धुळे : शहरातील वडजाई रोडवरील गफ्फूरनगरात घराजवळ खेळणाऱ्या दहावर्षीय बालकाचा वीजखांबातील प्रवाहामुळे धक्का बसून जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. १८) सायंकाळी घडली. अरशद अशपाक अहमद असे बालकाचे नाव आहे.
वीज महावितरण कंपनीच्या हलगर्जीमुळे ही घटना घडल्याचा आरोप करत पीडित पालकांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. (Child dies due to electric shock Demand for filing of case against Mahavitaran Dhule News)
या पार्श्वभूमीवर वीज वितरण कंपनीचे प्रभारी कार्यकारी अभियंता राजेश पाटील यांनी चौकशीअंती अहवाल सादर होईल. त्यानुसार कारवाई केली जाईल. तसेच भरपाईदेखील दिली जाईल, असे सांगितले. आमदार डॉ. फारूक शाह यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन मृत बालकाच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
तसेच महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे निष्पाप बालकाचा बळी गेला. दुर्घटनेची तत्काळ चौकशी होऊन बेजबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि मृत बालकाच्या परिवाराला शासनाकडून तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी या घटनेमुळे संतप्त आमदार शाह यांनी अधीक्षक अभियंत्यांकडे केली.
अरशद अहमद बुधवारी सायंकाळी घराजवळ इतर मुलांसह खेळत असताना त्याचा हात वीजखांबाला लागला. त्यातून वीज प्रवाहित असल्याने जोरदार झटका लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. घटना घडताच परिसरातील नागरिकांनी वडजाई रोड महावितरणच्या कार्यालयात भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. वीज वितरण विभागाच्या गलथान कारभारामुळेच निष्पाप बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त स्थानिकांसह नातेवाइकांनी संबंधित वीज वितरण अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा, तसेच संबंधित अधिकाऱ्यास तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी केली.
घटनेची त्वरित दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला. महावितरणचे कार्यकारी अभियंता पाटील, वडजाई रोड येथील उपअभियंता चव्हाण, साळुंके, महापालिकेचे अधिकारी बागूल, नगरसेवक मुख्तार बिल्डर, डॉ. सरफराज अन्सारी आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.