Dhule Election News : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत १ जानेवारी २०२४ या अर्हता तारखेवर आधारित अंतिम मतदारयादी मंगळवारी (ता. २३) प्रसिद्ध करण्यात आली. शिवाय मतदार नोंदणी, दुरुस्ती व वगळणीची प्रक्रिया निरंतर सुरू राहणार आहे.
त्यामुळे नागरिकांनी या मतदारयादी शुद्धीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी पत्रकार परिषदेतून केले. (17 lakh 27 thousand voters in dhule district news)
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर श्री. गोयल यांनी सविस्तर माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर उपस्थित होते.
सात हजारांनी वाढ
जिल्हाधिकारी गोयल म्हणाले, की विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ऑक्टोबर २०२३ च्या यादीत ३९ हजार २१६ नवीन मतदार नोंदणी व स्थलांतरित मतदार चार हजार ७७३ अशा एकूण ४३ हजार ९८९ मतदारांची नावनोंदणी झाली.
तसेच ३६ हजार ८२६ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे अंतिम मतदारयादीमध्ये सात हजार १६३ मतदारांची वाढ होऊन धुळे जिल्ह्यात एकूण १७ लाख २७ हजार ४७५ मतदारांची संख्या झाली आहे.
ती नावे वगळली
या अंतिम मतदारयादीत पुरुष मतदारांची संख्या आठ लाख ९१ हजार ९८, महिला मतदारांची संख्या आठ लाख ३६ हजार ३३२, तर तृतीयपंथीय मतदारांची संख्या ४५ असून, एकूण मतदारांची संख्या १७ लाख २७ हजार ४७५ असल्याची माहिती श्री. गोयल यांनी दिली.
तसेच एकसारखे फोटो असलेले आठ हजार ९९० मतदारांचे फोटो समान असल्याने त्यांची वगळणी केली आहे, तर मतदारयादीत नाव व इतर काही तपशील समान असलेले एक हजार १७१ दुबार समान मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.
ही वगळणी प्रक्रिया मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत संबंधित मतदारांच्या गृहभेटी, स्पीड पोस्टाने नोटिसा पाठवून तसेच पूर्ण तपासणीअंती कायदेशीररीत्या करण्यात आली आहे. यामुळे नाव वगळणीच्या या प्रक्रियेमुळे मतदारयादीतील अनावश्यक फुगवटा नाहीसा होऊन ती अधिक परिपूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.
मतदाता सेवा पोर्टल
जिल्ह्यातील सर्व मतदार, राजकीय पक्षांनी ज्या मतदारांची या मोहिमेत नावे वगळण्यात आली असेल, अशा मतदारांनी आपले नाव मतदारयादीत आजच तपासणी करून घ्यावे.
मतदारांनी मतदाता सेवा पोर्टल https://voters.eci.gov.in या संकेतस्थळावर किंवा https://electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळावर आपले नाव मतदारयादीत तपासावे आणि सर्व तपशील योग्य आहे का हे पाहावे.
यासोबत मतदान केंद्र तपासून घ्यावे, जेणेकरून ऐन मतदानाच्या दिवशी गैरसोय होणार नाही. तसेच यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी सहा क्रमांकाचा अर्ज भरून आपला मताधिकार सुनिश्चित करावा.
जे पात्र नागरिक २०२४ या वर्षातील १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै किंवा १ ऑक्टोबर या नमूद अर्हता तारखेला १८ वर्षे पूर्ण करणार आहेत ते त्यांचे नाव मतदारयादीत समाविष्ट करू शकतील, असेही जिल्हाधिकारी गोयल यांनी स्पष्ट केले.
ओळखपत्र घरपोच
जिल्ह्यातील शंभर टक्के मतदारांकडे मतदार ओळखपत्र आहे. नवमतदार व दुरुस्ती केलेल्या मतदारांचे मतदार ओळखपत्र पोस्टाद्वारे घरपोच वितरित करण्यात येत आहे. मतदारयादीतील नाव कमी करण्यासाठी कुटुंबातील व्यक्ती मृत होणे, स्थलांतर करणे किंवा असलेल्या मतदाराच्या नावावर हरकत नोंदविण्यासाठी फॉर्म क्रमांक सात उपयोगात आणावा.
ज्या मतदारांचे मतदारयादीमधील नाव, वय, जन्मतारीख व पत्ता, नातेवाइकाचे नाव आदी माहितीत दुरुस्ती किंवा बदल करावयाचा आहे त्यांनी यंत्रणेशी संपर्क साधावा. वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनी तसेच सर्व पात्र मतदारांनी अधिकाधिक मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी गोयल यांनी केले.
दृष्टिक्षेपात धुळे जिल्हा मतदारयादी
१८-१९ वर्षं वयोगटातील मतदारसंख्या ः प्रारूप मतदारयादी प्रसिद्धीवेळी सात हजार ४९० इतकी. ती आज १७ हजार ३२१
२०-२९ वर्षं वयोगटातील मतदारसंख्या ः प्रारूप मतदारयादी प्रसिद्धीवेळी तीन लाख १४ हजार ९९५ इतकी. ती आज तीन लाख २९ हजार ६५६
८० वर्षे वयोगटावरील मतदारसंख्या ः आजमितीस ४९ हजार ४९७
दिव्यांग मतदारसंख्या ः आजमितीस आठ हजार ६९३
तृतीयपंथी मतदारसंख्या ः एकूण ४५ तृतीयपंथी व्यक्ती, शंभर टक्के नोंदणी
जिल्ह्यात विधानसभानिहाय मतदारसंख्या
०५ साक्री...........३,४८,७१४
०६ धुळे ग्रामीण.....३,८७,९५५
०७ धुळे शहर.......३,३४,५१०
०८ शिंदखेडा........३,२७,२५५
०९ शिरपूर...........३,२९,०४१
एकूण पुरुष...........८,९१,०९८
एकूण महिला.........८,३६,३३२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.