Usavan Novel Marathi 
Trending News

Marathi Book Review: 'उसवण' : अवघड हाय समदं...

Amit Ujagare (अमित उजागरे)

कादंबरी : 'उसवण'

लेखक : देवीदास सौदागर

प्रकाशक : देशमुख आणि कंपनी

किंमत : 160 रुपये

माणसाचं जगणं हे इतकं विलक्षण आहे की, त्याला कुठलं लेबल लावणं देखील चुकीचं आहे. कारण इथं प्रत्येकाचा विषयच वेगळा आहे, वरवर सर्व माणसं एकसारखीचं दिसत असली तरी प्रत्येकाचं जगणं वेगळं अन् या जगण्याचा संघर्षही. लेखक देवीदास सौदागर यांच्या 'उसवण' या ग्रामीण पार्श्वभूमीच्या कादंबरीतला नायक विठोबाचं जगणंही असंच आहे, चिंध्यांसारखं... उब देणाऱ्या गोधडीला ठिगळं लावल्याप्रमाणं....! यात वर्ग संघर्ष, जात संघर्ष, माणसामाणसातला संघर्ष, आधुनिक-जुन्यातला संघर्ष, विचारांचा संघर्ष, तसंच नात्यांतील प्रेमाचा संघर्ष अशी अनेक रंगबिरंगी ठिगळं आहेत.

'२०२४ चा युवा साहित्य अकादमी पुरस्कार' या कादंबरीनं जिंकला आहे. खरंतर पुस्तक ऑगस्ट २०२२ मध्येच बाजारात आलं. पण यंदा साहित्य अकादमीचा पुरस्कार पटकावल्यानंतर त्याची चर्चा सुरु झाली. कादंबरी लेखकानं त्या हातांना अर्पण केली आहे, ज्या हातांनी कायम जोडण्याचं काम केलं आहे. ११६ पानांचं हे छोट पुस्तक आहे. जे वाचकाला अंतरबाह्य हादरवून टाकतं. खरंतर अंग झाकणं म्हणजेच आपली लाज झाकणं ही माणसाची मुलभूत गरज आहे. हे अंग झाकण्याचं काम एक शिंपी करत असतो. पारंपारिक टेलरिंग व्यवसाय तसंच आत्ता कारखान्यात झटपट तयार होणारे रेडिमेड कपडे अन् आयुष्याची तुलना या कादंबरीत प्रामुख्यानं करण्यात आली आहे.

'उसवण' कादंबरीचं प्रमुख पात्र विठोबा अर्थात विठू हा शिंपी म्हणजेच टेलर आहे. त्याची बायको गंगा, आठवीत शिकणारी मुलगी नंदा अन् सहावीत शिकणारा मुलगा सुभाष या चौकोनी कुटुंबाची ही कथा आहे. एखाद्या सिनेमाचा प्लॉट चालावा त्याप्रमाणं गावाचं एसटी स्टँड, तिथली दुकानं, त्यातलं विठूचं एक दुकानं, त्याचं घर या सर्व प्रसंगातूनच कादंबरीची कथा घडत जाते. ही कथा ९० च्या दशकातली भासते, कारण आज २०२४ मध्ये टेलरिंगची दुकानं असली तरी अबालवृद्धांचा आता रेडिमेड कपडे खरेदीकडंच कल असतो. पण या कादंबरीचा काळ हा टेलर कढूनच कपडे शिवून घेण्याचा काळ आहे. पुस्तकाच्या मलपृष्ठावर असलेलं ग्रामीण घर आणि दुकानाचं चित्र नव्वदच्या दशकातील प्रतिमा डोळ्यासमोर उभी करते.

कादंबरी वाचताना तुम्ही त्यात इतके गुंतून जाता की त्यातली सर्व पात्रं तुमच्या आसपास आहेत असं वाटत राहतं. या प्रत्येक पात्राचं एक स्वतःचं असं वैशिष्ट आहे. त्यातले अनेकजण साधे-सरळ असले तरी काही सरंजामी अन् मुर्दाडही आहेत. तर काही फायटर अन् प्रेरणादायीही आहेत. साळुंखे सर, सोमनाथ, लक्ष्मण, सूर्यकांत फौजी, कफ्फलक झालेला जीवलग मित्र देवबा तसंच संत नामदेव, तुकाराम, बुद्ध, फुले, आंबेडकर अन् कबीरही त्यातच साहिर लुधियानवीची कविता विठूला जगण्याचं बळ देतात.

जातीपातीचं राजकारण, समाजकारण यावरही ही कादंबरी भाष्य करते. जातीच्या कात्रीनं माणुसकीचे धागे कसे कापलेत हे सांगताना विठूच्या जीवनातले अनेक प्रसंग वाचकाच्या डोळ्यात पाणी आणतात. समाज परिवर्तनाचं प्रमुख साधन असलेल्या प्रेम विवाहाला अन् आंतरजातीय विवाहाबाबत समाजाची समज कशी आहे. याबाबत डोळ्यात अंजन घालणारं भाष्यही कादंबरी करते. समाज म्हणून आपण कधी अपग्रेड होणारच की नाही? असा प्रश्न यात विविध अंगानी उपस्थित होत राहतो. गरिबीमुळं मुलांना मनासारखं शिकवता येत नाही, पैशानं पैसा वाढत नाही कारण समोर आव्हानांचा डोंगर मोठा आहे. पण तरीही थोडा त्राण आणून आपणच बदलावर स्वार होत नाही तोवर पुढच्या पिढीसाठी व्यवस्थेचं चक्रव्युह संपणार नाही, असा या कथेचा शेवटही होतो. गावं, शहर, प्रेम-द्वेष, माणसाचं जगणं, जागतीकीकरण अशा सर्वच अंगाला ही कादंबरी स्पर्श करीत असल्यानं साहित्य अकादमीनं त्यावर पुरस्काराची मोहर उमटवली.

जगात एखाद्या प्रोडक्टचा टिकावं तेव्हाच लागतो जेव्हा ते अपग्रेड होतं. माणूसही निसर्गाचा प्रोडक्ट आहे, आजवर तो ही अपग्रेड होत आला आहे. जर त्याच्यात हे परिवर्तन झालच नाही तर त्याचा विनाश अटळ आहे, हा संदेश समीक्षकाच्या नजरेतून 'उसवण' च्या रुपानं ठळकपणे जाणवतो.

प्रतिक्रिया नोंदवा - amit.ujagare@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitesh Rane: अटक टाळण्यासाठी नितेश राणेंची हायकोर्टात धाव; काय आहे प्रकरण?

हरियाना, जम्मू-काश्मीरचा निकाल, सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूबाबत खळबळजनक खुलासा, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

Women's T20 World Cup: हरमनप्रीत कौर उद्याचा सामना मुकणार? स्मृती मानधनाचं मोठं विधान; नेट रन रेटचं गणितही सांगितले

Haryana Election Results: ''हरियानामध्ये इतिहास घडला, यापूर्वी असं कधीच झालेलं नाही'' मोदींनी सांगितलं ५० वर्षांपासूनचं समीकरण

Sports Bulletin 8th October 2024: विनेश फोगाटची हरियाना निवडणूकीत बाजी ते BCCI समोर पाकिस्तानची शरणागती

SCROLL FOR NEXT