श्रावण विशेष : शिखर शिंगणापूर म्हणजे चैत्र, श्रावण महिन्यातील पर्वणीच Canva
टूरिझम

श्रावण विशेष : शिखर शिंगणापूर म्हणजे चैत्र, श्रावण महिन्यातील पर्वणीच

श्रावण विशेष : शिखर शिंगणापूर म्हणजे चैत्र, श्रावण महिन्यातील पर्वणीच

सुनील राऊत

छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत म्हणजेच शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव.

नातेपुते (सोलापूर) : छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) आराध्य दैवत म्हणजेच शिखर शिंगणापूरचा (Shikhar Shingnapur) शंभू महादेव (Shambhu Mahadev). या स्थानाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण पठार आणि भवानी घाट सोलापूर जिल्ह्यात (Solapur) येतो आणि मुख्य मंदिर आणि गाव सातारा (Satara) जिल्ह्यात. जिजाऊ मॉंसाहेबांनी (Jijamata)) छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे बंधू संभाजीराजे (Sambhajiraje) यांच्या जन्माच्या प्रीत्यर्थ मंदिराच्या समोर भव्य स्वागत कमान उभारलेली आहे, ती आजही चांगल्या अवस्थेत पाहण्यास मिळते. चैत्र, श्रावण महिन्यातील प्रत्येक अमावस्या, प्रदोष व प्रत्येक सोमवारी हजारो भक्तांनी हा परिसर फुललेला असतो.

मराठवाडा, विदर्भ, आंध्र, कर्नाटकातून सहकुटुंब भाविक येत असतात. शिखर शिंगणापूरचे दर्शन घ्यायचे असेल, खरा आनंद लुटायचा असेल तर भाविकांनी पायऱ्यांनी जाणे आणि दर्शन घेणे गरजेचे आहे. राज्यातील बहुतेक शैक्षणिक सहली शिखर शिंगणापूरला आवर्जून भेट देत असतात. मंदिर अतिशय पुरातन असून भव्य आहे. मंदिराला मोठा इतिहास आहे. शिखर शिंगणापूर पंचक्रोशीत महादेवाची भव्य आठ मंदिरे आहेत. चैत्र, श्रावण महिन्यातील यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल होत असते. मंदिरात स्वत:च्या हाताने अभिषेक पूजा करता येते. मंदिरासंदर्भात अनेक ऐतिहासिक दस्तावेज उपलब्ध आहेत. या मंदिरातच शिवाजी महाराजांनी बजाजी निंबाळकर यांचा धर्मात पुनर्प्रवेश केला होता.

तसेच नातेपुते येथील श्रीगिरिजापती शंभू महादेवाचे मंदिर अतिशय प्राचीन असून ऐतिहासिक आहे. शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाचे मूळ स्थान म्हणून हे मंदिर ओळखले जाते. छत्रपती उदयनराजे भोसले यांचे संपूर्ण खासगी मालकीचे हे मंदिर आहे. मंदिराला तीन प्रवेशद्वार असून चार भव्य दीपमाळा आहेत. आतमध्ये तीन मोठे नंदी आहेत. गर्भगृहात स्वयंभू शिवलिंग आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून दक्षिणेला बळीचे भव्य मंदिर आहे. मंदिरासमोर विस्तीर्ण पटांगण असून भव्य तळे आहे. मराठवाड्यातील बहुसंख्य लोकांचे हे कुलदैवत आहे. त्यामुळे मराठवाड्यातील लोकांची वर्षभर मंदिरात दर्शनासाठी गर्दी असते. सारीपाटाचा डाव हरल्यानंतर पार्वती मातेने येथे येऊन वास्तव्य केले. पार्वतीच्या शोधात भगवान शंकर येथे आले, त्यानंतर त्यांचा येथे विवाह झाला, असा एक ऐतिहासिक संदर्भ दिला जातो. त्यामुळे पार्वतीच्या गिरिजा या नावावरून गिरिजापती हे नाव रुढ झाले आहे. चैत्र महिन्यात येथील यात्रा प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातील लोक विवाह सोहळ्यात सहभागी होतात. या यात्रेत विविध मानकरी आहेत. माळशिरस येथील वाघमोडे-पाटील यांना नवरदेवाचा, नातेपुते येथील पांढरे-पाटील यांना नवरीचा तर देशमुख, देशपांडे या परिवारात कुरवलीचा मान आहे. विवाह सोहळ्यासाठी मराठवाड्यातील शेकडो कावडी व काठ्या येतात. अत्यंत रोमहर्षक असा हा सोहळा असतो. श्रावणातील तिसऱ्या सोमवारी गावकऱ्यांच्या वतीने भंडारा होतो. जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित केले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम होतात. सायंकाळी कीर्तन होऊन बेल अर्पण करण्याचा सोहळा असतो.

शिखर शिंगणापूरची यात्रा पूर्वी नातेपुते येथेच होत असे, अशी ऐतिहासिक कागदपत्रे आहेत. तसेच येथील यात्रेला छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले आले होते, असाही बखरीत उल्लेख आहे. पूर्वी मंदिरावर शिखर नव्हते. गावकऱ्यांनी भव्य शिखराचे बांधकाम केले असून लोकवर्गणीतून सुवर्ण कलश बसवलेला आहे. देवाचे पुजारी बडवे आहेत. दरवर्षी वेगळ्या कुटुंबाकडे पूजा असते. अनेक भाविक येथे दहिभात पूजा करत असतात, ती पूजा प्रेक्षणीय असते. नातेपुतेकरांचे मोठे श्रद्धास्थान असून गावात सोमवारी मांसाहार केला जात नाही. तसेच अनेक मुस्लिम कुटुंब देखील दर सोमवारी दर्शनासाठी येतात व सोमवारचा उपवास करतात.

माळशिरस तालुक्‍यातील इतर धार्मिक स्थळे

  • अकलूज येथील अकलाई देवी, शिव- पार्वती मंदिर, आनंदी गणेश

  • महाळुंग येथील यमाई देवी

  • वेळापूर येथील अर्धनारी नटेश्वर, भाईनाथ महाराज समाधी मंदिर

  • माळशिरस येथील झोपलेला मारुती

  • मेडद व कारुंडे येथील काळभैरव

  • दहिगाव येथील जैन धर्मीयांचे भगवान महावीर स्वामी मंदिर

  • शिंगणापूर येथील गुप्तलिंग मंदिर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT