Sion Fort Sakal
टूरिझम

सायन किल्ल्यावरून पाहावी मुंबई!

मुंबईला लाभलेला लांबलचक समुद्रकिनारा हे जसं या शहराला लाभलेलं वरदान आहे, तसाच संरक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा धोकाही आहे.

प्रशांत ननावरे

मुंबईला लाभलेला लांबलचक समुद्रकिनारा हे जसं या शहराला लाभलेलं वरदान आहे, तसाच संरक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा धोकाही आहे.

सायन किल्ल्यावरून दूरवर पसरलेली मुंबई आणि आकाशासोबत स्पर्धा करणाऱ्या गगनचुंबी इमारती दिसतात. माथ्यावरून वेगवेगळ्या दिशेला विस्तारलेली मुंबई दिसते. यावरून टेहळणीच्या दृष्टीने किल्ल्याचं महत्त्व अधोरेखित होते.

मुंबईला लाभलेला लांबलचक समुद्रकिनारा हे जसं या शहराला लाभलेलं वरदान आहे, तसाच संरक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा धोकाही आहे. म्हणूनच की काय मुंबईवर सत्ता गाजवणाऱ्या प्रत्येकाने या शहराच्या सागरी सीमा सर्वात आधी सुरक्षित केल्या. पोर्जुगीज आणि इंग्रजांनी दक्षिण आणि मध्य मुंबई परिसरातील विविध किल्ले मुख्यत: मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवण्यासाठी बांधले होते. त्यापैकीच एक किल्ला माहीम खाडीच्या पूर्वेकडील मुखावरील टेकडीवर म्हणजेच मुंबई शहर आणि उपनगराला जोडणाऱ्या आजच्या सायन म्हणजेच शीव स्थानकाच्या वेशीवर आहे. काळा किल्ला, रिवा किल्ला आणि त्याच्या साथीला इंग्रजांनी सायनचा किल्ला बांधून मुंबई बेटाचा उत्तरेकडील भाग अधिक सुरक्षित केला.

मुंबई उपनगरीय रेल्वेच्या मध्य रेल्वे मार्गावरील सायन स्थानकावर उतरल्यानंतर पूर्वेला चालत गेल्यास अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर सायनचा किल्ला आहे. पूर्व द्रुतगती महामार्ग ओलांडल्यावर दुतर्फा पुरातन वृक्षांची रांग दिसते. याच रस्त्याने काही मिनिटांतच किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचता येते. किल्ल्याच्या पायथ्याशी नेहरू उद्यान असून, तिथूनच बांधलेल्या दगडी पायऱ्यांवरून किल्ल्यावर जाता येते. अनेक ठिकाणी पडझड झालेली असली तरी किल्ल्याच्या अवशेषांवरून त्याची जुनी रचना आणि उपयुक्तता ध्यानात येते. साष्टी आणि मुंबईचे परळ बेट यांच्यामधील अंतर आता नाहीसे झाले आहे; परंतु सतराव्या शतकात खाडीत आणि खाडीपलिकडे चालणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हे ठिकाण किती आदर्श होते, हे किल्ल्याच्या संरक्षण भिंतीपलिकडे पाहिल्यानंतर जाणवते.

मुंबई बंदरावर अधिराज्य गाजवणाऱ्या इंग्रजांनी हे शहर घडवण्यातही मोठा हातभार लावला आहे. तसं करणं ही त्यांची गरजही होती म्हणा. एके काळी शिलाहार राजांनी वसवलेल्या या शहराची पंधराव्या-सोळाव्या शतकापर्यंत दयनीय अवस्था झाली होती. मुंबई बंदर जागतिक व्यापाराचं केंद्र होत असतानाही साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव आणि खाजणाचा प्रदेश यामुळे इथं बदली होणं ब्रिटिश अधिकाऱ्यांना शिक्षा वाटत असे; परंतु सर्वच अधिकारी सारखे नसतात. त्याला अपवाद होते मुंबईचे गव्हर्नर जेरॉल्ड ऑगियर. त्यांनी १६६९ ते १६७७ दरम्यान टेहळणी व माहीम खाडीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी सायन किल्ला बांधला. या किल्ल्याची संरचना पाहता त्या काळी संरक्षणाशिवाय कारभारासाठी मोठ्या प्रमाणात किल्ल्याचा वापर केला जाई, असे दिसते. किल्ल्याचे तट, बुरूज, ब्रिटिश कार्यालयाचे अवशेष, दारूचे कोठार, तोफा व भलामोठा चौकोनी हौद या गोष्टींवरून त्याची प्रचिती येते. किल्ल्याच्या बांधणीमध्ये स्थानिक वास्तुशैलीवर युरोपियन शैलीचा प्रभाव दिसतो.

सायनच्या किल्ल्याबद्दल जाणून घेत आहोत म्हणून एक नवीन माहितीही इथे द्यायला आवडेल. संरक्षणाच्या दृष्टिकोनातून खरंतर सायनला दोन किल्ले बांधले गेले. त्यापैकी सायनचा किल्ला हा सर्वज्ञान असून, त्याच्या जवळच असलेला रिवा किल्ला अनेकांच्या गावीही नाही. स्थानिकांनाही याबाबत फारशी माहिती नाही; पण सायन किल्ल्याच्या विरुद्ध दिशेला शीवच्या आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्रांगणातील टेकडीवर हा किल्ला आहे. महाविद्यालयाच्याच औषधी वनस्पती उद्यानात या किल्ल्याचा एकमेव सुस्थितीतील बुरूज बऱ्यापैकी आब राखून आहे, बाकी किल्ला छिन्नविछिन्न अवस्थेत आहे.

सायन किल्ल्यावर जाण्यासाठी सुरुवातीला दगडी पायऱ्या आहेत. या पायऱ्या दोन बाजूंनी असून मध्यभागी एक धबधबा तयार करण्यात आलाय. किल्ल्यावर जाण्याच्या वाटेवरच पाण्याचा एक मोठा चौकोनी हौद आहे. आता हा हौद वापरात नसल्याने त्याची खोली आणि बांधकाम पाहता येतं. किल्ल्याचा आवाका बऱ्यापैकी मोठा आहे. वेगवेगळ्या भागात फिरण्यासाठी असलेल्या दगडी पायवाटा आणि पायऱ्या अजून सुस्थितीत आहेत. काही ठिकाणी मातीचे रस्ते आहेत. अनेक ठिकाणी झाडं-झुडपंही वाढलेली दिसतात. पायवाटांच्या बाजूने बांधलेली तटबंदी आजही भक्कम आहे. किल्ल्याच्या एका भागात मोठ्या दरवाजातून खाली उतरणाऱ्या मोठ्या पायऱ्या असून दोन्ही बाजूंना काही खोल्या आहेत. ज्याचा उपयोग कचेरी म्हणून केला जात असावा. तटबंदीवरून आणि ज्या ठिकाणी पायऱ्यांच्या बाजूला तटबंदी नाही, तिथून दूरवर पसरलेल्या मुंबईचे आणि आकाशासोबत स्पर्धा करणाऱ्या गगनचुंबी इमारती दिसतात. याशिवाय किल्ल्याच्या माथ्यावरून वेगवेगळ्या दिशेला विस्तारलेली मुंबई दिसते. यावरून टेहळणीच्या दृष्टीने किल्ल्याचे असलेलं महत्त्व अधोरेखित होते. खिडक्या आणि दरवाजे चौकोनी-आयताकृती-त्रिकोणी आकारातील आहेत. किल्ल्यांच्या भिंतीला केलेले प्लास्टर आजही चांगल्या अवस्थेत आहे. मात्र प्रेमीयुगुलांनी केलेल्या ग्राफिटीमुळे किल्ल्याचे विद्रूपीकरण झालेले दिसते. किल्ल्यांचे बुरूज आजही चांगल्या अवस्थेत आहेत. पुरातत्त्व विभागाने ठेवलेल्या जुन्या तोफा तिथे नजरेस पडतात.

शहराच्या मध्यभागी असूनही मुंबईतील पर्यटन स्थळांच्या यादीत या किल्ल्याचा क्वचितच समावेश होताना दिसतो, ही आश्चर्याची बाब आहे; पण ज्यांना मुंबई बेटाच्या इतिहासात रस आहे आणि काही शतकांपूर्वीची मुंबई कशी असेल, याची फक्त कल्पना न करता प्रत्यक्ष काही गोष्टींचे साक्षीदार व्हायचे असेल, त्यांनी या किल्ल्याला आवर्जून भेट द्यायला हवी.

nanawareprashant@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT