चलन म्हणजेच पैसा ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्याशिवाय कोणताही व्यवहार पूर्ण होऊ शकत नाही. थोडक्यात, कोणी कितीही म्हटलं तरी पैशाशिवाय जगता येऊ शकत नाही.
रोजच्या आर्थिक व्यवहारापलीकडे प्राचीन भारत, मुघल साम्राज्य, वसाहतवाद, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील चलनाचा प्रवास किती रंजक आहे, याची जाणीव भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मुद्रा संग्रहालयाला भेट दिल्यानंतर होते. इथून बाहेर पडताना आपल्या खिशातील नोटा आणि नाण्यांचे मूल्य नव्याने कळते. भारतीय चलनाविषयीचे आपले ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी आबालवृद्धांसाठी ही भेट नक्कीच उपयुक्त ठरेल.
चलन म्हणजेच पैसा ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्याशिवाय कोणताही व्यवहार पूर्ण होऊ शकत नाही. थोडक्यात, कोणी कितीही म्हटलं तरी पैशाशिवाय जगता येऊ शकत नाही. पैसा ही अशी गोष्ट आहे, जी जवळ असताना त्याची काही लोकांना किंमत नसते आणि जवळ नसला की क्षणोक्षणी त्याचे महत्त्व पटू लागते. ज्या पैशामुळे माणूस सुखी असतो तोच पैसा काहींसाठी दु:खाचे कारणही बनतो. सर्व गोष्टींच्या मुळाशी पैसा असल्याचं बोललं जातं, पण आपल्यापैकी किती जणांना पैशाचं मूळ म्हणजेच इतिहास ठाऊक आहे. संपूर्ण जगाचं सोडून द्या, पण भारतात पैशाचा प्रवास कसा झाला, हे जाणून घ्यायचं असेल तर फोर्ट परिसरातील सर फिरोजशाह मेहता मार्गावरील अमर बिल्डिंगच्या तळमजल्यावर असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) ‘मुद्रा संग्रहालया’ला भेट द्यायला हवी. भारतीय चलनाचा सद्य आणि इतिहासाशी संबंधित रंजक इतिहास इथे जिवंत झालेला पाहायला मिळतो.
भारताच्या चलन इतिहासाला समर्पित हे देशातील पहिले संग्रहालय आहे. देशाची मध्यवर्ती बँक असलेली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने चलन वारसा जतन करण्याच्या उद्देशाने या संग्रहालयाची उभारणी केली. २००४ मध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते या संग्रहालयाचे उद्घाटन झाले होते. कुठल्याही प्रकारच्या चलनाचा वापर सुरू होण्याआधी भारतीय समाजात व्यवहार कसे केले जायचे इथपासून भारतातील विविध राजवटींमधील धातूंची नाणी, सोन्याच्या लगडी, त्यानंतर आलेलं कागदी चलन आणि इतर वित्तीय साधनं संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहेत.
संग्रहालय सहा भागात विभागलेले आहे- ‘कल्पना, संकल्पना आणि कुतूहल’, ‘इंडियन पेपर मनी’, ‘बँकिंगची संकल्पना’, ‘स्थानिक बँकिंग, हुंडी आणि इतर तत्सम प्रकार’, ‘नाण्यांपासून ते कागदी पैशांपर्यंत’, ‘नाणी’ आणि ‘आरबीआय आणि आपण’. चलन व्यवहारात कसा बदल झाला, नाणी, नोटांचे बदलते आकार, रंग, तसेच निरनिराळे धातू, मिश्र धातूंच्या प्रतिकृती सविस्तर माहितीसह मांडण्यात आल्या आहेत. इसवीसन पूर्व सहाव्या शतकापासूनचे चलन ते आजतागायत चलनात सुरू असलेल्या नोटा आपल्याला येथे पाहता येतात. १० हजारांहून अधिक भारतीय नाणी, नोटा, धनादेश (चेक्स), हुंडी आणि त्यामध्ये निरनिराळ्या धातूंचा, कागदाचा उपयोग चलनात कसा होत गेला, हे येथे पाहता येते. जगातील सर्वांत लहान नाण्यांचाही येथे समावेश आहे.
सहाव्या शतकातील सिंधू खोरे, कुषाण साम्राज्य, गुप्तकालीन काळ आणि ब्रिटिश काळातील सुमारे १५०० वस्तू या संग्रहालयात आहेत. दुर्मिळ नाण्यांखेरीज भारत, चीन आणि दक्षिणपूर्व आशियाई प्रदेशात वापरात असलेला पुरातन कागदी पैसा, आर्थिक साधने आणि इतर बऱ्याच गोष्टी येथे पाहायला मिळतात. या संग्रहालयातील विशेष बाब म्हणजे लहान मुलांसाठी असलेली स्वतंत्र दालने. यामध्ये नाण्यांचा इतिहास आणि माहिती खेळांमधून सांगितली आहे. खेळांच्या माध्यमातून मुलांना चलनी नोटा आणि नाण्यांशी संबंधित तथ्ये जाणून घेता येतात.
संग्रहालयातील प्रत्येक विभागात ग्राफिक पॅनलद्वारे इंग्रजी आणि हिंदी भाषेत माहिती देण्यात आली आहे. डिजिटल स्क्रिनवर वेगवेगळ्या चलनांचे विनिमय दर कसे बदलतात याची माहिती आणि शेअर्सच्या किमती दिसतात. खासगी बँका आणि इतर तीन प्रेसिडेन्सी बँका म्हणजेच ‘बँक ऑफ बंगाल’, ‘बँक ऑफ बॉम्बे’ आणि ‘बँक ऑफ मद्रास’ यांनी १९ व्या शतकात जारी केलेल्या नोटा येथे पाहायला मिळतात. शिवाय १८६१ च्या ‘पेपर करन्सी अॅक्ट’अंतर्गत भारत सरकारने जारी केलेल्या नोटाही तुम्ही येथे पाहू शकता. भारतात १९३५ पासून केवळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नोटा जारी करत आहे. इतक्या वर्षांत कागदी चलनाची रचना कशी बदलत गेली हे पाहणं औत्स्युक्याचं ठरतं. देशात चलनाची मागणी आणि पुरवठा यांचे नियंत्रण कशाप्रकारे केले जाते, बँक नोटांवरील खरेपणा दर्शवणारी चिन्हे आणि सुरक्षा उपाय यांचाही परिचय संग्रहालयात करून देण्यात आला आहे.
रोजच्या आर्थिक व्यवहारापलीकडे प्राचीन भारत, मुघल साम्राज्य, वसाहतवाद, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील चलनाचा प्रवास किती रंजक आहे, याची जाणीव या संग्रहालयाला भेट दिल्यानंतर होते. इथून बाहेर पडताना आपल्या खिशातील नोटा आणि नाण्यांचे मूल्य नव्याने कळते. भारतीय चलनाविषयीचे आपले ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी आबालवृद्धांसाठी ही भेट नक्कीच उपयुक्त ठरेल.
nanawareprashant@gmail.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.