कर्नाटक व तमिळनाडूच्या काही मोजक्याच पट्ट्यात दिसणारा निलगिरी शोलकिली. निळाशार चिमुकला पक्षी समोरच्या झाडीत लपला होता. काट्याकुट्यांमधून अर्धवट दिसत होता.
- डॉ. सुधीर गायकवाड इनामदार
कर्नाटक व तमिळनाडूच्या काही मोजक्याच पट्ट्यात दिसणारा निलगिरी शोलकिली. निळाशार चिमुकला पक्षी समोरच्या झाडीत लपला होता. काट्याकुट्यांमधून अर्धवट दिसत होता. चिडीचूप राहिलो त्यामुळे थोड्याच वेळात हा बाहेर आला. याचा अधिवास नष्ट होऊ लागल्यामुळे हा हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या दुर्मिळ होत चाललेल्या पक्ष्याचे छायाचित्र काढून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.
वन्यजीव छायाचित्रकाराला नवनवीन वनप्रदेश पालथे घालून तेथील वन्यजीवांचे छायाचित्रण करण्यात जो आनंद मिळतो त्याला तोड नाही. त्यामुळे मिळेल त्या फावल्या वेळात फारशा परिचित नसलेल्या जंगलांचा शोध घेऊन त्याची माहिती मिळवणे व तेथे छायाचित्रणाकरिता टूर आखणे हा आवडता छंदच. या मोहिमेत कधीकधी निराशासुद्धा पदरी पडते व त्याकरिता मानसिक तयारी असावी लागते. असेच काहीसे घडले आमच्या अण्णामलाईस टूरबाबत.
डॅनिश हा निष्णात पक्षिमार्गदर्शक. त्याच् बरोबर आम्ही अनेक दुर्मिळ जंगलांमध्ये भटकंती करून अनेक दुर्मिळ पशुपक्ष्यांची छायाचित्रे टिपली आहेत. अंदमान, थात्तेक्कड, अरुणाचल, आसाम, काश्मीर असे दौरे करता करता डॅनिश कधी जवळचा मित्र झाला ते कळलेच नाही. त्याच्याबरोबर पक्ष्यांच्या अनेक गप्पा वेळोवेळी रंगत असतात. असेच बोलताबोलता एकदा म्हणालो, मला अण्णामलाईस-वालपराइ करायचे आहे. तो प्रदेश अजून फारसा कुणी वन्यजीव छायाचित्रणाच्या दृष्टीने पाहिलेला नाही. त्याने होकार भरला व ग्रुप तयार झाला.
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईहून विमानाने सकाळीच कोचीला पोहोचलो. वास्तविक कोईमतूर विमानतळ वालपराइचे जास्त जवळ आहे; पण आम्ही मात्र कोचीला उतरून पुढे वाटेत पक्षीनिरीक्षण करत वालपराइला संध्याकाळी पोहोचायचे असा बेत आखला होता. एका छोट्या घरगुती हॉटेलमध्ये नाश्ता करून पुढे निघालो. थोडेफार पक्षी छायाचित्रणदेखील केले. हत्तींचा एक कळप जवळून पाहिला. पुढे दुपारचे दाक्षिणात्य केळपानावरचे चविष्ट जेवण करून निघालो. अगदी दहाच मिनिटे झाली असतील तोच डॅनिशने गाडी थांबवायला सांगितले. धावत्या गाडीतूनच त्याला चक्क डॉलर बर्ड दिसला. रस्त्यापासून अगदीच थोड्या अंतरावर होता. आमचा विश्वासच बसत नव्हता. यापूर्वीही हा लाजरा पक्षी दोन वेळा पहिला होता; परंतु फार दुरून. लांब दरीत. इथे मात्र अगदी जवळ एका वाळलेल्या सुक्या खोडावर आरामात बसला होता.
पक्षी छायाचित्रण करताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची... गाडीतून छायाचित्रण करणे जास्त संयुक्तिक, कारण पक्षी सहसा पटकन उडून जात नाहीत; पण गाडीतून खाली उतरताच ते पटकन उडून जातात. डॉलर बर्डचे उत्कृष्ट छायाचित्रण करून पुढे निघालो. सुरुवात तर छान झाली होती. संध्याकाळी जरा उशिराच मुक्कामी पोहोचलो, त्यामुळे परिसर फारसा कळला नाही. मात्र सकाळी छायाचित्रणाकरिता बाहेर पडलो तेव्हा मात्र सर्वत्र चहाचे मळेच मळे दिसले. अगदी रेखीव व नियोजनबद्द पद्धतीने लागवड केलेल्या या हिरव्यागार मळ्यांचे छायाचित्र सर्वजण आप-आपल्या मोबाईलमध्ये करू लागले. हत्तींचा वावर असल्यामुळे रात्रीचे नियम कडक आहेत. फारसे छायाचित्रण करता आले नाही. मात्र उडणारे शेकरू दिसले व ते आम्ही न चुकता आमच्या कॅमेऱ्यात बंदिस्त केले.
तिसऱ्या दिवशी तामिळनाडूतील अण्णामलाईस जायचा बेत होता. तिथे पोहोचण्याकरिता वर-वर जाणारी गोल ४१ वळणे लागतात, ज्यांना हेरपिन असे म्हणतात. अतिशय सुंदर असा हा प्रदेश. परंतु अण्णामलाईसनेदेखील निराशाच केली. येथेही फारसे पक्षी दिसले नाहीत. तीन दिवसांत फारसे पक्षी न दिसल्यामुळे सर्वांची निराशा झाली. चौथ्या दिवशी वालपराइमध्ये न थांबता आम्ही मुन्नार व थट्टेक्कडला जाण्याचा निर्णय घेतला. पहाटे साडेतीनला वालपराइ सोडले व नऊच्या सुमारास मुन्नार गाठले. रस्त्याच्या कडेलाच आमची मिनी बस थांबवून खाली उतरलो. येथे तासभर थांबलो व तेवढ्या वेळात १०-१२ प्रकारचे पक्षी टिपले. ब्लॅक अँड ऑरेन्ज फ्लाय कॅचर, ग्रे हेडेड कॅनरी फ्लाय कॅचर, पलानी लाफिंग थ्रश अशा दुर्मिळ पक्ष्यांची छायाचित्रे टिपली. तोच निलगिरी शोलकीली असे डॅनिश ओरडला. एक निळाशार चिमुकला पक्षी समोरच्या झाडीत लपला होता. काट्याकुट्यांमधून अर्धवट दिसत होता. याला निलगिरी ब्ल्यू रॉबिन असेही म्हणतात. ९०० ते २१०० मीटर उंचीवरच्या गवताळ कुरणाशेजारच्या खुज्या जंगलात (अशा जंगलांना शोला फॉरेस्ट म्हणतात) हा दिसू शकतो. चिडीचूप राहिलो त्यामुळे थोड्याच वेळात हा बाहेर आला. १५ सेंमी आकाराचा हा सुंदर पक्षी केरळ, कर्नाटक व तामिळनाडूच्या काही मोजक्याच पट्ट्यात दिसतो. याचा अधिवास नष्ट होऊ लागल्यामुळे हा सुंदर पक्षी हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. संध्याकाळच्या विमानाने मुंबईला परतायचे होते, त्यामुळे मुन्नारमधील छायाचित्रण आटोपून आम्ही थट्टेक्कड गाठले. तिथेही दोन तास डॅनिशने तयार केलेल्या लापणात बसून सात-आठ पक्ष्यांचे छायाचित्रण केले व परतीच्या विमानाकरिता कोची विमानतळ गाठले. अण्णामलाईस-वालपराइ-थट्टेक्कड-मुन्नार असा हा धावपळीचा दौरा आटोपून मुंबईला परतलो.
sudhir_gaikwad03@yahoo.co.in
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.