यात दूरवर सामान्य समुद्री बदकांसाठी जायचे असल्यामुळे आम्ही लगेच निघालो. उद्या सकाळी सावरीवरचे पक्षी पाहू असे ठरले. त्या दिवसभरात बोटीतून आम्ही ३०-३२ दुर्मिळ पक्षी छायाचित्रित केले. रात्री रिसॉर्टच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाताना जवळूनच घुबड उडाल्याचे जाणवले. जेवण झाल्यावर आम्ही त्याचा शोध घेतलाच. ते होते बहिरी घुबड. त्यानेही खूप अप्रतिम छायाचित्रणाची संधी दिली. एक दुर्मिळ घुबड अवचितच मिळाल्यामुळे सर्व ग्रुप मेंबर्स खुश होते. सकाळी उजाडताच सर्व जण काटेसावरीजवळ एकत्र आलो. चहासुद्धा तिथेच मागवला. सर्वप्रथम बलाकचोच धीवर बाजूच्या झाडावर येऊन बसला. त्याचे छायाचित्र टिपायला सर्व पळताच सावरीवर मोठा तांबट हजर झाला. लाल फुलावर तो येताच सर्वांचे कॅमेरे खटाखट वाजू लागले.
मग आला अतिशय सुंदर व आकर्षक रंगाचा निळकंठी तांबट (ब्ल्यू थ्रोटेड बार्बेट), फुलातील कीटक वेचू लागला, तोच वरच्या फांदीवर हेअर क्रेस्टेड ड्रॉन्गो (शेंडीवाला कोतवाल) येऊन बसला. आडव्या येणाऱ्या फांद्यांतून एखादा मोकळा अँगल मिळतोय का, याकरिता सर्वांची कसरत सुरू होती. हिमालयीन गिधाड, असे रजनीश ओरडला. सर्व जण सावरीच्या फांद्यांआडून आकाशाकडे पाहू लागले. राजेशाही थाटात गिद्धराज आकाशात घिरट्या घालत होते. फुलवस ब्रेस्टेड वूडपेकर, ग्रेट मैना असे २०-२२ प्रजातींचे पक्षी तासाभरातच पाहिले. टोटो येऊन कधीच थांबल्या होत्या; पण त्याकडे कुणाचेच लक्ष नव्हते. शेवटी रतनदांचा फोन आला तेव्हा नाइलाजाने सर्व बोटीकडे निघाले. शेवटच्या दिवशीदेखील बोटीकडे जाताना व दुपारी परतताना ज्याला जमेल तसे प्रत्येक जण सावरीच्या झाडाजवळ घुटमळू लागला व दिसणारा एखाद्दुसरा पक्षी टिपू लागला. गजलडोबाच्या त्या टूरमध्ये तब्बल १११ प्रजातींच्या पक्ष्यांची छायाचित्रे आम्हाला टिपता आली व त्यापैकी किमान २५ प्रकारचे पक्षी आम्ही केवळ त्या सावरीच्या झाडावर छायाचित्रित केले. पक्ष्यांच्या त्या झाडासह अनेक सुंदर आठवणी व कॅमेऱ्यात शेकडो छायाचित्रे टिपून आम्ही मुंबईला परतलो.
sudhir_gaikwad03@yahoo.co.in
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.