धुळे : तालुक्यातील शिरूड येथील राज्य संरक्षित स्मारक श्री कालिकादेवी मंदिराच्या जतन व दुरुस्तीसाठी राज्य शासनाने ११ कोटी ५७ लाख रुपयांच्या निधीला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे.
शिवाय मार्च-२०२४ पर्यंत या कामावर खर्च होऊ शकणाऱ्या एक कोटी रुपये रकमेलाही वित्तीय मान्यता दिली.
यामुळे येत्या १५ दिवसांत मंदिर दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ होईल, अशी माहिती जिल्हा परिषद शिरूड गटाचे सदस्य आशुतोष पाटील यांनी दिली. खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे पाठपुरावा केल्याने हे काम मार्गी लागल्याचेही श्री. पाटील यांनी नमूद केले. (11 Crore 60 Lakhs for Shirud Kalika Devi Temple Dhule News)
शिरूड येथे श्री कालिकादेवीचे प्राचीन मंदिर असून, श्री कालिकामाता महाराष्ट्रातील एकूण ५३ कुळांची कुलदेवी आहे. यामुळे वर्षभर मंदिरात भाविकांची दर्शनासह कुलाचार व नवसपूर्तीसाठी गर्दी असते.
मात्र, या मंदिराची दुरवस्था झाल्याने भाविकांची मोठी गैरसोय होत होती. मंदिराच्या गाभाऱ्यासह परिसरातील प्राचीन बुरूजही ढासळले होते. त्यामुळे मंदिराच्या दुरुस्तीसह भाविकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली.
त्या अनुषंगाने जिल्हा परिषद सदस्य पाटील यांनी खासदार डॉ. भामरे यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा केला. त्यानुसार खासदार डॉ. भामरे यांनी राज्य शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे २०१७-१८ या आर्थिक वर्षात या मंदिराच्या संरक्षक भिंतीचे काम झाले.
२०१९ मध्ये मंदिराच्या गाभाऱ्याच्या कामासाठी एक कोटी रुपये तसेच मंदिराच्या कामासाठी आठ कोटी ५५ लाखांचा निधी मंजूर झाला. नंतर राज्यात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात निधीला स्थगिती मिळाल्याचे श्री. पाटील म्हणाले.
डॉ. भामरेंचा पाठपुरावा
राज्यात पुन्हा शिवसेना (शिंदे गट) व भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर खासदार डॉ. भामरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, तत्कालीन पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, विद्यमान पर्यटनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पूर्वीच्या साडेआठ कोटींऐवजी वाढीव निधीची मागणी केली.
पाठपुराव्याला अखेर यश आले असून, राज्य शासनाने नुकतीच कालिकादेवी मंदिराच्या दुरुस्ती व जतनासाठी ११ कोटी ५७ लाख ५२ हजार ५८७ रुपयांच्या वाढीव निविदेला सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.