धुळे : गेल्या अनेक वर्षांपासून सुटता सुटत नसलेल्या शहरातील भटक्या (मोकाट) कुत्र्यांची समस्या येत्या काही दिवसांत सुटेल, अशी अपेक्षा आहे. कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाच्या निविदा प्रक्रियेअंती वर्धा येथील एका संस्थेला देण्यात येणार आहे.
या संस्थेशी महापालिकेने निगोशिएशनही केले असून, लवकरच अंतिम निर्णय होऊन कार्यादेश दिला जाईल, असे दिसते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शहरात वाढत चाललेली कुत्र्यांची संख्या आटोक्यात येऊन श्वानदंशाच्या घटनाही कमी होतील, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, कुत्र्यांच्या या निर्बीजीकरणासाठी वर्षाला ३५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तीन वर्षांसाठी हे काम देण्यात येणार असल्याने या कामासाठी एक कोटीवर खर्च होण्याची शक्यता आहे. (1 crore spent on sterilization of dogs Dhule latest marathi news)
धुळे शहरात मोकाट जनावरांची समस्या मोठी आहे. यात मोकाट गुरे, मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या कायम आहे. मागील काळात या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेसह तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडूनही निर्देश दिले गेले. मात्र, प्रत्येकवेळी महापालिकेकडून थातूरमातूर कारवाई होते.
त्यातही मोकाट गुरांबाबत कारवाई होते. सद्यस्थितीतही मोकाट गुरे पकडून ती गोशाळेत जमा करण्याची कारवाई सुरू आहे. मोकाट कुत्र्यांचा प्रश्न मात्र सुटता सुटत नाही, अशी स्थिती आहे. गेल्या काही दिवसांत श्वानदंशामुळे मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. दरवर्षी श्वानदंशाच्या घटनेतही वाढ होत आहे.
मोकाट, पिसाळलेल्या कुत्र्यांच्या दहशतीने सर्वच हैराण असल्याने त्या-त्या भागातील नगरसेवकांनीही अनेकदा हा प्रश्न स्थायी समितीत मांडला, तीव्र आंदोलनाचे इशारेही दिले आहेत. अर्थात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी विविध कायद्यांचाही अडथळा असल्याने समस्या सुटत नाही. कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचा विषय मात्र हाताळला जात नसल्याने समस्या कायम असल्याचेही प्रकर्षाने दिसून येते.
दरम्यान, आता महापालिकेने कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी निविदा मागविल्या होत्या. निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली असून, वर्धा येथील संस्था या प्रक्रियेत पुढे आली आहे. संबंधित संस्थेशी दराबाबत निगोशिएशनही झाल्याचे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र माईनकर यांनी सांगितले.
तीन वर्षांत एक कोटीवर खर्च
कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी दर ठरविण्यात आला असून, निगोशिएशनअंती एका कुत्र्यामागे ८८० रुपये खर्च निश्चित झाला आहे. दरम्यान, महापालिकेने शहरातील मोकाट कुत्र्यांच्या संख्येनुसार केलेल्या प्रस्तावानुसार या कामासाठी वर्षाकाठी सुमारे ३५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे हे काम तीन वर्षांसाठी देण्यात येणार आहे. त्यामुळे तीन वर्षांत या कामावर एक कोटी रुपयांवर खर्च होईल, असे दिसते.
व्हॅन खरेदी नव्हे, निर्बीजीकरण
मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर तोडग्यासाठी डॉग व्हॅन खरेदीचा विषय यापूर्वी अनेकदा चर्चिला गेला. मात्र, डॉग व्हॅन खरेदी नव्हे, तर कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे काम महापालिकेकडून हाती घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जनावरांची मोहीम सुरू
मोकाट जनावरे पकडण्याची कारवाईही सुरू असून, सद्यःस्थितीत गोशाळेत दहा-बारा मोकाट जनावरे जमा असल्याचे सांगण्यात आले. त्याच-त्या मनुष्यबळावर विविध कामांचा बोजा येऊन पडतो. त्यामुळे या कारवाया खंडित होतात, असे अधिकारी म्हणतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.