टूरिझम

भटकंती  : दिवेआगरच्या आडवाटेने

पंकज झरेकर

पुण्या-मुंबईत राहून दिवेआगर माहीत नाही, असा माणूस विरळाच. खरेतर सगळ्या महाराष्ट्राला दिवेआगर एक रमणीय समुद्रकिनारा, हे समीकरण ठाऊक आहे. समुद्रकिनारा म्हणजे फक्त समुद्रात भिजणे, यापेक्षाही वेगळा आनंद दिवेआगर देऊन जातो. पुण्या-मुंबईतून सकाळी घरातून निघाल्यावर दुपारच्या जेवणाला आपण दिवेआगरात हजर होतो. दिवेआगर आणि संपूर्ण कोकणपट्टी म्हणजे ओला नारळ आणि ताजी मासळी याचे समीकरण. प्रत्येक भोजनात ओल्या नारळाचा, कोकमाचा यथेच्छ वापर. साहजिकच, चार घास जास्तच पोटात जातात. मुक्कामाची सोय आधीच केलेली हवी; म्हणजे तृप्त झालेल्या पोटावर हात फिरवत दुपारची निवांत वामकुक्षी काढता येईल.

गावात देवदर्शन झाले, की समुद्र जवळ करावा. पण थांबा!! तो गर्दी असलेला किनारा तुम्हाला मुंबई-अलिबागलाही पाहायला मिळेल. आपण इथे आलोय ते शांत निवांत बसून खऱ्या कोकणाची गंमत पाहायला. त्यांचे लोकजीवन जवळून अनुभवायला. दिवेआगराला उजव्या हाताला ठेवून एक रस्ता अरुंद पुलावरून श्रीवर्धनकडे जातो, त्या रस्त्याने. एक लहानसा घाट चढताना आपल्याला दिवेआगर बीचवर उसळलेली गर्दी दिसेल. तिला दुरूनच टाटा करून घाट संपला, की आपण एका टेकडीच्या माथ्यावर पोचतो. खाली अथांग सागर आणि टेकडीच्या माथ्यावरून जाणारी नागमोडी डांबरी सडक, याला म्हणतात ना खरा आणि खारा कोकण!! थोडे पुढे उजवीकडे एक मच्छीमारी बंदर दिसेल. या गावचे नाव भरडखोल. रस्ता सोडून खाली उतरून गेले, की सगळ्या कोळ्यांशी दोस्ती होईल. राकट चेहरा, रापलेले खांदे तरीही मनातून भरली शहाळी. त्यांच्या मासेमारीची जाळी ओढताना, मासे भरताना, पडाव-होड्या-ट्रॉलर आतबाहेर करताना पाहण्यात वेळ कसा निघून जातो, पत्ताच लागत नाही. गावातून पुढे गेलो, की उजवीकडे अतिशय बुटक्या अशा दोन टेकड्यांच्या मधून पांढरी स्वच्छ रुपेरी वाळू, माडांची जाळी दिसते. तिथे गाडी बाजूला लावून समुद्राकडे निघाल्यावर समोर चंद्रकोरीच्या आकारातला विस्तीर्ण सागरकिनारा समोर येतो. पायांना हळूच गुदगुल्या करणारी मऊशार वाळू, समुद्रावरून येणारा अवखळ खारट वारा, माडांची सळसळ आणि समोर आकाशात पसरलेले मावळतीचे रंग. हाच असतो खराखुरा, स्वप्नात पाहिलेला ऑथेंटिक कोकण. त्या वाळूवर निवांतपणे गप्पा मारत बसावे, सागराची गाज कानात साठवावी आणि अंधार पडता दिवेआगर गावात परतावे. रात्री पुन्हा एकदा कोकणी जेवण आणि सोलकढीवर ताव मारून अंगणात टांगलेल्या झोपाळ्यावर गप्पा मारत, नारळीपोफळीच्या वाडीतल्या रातकिड्यांच्या गूढ आवाजात हरवून जावे.

सकाळी अगदी लवकर उठून दिवेआगरच्या बीचकडे धाव घ्यावी. केतकीच्या बनातून जाणारी लाल मातीची पायवाट आपल्याला सागराकडे ओढत घेऊन जाते. या बीचचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी आतपर्यंत समुद्र उथळ आहे. ओहोटीच्या वेळी अगदी दोन-तीनशे मीटरपर्यंत आपण गुडघाभर पाण्यातून चालत जाऊ शकतो. त्या शांत वातावरणात चालत असताना कुठेतरी आपलाच आपल्याला नव्याने शोध लागतो. काहीतरी नवे गवसल्याचा आनंद मनात घर करून राहतो. जसे जसे ऊन चढते तसे परत फिरायचे आणि येता येता गेल्या काही वर्षांत बांधलेल्या रूपनारायण मंदिरात दर्शन घेऊन परतीची वाट धरायची.

कसे जाल?
 पुणे-मुळशी-ताम्हिणी-माणगाव-बोर्ली पंचायतन-दिवेआगर
 मुंबई-पनवेल-माणगाव-बोर्ली पंचायतन-दिवेआगर

मुक्काम जेवणाची सोय  
 दिवेआगर गावात राहण्याची सोय होऊ शकते. सर्व सुखसोयींनी उपयुक्त अशा एमटीडीसी रिसॉर्टपासून घरगुती निवासव्यवस्था उपलब्ध.

आसपासचा परिसर
 श्रीवर्धन (पेशव्यांचे मूळ गाव)
 हरिहरेश्वर (दक्षिण काशी)
 दिवेआगरवरून जवळच दिघी बंदर आहे. तिथून मुरुड जंजिऱ्याला जाण्यासाठी लाँच उपलब्ध.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SIP Investment: शेअर बाजार कोसळत आहे; एसआयपी बंद करावी की सुरु ठेवावी? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

Latest Maharashtra News Updates live : 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेवर भाजप खासदार कंगना रणौतने दिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT