Nandurbar Crime News : मध्य प्रदेशातील खेतियाकडून येणाऱ्या ट्रकमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला आठ लाख ९८ हजार ५६० रुपये किमतीचा सुगंधी गुटखा, पानमसाला व सहा लाख रुपयांचा ट्रक असा एकूण १४ लाख ९६ हजार ५६० रुपये किमतीचा मुद्देमाल शहादा पोलिसांनी जप्त केला.
गोपनीय माहितीचा आधार घेत शहादा शहरास लागून असलेल्या लोणखेडा बायपास रस्त्यावर नियोजित नवीन बसस्थानकासमोर ट्रक थांबवून त्याची तपासणी केली असता परचुटन मालाच्या आडोशाला सुगंधी मसाला व इतर पानमसाला आढळला. (15 lakhs seized along with truckload of gutkha nandurbar crime news )
या कारवाईमुळे प्रतिबंधित पानमसाला अवैध मार्गाने विकणाऱ्यांचे धाबे दणदणाले आहे. मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सर्वत्र ठिकठिकाणी नाकेबंदी सुरू आहे. याच अनुषंगाने शहादा पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी बुधवंत पंधरा दिवसांपासून नाकेबंदी करत आहेत.
शनिवारी (ता. २८) त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत व पोलिस कर्मचारी नवीन बसस्थानकासमोर सापळा रचून होते.
दुपारी चार-साडेचारच्या दरम्यान खेतिया ते शहादा मार्गावर नवीन बसस्थानकासमोर वाहन (एमपी ०९, जीजी ००११) थांबवून ट्रकमधील मालाची खात्री केली असता परचुटन मालाच्या आडोशाला महाराष्ट्रात प्रतिबंधित सुगंधी पानमसाला व तंबाखू चोरट्या मार्गाने विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक होत असताना मिळून आले. ट्रक (एमपी ०६, जीजी ००११)ची तपासणी केली असता पानमसल्यासह १४ लाख ९८ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल मिळाला.
संशयित आरोपी भगवान उत्तम बोरसे व विल्सन रायरबोर्ड डागोटी (रा. खेतिया, मध्य प्रदेश) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोलिस उपनिरीक्षक प्रिया वसावे, पोलिस शिपाई मुकेश राठोड, राकेश मोरे, भरत उगले, दिनकर चव्हाण, संदीप लांडगे यांच्या पथकाने कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.