Nandurbar News : नाशिक परिक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी जनजागृती मोहीम राबवावी, अशी संकल्पना नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी मांडली होती. (71 lakh worth of goods seized in drug free district campaign nandurbar news)
जनजागृती मोहीम राबविताना जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालये, संस्था इत्यादी ठिकाणी जनजागृती म्हणून निबंध व, भाषण, चित्रकला स्पर्धा, सायकल रॅली, पथनाट्य इत्यादी विविध कार्यक्रम घेण्यात आले.
दरम्यान, मोहिमेत अमली पदार्थांची वाहतूक करणे, अमली पदार्थ कब्जात बाळगणे, अमली पदार्थाची लागवड करून त्याची जोपासना करणे इत्यादी शीर्षांखाली सहा गुन्हे दाखल करण्यात येऊन त्यात एकूण ७१ लाख २२ हजार ८५९ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
तरुण वयोगटातील विद्यार्थी व पालक यांच्यात एकत्रित चर्चासत्र/संवादसत्राचे आयोजन करण्यात यावे, तसेच विविध नावीन्यपूर्ण योजनांचा वापर करून अमली पदार्थविरोधी अभियान राबवावे, त्यातून घर, शाळा, परिसर, शासकीय कार्यालय, संस्था, जिल्हा व पर्यायाने राज्य अमली पदार्थमुक्त कसे राहील याबाबत प्रयत्न करावेत, असे आवाहन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकांनी परिक्षेत्रातील सर्व पोलिस अधीक्षकांना केले होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
नंदुरबार जिल्हा घटकाने या आवाहनास प्रतिसाद देत १ मार्च २०२३ ला नंदुरबार शहरातील शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या तसेच विविध सामाजिक संघटनांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात कार्यक्रम घेऊन नाशिक परिक्षेत्रात सर्वप्रथम अमली पदार्थविरोधी अभियान सुरू केले.
अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या तरुणांना बाहेर काढून नवीन जीवन मिळवून देणे हे अमली पदार्थमुक्त जिल्हा या उपक्रमाचे महत्त्वाचे उद्दिष्ट असून, तरुण पिढी हे राष्ट्राचे भविष्य आहे, त्यांनी उज्ज्वल भविष्यासाठी व स्वत:च्या वैयक्तिक आरोग्यासाठी अमली पदार्थ सेवन न करण्याचा संकल्प सोडणे गरजेचे आहे.
नंदुरबार जिल्हा पोलिस दलाने केलेला अमली पदार्थमुक्त जिल्हा हा संकल्प पुढे जावो, असा आशावाद नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी व्यक्त केला होता.
सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांनी अमली पदार्थविरोधी मोहीम तीव्र केली आहे. जानेवारी २०२३ ते जून २०२३ या कालावधीत अमली पदार्थमुक्त जिल्हा हा उपक्रम यशस्वी व्हावा व त्याची माहिती जिल्हा घटकातील तळागाळापर्यंत व्हावी याकरिता पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील गावपातळीवर पोलिसपाटील, नागरिक तसेच शाळा-महाविद्यालयात आजपावेतो २०६ बैठका घेण्यात आल्या आहेत. उपक्रमाबाबत जनजागृती व्हावी याकरिता पोस्टर्स व बॅनर्स यांच्या मदतीने जनजागृती करण्यात येत आहे.
अमली पदार्थमुक्त दिन साजरा करणार
अमली पदार्थाबाबत गोपनीय माहिती पोलिस दलास व्हावी याकरिता ९०२२४५५४१४ हा हेल्पलाइन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून, त्यावर प्राप्त होणाऱ्या तक्रारींची संबंधित पोलिस ठाण्यांकडून तातडीने दखल घेऊन कारवाई करण्यात येते. तसेच तक्रारदाराची माहिती गोपनीय ठेवली जाते.
२६ जून २०२३ ला अमली पदार्थमुक्त दिवसानिमित्त विविध कार्यक्रम होणार असून, त्यामध्ये शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, शासकीय कार्यालये, विविध सामाजिक स्वयंसेवी संस्था तसेच सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित केला आहे. शहरातून भव्य रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त पोलिस ठाणेस्तरावर विविध कार्यक्रम व उपक्रम होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.