Pune Travel : पुण्याहून सहज जाण्याजोगं, इतरांची फार भाऊगर्दी नसणारं, निसर्गरम्य, काही तरी पहाण्याजोगं असं एखादं ठिकाण सुचवा म्हणून अनेकजण इंटरनेट वर सर्च करत असतात. विशेषतः शनिवारी व रविवारी असलेल्या विक एंडला फिरणाऱ्याना कार्ले-भाज येथील लेणी माहिती असतात. पण हे बेडसे लेणं त्यांनी कधी ऐकलेलं नसतं. काले- भाजे-बेडसे हे मावळातील लेण्यांचे त्रिकूट फार महत्त्वाचे आहे.
पुण्याहून लोणावळ्या अलिकडच्या कामशेत गावाच्या थोडं आधी पवनेच्या फागणा धरणाकाठच्या काळे कॉलनीकडे जाणारा रस्ता डावीकडे (दक्षिणेस) फुटतो. तिथून ८-१०. कि. मी. अंतरावर आहे राऊतवाडी. त्यांच्या शेजारी आहे बेडसे गाव. गावाच्या पाठीशी असणाऱ्या डोंगराच्या मध्यावर आहेत बेडसे लेणी!
भेडसा, भेडसे, बेडसा हे काही याचे बरोबर उच्चार नाहीत. खरं तर लोणावळे-खंडाळे-कार्ले-भाजे तसेच बेडसे. बेडसे गावातून २०-२५ मिनिटांच्या सोप्या चढणीनंतर या लेण्यात प्रवेश होतो. फोटो काढण्याचं मनात असेल तर या पूर्वाभिमुख लेण्यांना भेट देण्यास सकाळी जावं, सारी कलाकुसर सकाळच्या कोवळ्या उन्हात निघालेली असते.
राजमाची किल्ल्याच्या पोटातलं कोंडाणे ऊर्फ कोदिवटे लेणे ख्रिस्तपूर्व दुसरे शतक पूर्वार्ध, तर भाजे लेणे ख्रिस्तपूर्व दुसरे शतक उत्तरार्ध. बेडसे लेण्यांचा काळ ख्रिस्तपूर्व १ ले शतक आणि भाजे लेण्यांची निर्मिती ख्रिस्तोत्तर १ लें शतक, असेच बहुसंख्य लेणीतज्ज्ञ मानतात.
चैत्यगृहातील कलते खांब, झुकत्या भिंती, अर्धउठावाची चैत्याकार गवाक्षे अन् वेदिका अशी खोदकामे, स्तूपावरची विस्तीर्ण हर्मिका, चैत्याच्या गजपृष्ठाकृती छताला लगटलेल्या लाकडी फासळ्या, मुख्य प्रवेशद्वारापुढील दगडी पडदी किंवा जवनिका, आघाडीला असणारी आगाशी किंवा ओसरी, चैत्यगृहातील साधे पण कोनयुक्त स्तंभ अशी प्राचीनत्वाची गमके येथे पडताळून पाहता येतात. ब्राह्मी लिपी अगम्य नसेल तर येथील ठसठशीत शिलालेखही वाचता येतात.
या लेण्यासंबंधी एक दुःखान्त घटना प्रख्यात लेखक श्री. स. आ. जोगळेकर यांनी "सह्याद्री" हवा त्यांच्या अद्वितीय ग्रंथात नोंदवलेली आहे. १८६१ सालापर्यंत या लेण्यातील भितीचा गिलावा कुठेकुठे टिकून होता. छत स्तंभ यांवरचे पोपडे कमी निघाले होते. बुद्ध आणि त्याचे साथीसेवक यांची रंगीत चित्रे इथे होती.
कोण्या बड्या गोऱ्या साहेबाला हे ऐकून माहिती होतं. त्याने मोठ्या हौसेने आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना तिथे घेऊन जाण्यास फर्मावले, स्थानिक अधिकाऱ्याने सार लेणं खरवडून घासून-पुसून स्वच्छ केले. जमलं तिथे चुन्याची सफेती पण केली. हौसेनं आलेल्या गोऱ्या साहेबानं कपाळावर हात मारून घेतला, एका प्राचीन महत्त्वाच्या ठेव्याचा असा अकाली अंत झाला. हा मौल्यवान वारसा हकनाक बळी गेला.
लेण्याच्या दर्शनी भागापुढे गारा-वारा- वादळ- ऊन-पाऊस-धुळीचे लोट यांच्यापासून संरक्षणासाठी दगडी पडदी किंवा जवनिका आहे. बेडसे लेण्याचे उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे तेथील दर्शनी दोन खांब आणि दोन अर्धस्तंभ (म्हणजे पिलॅस्टर्स) स्तंभशीर्षांच्या जागी असणाऱ्या हत्ती-घोडे-बैल व त्यांवर आरूढ झालेले स्त्री-पुरुष. अतिशय प्रमाणबद्ध अशा या आकृत्या निरखताना एक गोष्ट लक्षात येते. हत्तींना दात नाहीत. सुळ्यांच्या जागी नुसती भोके कोरलेली आहेत. (तेथे कदाचित खरे किंवा खऱ्यासारखे दिसणारे हस्तिदंत रोवलेले असावेत.) घोड्यांना लगाम नाहीत. ते बहुदा रंगवलेले असावेत..
गजपृष्ठाकृती छत असणारे चैत्यगृह मोठे आहे. मुख्य सभामंडपाच्या कडेने असणाऱ्या खाबांच्या ओळींपलीकडे असणाऱ्या अरुंद मार्गातूनही म्हणजे नासिकेतूनही जाता येते. येथील स्तूप प्रमाणबद्ध आहे. वेदिका अंड हर्मिका स्पष्टपणे दिसतात. पण छत्रावली तेवढी नाहीशी झाली आहे. या चैत्यविहाराच्या छताला असणाऱ्या लाकडी फासळ्या मध्यंतरीच्या काळात बेपत्ता झाल्या असाव्यात.
बेडसे लेणी समूहात काही निवासी खोल्या असणारा विहारही आहे. काही अर्धवट कोरलेल्या गुहा स्तूप- पाण्याची टाकी येथे आढळतात. या हीनयान पंथीय बौद्ध लेण्यांची आजची अवस्था फारशी समाधानकारक नाही. या लेण्याची माहिती देणारा एखादा फलक एखादा पहारेकारी आणि स्वच्छतेची काही व्यवस्था केली जायला हवी. कार्ले-भाजे लेण्यांइतके कोरीव काम जरी इथे नसले तरी हे लेणं आणि भवतालचा शांत निसर्ग मुद्दाम पहाण्याजोगा आहे खास.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.