Travel around the world sakal
टूरिझम

प्रवास करा जगभर

प्रत्येक माणूस त्याच्या-त्याच्या कामात व्यग्र असतो; पण त्यातूनही वेळ काढून जास्तीत जास्त फिरलं पाहिजे. ‘सत्य नेमकं कसं असतं?’ हे प्रवास केला की उमगतं.

प्रफुल्ल वानखेडे

प्रत्येक माणूस त्याच्या-त्याच्या कामात व्यग्र असतो; पण त्यातूनही वेळ काढून जास्तीत जास्त फिरलं पाहिजे. ‘सत्य नेमकं कसं असतं?’ हे प्रवास केला की उमगतं.

प्रत्येक माणूस त्याच्या-त्याच्या कामात व्यग्र असतो; पण त्यातूनही वेळ काढून जास्तीत जास्त फिरलं पाहिजे. ‘सत्य नेमकं कसं असतं?’ हे प्रवास केला की उमगतं. जगाच्या तुलनेत आपण कुठे आहोत, नेमकं काय करायला हवं, काय नको ते कळतं. प्रवास माणसाला नवनवी आव्हानं पेलायची ताकदही देतो. आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या माणूस म्हणून अधिक प्रगल्भ होतो. तरुण वयात शक्य होईल तेवढा प्रवास करा मित्रहो, त्यातून नक्कीच नव्या जगातला ‘सर्वसमावेशक’ माणूस घडू शकतो. संसार, जबाबदाऱ्या, ईएमआय आणि बिझी, बिझी, बिझी कल्चर घात करायच्या आत जागे व्हा!

पूर्वी ग्रामीण भागात फार प्रवास होत नसायचा. महत्त्वाचा उद्योग शेती. त्यामुळे गाव, घर ते शेत आणि शेतातून घरी. कधी गरज पडली तर फार फार तालुक्याच्या ठिकाणापर्यंत प्रवास. तेही अगदीच कधीतरी. आमच्या अण्णांनीही सगळं आयुष्य गावातच काढलं. शिक्षण नव्हतं, पण पोटापुरती शेती होती. गावातले इतर अनेक जे मुंबई-पुण्याला असायचे, त्यांची जमीन अण्णा करायचे. त्यामुळे त्यांचं बऱ्यापैकी भागायचं. कधी लिखापढीची किंवा सरकारी कामं असतील तर माझे बाबा करून द्यायचे. त्यामुळे त्यांचं तसं कधी अडायचं नाही. वडिलांचे ते चुलत भाऊ, पण चांगलं सख्य होतं. पूर्वी तसे सगळेच बऱ्यापैकी गुण्यागोविंदाने राहत. थोड्याफार कुरबुरी असल्या तरी नात्यांची वीण फार घट्ट असायची. आत्ताच्यासारखे भले ते वाढदिवसाला, दिवाळीला व्हॉट्सॲपवर शुभेच्छा देत नसतील, रोज गुड मॅार्निंगची फुलं पाठवत नसतील; पण मायेचा ओलावा फारच खोल होता.

समाज माध्यमांचा कचकड्याचा मुखवटा नव्हता, त्यामुळे माणसं खूप खरी होती. माझी थोरली आई म्हणजे अण्णांची पत्नी. त्या माऊलीचं माझ्यावर विशेष प्रेम. मी घरात सर्वात लहान. त्यात फार किडकीडीत. त्यामुळे तिचं लक्ष नेहमी मला काहीतरी दुधदुभतं खायला घालण्यावर. अण्णा पण तसेच. मलाही दोघांबद्दल प्रचंड प्रेम होतं आणि आहे.

अण्णा तरी थोडेफार गाव सोडून आजूबाजूच्या गावात, तालुक्याला किंवा दोन-चार वर्षांतून मुंबई-पुण्याला फिरायचे; पण आमची थोरली आई मात्र भावकीतलं कोणाचं लग्न असेल तर त्या वेळीच काय ते ट्रक, टेम्पोत बसून गाव सोडायची, नाहीतर आयुष्यभर ती गाय, बैलं, म्हशी आणि तिची शेतीची कामं यात राब राब राबायची.

बरं तिला याचं फार काही वैषम्य नव्हतं. तिची ती प्रायोरिटीही नव्हती. शेतात कामाला आमची थोरली आई म्हणजे लय जबरा, कडक पण बाहेर गेली की बुजायची, लाजायची, घाबरायची. पूर्वी दळणवळणाची अपुरी साधने, शिक्षण प्रकारच नव्हता. दोघेही मनानं अत्यंत चांगले; पण बाहेर प्रवासाला कधीच पडायचे नाहीत. एक अनामिक भीती आयुष्यभर त्यांच्यात होती. कोणी फसवलं, लुटलं, आपणच चुकलो किंवा अजून बरंच काही काही...

माझे वडील तसे शिकलेले. फिरायला त्यांना आवडायचं. त्यामुळे त्यांच्यासोबत मलाही लहानपणी फिरायला मिळायचं. पुढे शाळेत वेगवेगळ्या स्पर्धा, शिक्षण आणि कॉलेजमुळे आपसूकच गाव सोडावं लागलं. गावाला गेलं की घरच्यांना कौतुक वाटायचं; तेवढंच थोरल्या आईलापण वाटायचं. ते दोघेही आयुष्यभर गावातच राहिले, परिस्थितीने म्हणा, शिक्षणाच्या कमतरतेने म्हणा, संसाराच्या रहाटगाडग्यात कधी बाहेरच पडता आले नाही. बरं त्यामुळे फार काही त्यांना फरक पडला नाही. २१ व्या शतकाचा कोणताही मागमूस त्यांना नव्हता. त्याची ओढही नव्हती आणि माहितीही नव्हती.

काळ बदलला, वेळ बदलली. प्रवासाचा वेग वाढला. विज्ञानाने चमत्कार केले. अगदी चौथी औद्योगिक क्रांती चालली. सगळं जग एकत्र आलंय. तरी आमच्या थोरल्या आई आणि अण्णांसारखी कोट्यवधी माणसं आजही आपल्या आजूबाजूला असतात. ग्रामीण भागातच नाहीत तर अगदी शहरी भागातही.

कित्येक शिकले सवरले माझे मित्र आहेत, ज्यांनी आजपर्यंत महाराष्ट्राच्या बाहेरही पाऊल टाकले नाही. अनेक जण हजारो, लाखो रुपये कमावतात; पण आयुष्याच्या रहाटगाडग्यात असे अडकतात की प्रवासाला उसंतच मिळत नाही. पूर्वी शिक्षण नव्हते, पैसे नव्हते, दळणवळणाची एवढी साधने नव्हती, त्यामुळे बरी कारणं तरी होती. आता सगळं असूनही-बिझी, बिझी, बिझी!

वन रूम मधून, वन बीएचके, पुढे टू, थ्री, गाडी, सेकंड होम, मोठी गाडी, नवा फोन, इलेक्ट्रॉनिक्स, गॅझेट, खर्चात वाढ, पुन्हा तणाव, ईएमआय वाढतील तसे पुन्हा वाढीव पगाराची नवी नोकरी, पुन्हा नव्याने करीयर सेट करायला धावाधाव... शांतपणे थांबाचं नाही. कोरोनाने तर अजून मोठं कारण दिलंय... फिरणं कमी झालं, प्रवास कमी झाला तर आयुष्यात प्रगतीच थांबते, असं माझं वैयक्तिक मत आहे. प्रवासाने मला खूप काही शिकवलं! खूप फिरलो, गेली वीस-बावीस वर्ष Life On Wings हे स्टेटस माझ्या मोबाईलवर, लॅपटॅापवर सतत आहे.

लहानपणी वडिलांनी इंग्रजी शिकवताना एक वाक्य सांगितलेलं - Life is not for resting, but for moving... हे हृदयात घर करून बसलंय. आपलं जीवन नक्की कसं जगतोय याचं आत्मपरीक्षण करण्याची वेळ म्हणजे महाराष्ट्रात, भारतात आणि जगात फिरतानाचा प्रवास, अनुभव... हे करताना नैतिकमूल्ये, यशापयशाचा विचार होतो. नव्या ठिकाणी, नवी लोकं भेटतात, पुढच्या आयुष्यात नक्की काय वेगळं करायचं, स्वतःसाठी, कुटुंबासाठी, कंपनीसाठी, सहकाऱ्यांसाठी, मित्र परिवारासाठी काय वेगळं करू शकतो याचा विचार मिळतो. परदेशातून परत आलो की समाजासाठी, देशासाठी काहीतरी करण्याची, पुन्हा परत देण्याची प्रेरणा मिळते. सिंहावलोकन होते, आत्मपरीक्षण होते. नवी ऊर्जा मिळते आणि नव्या दमाने काम सुरू होते.

त्या त्या भागातील स्थानिक खाद्यपदार्थ, परंपरा, सण, कलाकृती, आश्चर्ये, ठेवा, तेथील रहिवाशांचे शिष्टाचार आणि चालीरीती बरेच काही शिकवून जातात. आयुष्य समृद्ध करतात. वेगळ्या दृष्टिकोनातूनही माणसाचे आयुष्य उलगडत जाते. मुंबईने मला स्वप्न दिली, ऊर्जा दिली. ओळख दिली, श्वास दिला, ध्यास दिला. दिल्लीत गेलो तर सत्तेची हवा काय असते ते कळाले. पानिपतात गेलो तर त्वेषानं पेटून उठलो, लढायला बळ मिळालं. दक्षिण भारतात संस्कार आणि भक्ती मिळाली. उत्तर भारतात कष्टाळू वृत्ती मिळाली तर पूर्व भारताने नैसर्गिक सौंदर्य जपायला शिकवलं. गोव्याने आराम करायला, सुशेगात राहायला शिकवलं तर पुण्यानं कसं बोलावं ते सांगितलं. प्रत्येक राज्याच्या, शहराच्या आठवणी काहीतरी निश्चित शिकवून गेल्या.

युरोपने स्वच्छता, आदर आणि विज्ञान-तंत्रज्ञानाचं महत्त्व पटवून दिलं. गल्फमध्ये श्रीमंती आणि अवाढव्य स्वप्नही पैसा असला की पूर्ण होतात हे कळलं. व्हिएतनाममध्ये जेवण नक्की वाढावं कसं, खावं कसं ते शिकलो. तिथली लढवय्यी वृत्ती तर अविस्मरणीय. जर्मनीमधून औद्योगिक संशोधन आणि जगाच्या पुढे राहणं म्हणजे नक्की काय ते पाहिलं. श्रीलंकेतील स्वच्छता आणि बांगलादेशकडून कमीत कमी वेळात जगात मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काय काय चमत्कार करता येऊ शकतात, तर चीनमधली अचंबित करणारी महाकाय मार्केट्स, त्यांची जग काबिज करायची राक्षसी वृत्ती. सिंगापूर तसेच इतर अनेक प्रगत देशांमध्ये स्मार्ट शहर आणि देश म्हणजे नक्की काय ते कळालं.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे जगात फिरल्यावर वाचनाचे ठोस महत्त्व कळालं. उगीचच मोबाईल स्क्रिनवर अंगठे सुजवून घेण्यापेक्षा प्रवास खरं जग दाखवतो. ‘सत्य नेमकं कसं असतं?’ हे प्रवास केला की उमगतं. जगाच्या तुलनेत आपण कुठे आहोत, नेमकं काय करायला हवं, काय नको ते कळतं. आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या तसेच एक माणूस म्हणून अधिक प्रगल्भ होतो.

तरुण वयात जेवढा शक्य होईल तेवढा प्रवास करा मित्रहो, त्यातून नक्कीच नव्या जगाचा ‘सर्वसमावेशक’ माणूस घडू शकतो. नंतर संसार, जबाबदाऱ्या, ईएमआय आणि बिझी, बिझी बिझी कल्चर घात करायच्या आत जागे व्हा! प्रवास माणसाला घडवतो, शिकवतो आणि नवनवी आव्हानं पेलायची ताकदही देतो.

wankhedeprafulla@gmail.com

(लेखक प्रख्यात केल्विन आणि लिक्विगॅस या औष्णिक ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Byculla Assembly Election: भायखळ्यात कोण मारणार बाजी? दोन शिवसेनेत काटे की टक्कर!

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

SCROLL FOR NEXT