रामटेक (जि. नागपूर) : निसर्गाने कधीतरी पाहिलेले सुंदर स्वप्न प्रत्यक्षात कॅनव्हॉसवर रेखाटले ते क्षेत्र आहे रामटेक. जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळाची क्षमता असलेल्या रामटेकला भेट दिल्यास आत्मिक समाधान नक्की मिळेल, यात शंका नाही. रामटेक येथे रामगिरी टेकडीवर यादव नृपती राजा रामदेवराय याने निर्माण केलेले १३ व्या शतकातील भव्य श्रीराम-जानकी मंदिर आणि लक्ष्मणाचे मंदिर आहे. गडमंदिर परिसरात अगस्ती ऋषींचे आश्रम आणि गोपालकृष्ण मंदिर आहे. वाकाटककालीन वराह व राजा त्रिविक्रम मंदिर आहे. मूर्तीपूजा सुरू झाल्यानंतरची दोन मंदिरे येथे आहेत. केवल नरसिंह व रूद्र नरसिंह मंदिरात काळ्या पाषाणाच्या भव्य आठ फुटी मूर्ती आहेत. येथे सिंदूरबावडी आहे. महाकवी कालिदासांनी येथेच मेघदूत या महाकाव्याची रचना केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने येथे महाकवी कालिदासांचे भव्य स्मारक निर्माण केले आहे.
येथे विदर्भ वैधानिक महामंडळाच्या निधीतून भव्य ओमची प्रतिकृति निर्माण करण्यात आली आहे. वनवासात जात असताना प्रभू श्रीराम, माता जानकी व लक्ष्मण यांनी रामटेकला काही काळ विश्राम केला होता. याच ठिकाणी राजा दशरथ यांचे निधन झाल्याची बातमी मिळाल्याने श्रीरामांनी रामटेक येथेच राजा दशरथांचे पिंडदान केल्याचे सांगितले जाते.
रामटेकला महानुभाव पंथाचे संस्थापक स्वामी चक्रधर यांनीही काही काळ वास्तव्य केले होते. गडमंदिराच्या पायथ्याशी उत्तरेला कर्पूर बावडी आहे. केवळ दगडांपासून निर्मित ही बावडी स्थापत्यशास्राच्या अभ्यासकांसाठी उत्तम नमूना आहे. कर्पूर बावडीजवळ सीएसी ऑलराऊंडर नागपूर यांचे साहसी क्रीडा केंद्र आहे. याठिकाणी साहसी क्रीडांबरोबरच आपत्ती व्यवस्थापनाचे धडेदेखील मिळतात. शहराच्या उत्तरेला कालंका मंदिर (काली माता मंदिर) आहे. राष्ट्रकूटकालिन असलेले हे मंदिर वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. या मंदिरांसमोरच जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र शांतिनाथ मंदिर समूह आहे.
येथे प्रसिद्ध अंबाळा तलाव आहे. भारतातील अनेक भागातून पिंडदानासाठी येथे हजारो भाविक येत असतात. शहराला लागून इंग्रजांनी कपिला व सूर नदीवर बांधलेले रामसागर (खिंडसी) धरण आहे. येथे राजकमल जलक्रीडा केंद्र आहे. येथे पर्यटक बोटिंगचा मनमुराद आनंद घेतात. इतरही अनेक सुविधा याठिकाणी आहेत. पर्यटकमित्र चंद्रपाल चौकसे यांचे हे जलक्रीडा केंद्र भारतातील सर्वात स्वच्छ केंद्र असल्याने पुरस्कृत करण्यात आले आहे.
आचार्य विद्यासागर महाराजांच्या आज्ञेने नवनिर्मित पंचबालयती मंदिर प्रेक्षणीय आहे. रामटेक-मनसर मार्गावर मनसर येथे हिडिंबा टेकडीवर पुरातत्व विभागाने उत्खनन केले असून त्याठिकाणी भव्य असे विटांचे बांधकाम आढळून आले आहे. ते वाकाटककालीन असल्याचे तिथे आढळलेल्या मूर्ती, वस्तूंमधून सिद्ध झाले आहे. मनसर येथे नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर भव्य असे रामधाम-कृष्णधाम पर्यटकमित्र चंद्रपाल चौकसे यांच्या संकल्पनेतून निर्माण झाले आहे.
चित्रकूट पर्वताच्या प्रतिकृतीत वैदर्भीय अष्टक्षविनायक, महाराष्ट्रातील अष्टविनायक, बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती तसेच माता वैष्णोदेवीचे मंदिर आहे. चित्रकूट पर्वताच्या उजवीकडे भव्य अशी ओमची प्रतिकृती निर्माण करण्यात आली आहे. प्रतिकृतीच्या आत रामायणातील प्रसंग मूर्तीरूपात, चित्ररूपात चितारण्यात आले आहेत. बाहेरील भागात महाभारतातील प्रसंग चितारण्यात आले आहेत. तिथून बाजूलाच एका गुहेत बाबा अमरनाथ यांची बर्फाची प्रतिकृती निर्माण करण्यात आली आहे. या ठिकाणावरून बाहेर येऊन पूर्वेकडील कृष्णधामकडे आपण आकर्षित होतो. प्रवेशद्वारातून आत गेल्यास गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर तोलून धरलेली भगवान श्रीकृष्णाची मूर्ती दिसते. तर त्याच्या समोरील एका भव्य थिएटरमध्ये "शिवजी की बारात' भव्य मूर्त्यांच्या स्वरूपात व थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर करून दाखविली जाते. त्याच्या बाजूला एका भयपटासारख्या गुहेची निर्मिती करण्यात आली आहे. तिथून अनुभव घेऊन बाहेर येताच बाजूला विविध प्रकारच्या दगडांचे संग्रहालय आहे. तिथून पुढे गेल्यास कृषी पर्यटन आहे. या ठिकाणी बैलगाडीतून फेरफफटका मारण्याची व्यवस्था आहे. राजस्थानी नृत्य, जादूचे प्रयोग आणि बच्चे कंपनीसाठी "टॉय टेन' देखील आहे.
मनसरवरून आपण साधारण २५-३० किमी अंतरावरील नागपूर-जबलपूर महामार्गावर तोतलाडोह येथील पेंच राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊ शकतो. मात्र त्याचे ऑफलाईन किंवा ऑनलाईन बुकिंग करणे आवश्यक आहे. येथे पट्टेदार वाघ, जंगली रेडे (बायसन), काळवीट, हरिण, मोर यांचे दर्शन नक्कीच लाभते. नगरधन या रामटेकपासून दहा किमी अंतरावरील गावात वाकाटककालीन भव्य लाल किल्ला आहे. किल्ल्याची भव्यता पाहून वाकाटकांच्या राजधानीचे हे शहर त्या काळात कसे असेल, याची आपण कल्पना करू शकतो. किल्ल्यात असलेली पायविहिरीची (बावडी) भव्यता पाहून आपण चकीत होतो, तर त्याचे उजवीकडे वीस फुटांच्या खाली असलेली पिण्याच्या पाण्याची विहीरही दृष्टीस पडते.
रामटेक येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी तपश्चर्या केल्याचे ठिकाण अंबाळा येथील खाक चौक येथे आहे. जमिनीच्या आतमध्ये साधारण तीस-पस्तीस फुटांखाली भव्य बांधकाम करण्यात आले असून तेथील अनेक खोल्यांतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि स्वामी सीतारामदास महाराज यांनी वापरलेल्या वस्तू, पलंग, गाद्या, उशा देखील अतिशय सुबक पद्धतीने जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. रामटेकला पावसाळ्यात भेट दिल्यास रामगिरीवर ढग आपल्या चेहऱ्याला स्पर्श करून जाण्याचा अवर्णनीय अनुभव येतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.