Nandurbar News : ‘हा पतंग की पाखरू, चल मज म्हणे आकाशी फिरू’ या कवितेतील ओळींप्रमाणे काल मकरसंक्रांतीनिमित्त येथे पतंगोत्सवात एकापेक्षा एक पतंग आकाशात उंच झेप घेताना दिसत होते. त्यासोबतच डीजे, ध्वनिवर्धकावरून गाणे वाजवीत तरुणाईच्या जल्लोषाने सारे शहर दुमदुमले होते.
हिंदी, मराठी गीते, लोकगीते, रिमिक्सच्या तालावर थिरकत... काटे... काटे...च्या आरोळ्यांनी सोमवारच्या सकाळची सुरवात झाली. (Citizens enjoyed kite festival nandurbar news)
मकरसंक्रांती म्हणजे येथील तरुणाईसाठीच नव्हे, तर कुटुंबातील महिला-पुरुष, युवक-युवतींसह चिमुकल्यांसाठी जणू काय आनंदपर्वणीच ठरते. वर्षभर कधीही सातच्या अगोदर न उठणारे सोमवारी पहाटे पाचपासूनच घराच्या टेरेसवर जाऊन आकाशात पतंग चगवत होते.
गोड-गुलाबी थंडी, त्यात अधूनमधून वाहणारे गार वारे अंगाला झोंबत होते. त्याच वाऱ्याच्या झुळकीने पतंग आकाशाकडे झेपावत होते. कोणी हिंदी, मराठी, साउथ इंडियन, तर कोणी लोकगीते, भक्तिगीते, धार्मिक भजनांनी आजची सकाळ सुरू केली.
सर्वत्र गाण्यांचा गलबलाट, पक्ष्यांऐवजी तरुणाईचा किलबिलाट पहाटेपासूनच सुरू झाला. रविवारीच टेरेसवर सारे नियोजन करून ठेवलेल्या तरुणांनी दिवसभराचा मुक्काम छतावरच ठोकला.
डझनावर पतंगांची गड्डी, मांजाच्या चकरी, स्टॉक करून ठेवलेला होता. जो-तो आपलाच पतंग आकाशात सर्वाधिक उंचावर कशी जाईल यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. अनेकांना मांजा विशिष्ट पद्धतीने तयार केला होता.
ज्याच्यामुळे मांजा धारदार होऊन पतंग काट करण्यासाठी मजा लुटत होते. पतंग काट होताच एकच जल्लोष करीत ‘काटे...काटे...काटे...’च्या आरोळ्या मारत होते. ज्याचा पतंग काट झाला ते लागलीच दुसरा पंतग मांजाला जोडून पुन्हा आकाशात झेपावत होते.
रंगीबेरंगी पतंगांनी आकाश नटले होते. हे पाहून वृद्धांना व महिलांनाही मोह आवरला गेला नाही. त्यांनीही घरातील कामे आटोपून पतंग उडविण्याचा आनंद लुटला. एकंदरीतच आज आकाशात जणूकाही रंगीबेरंगी पतंगांचे शीतयुद्धच रंगले होते.
पतंग लुटणाऱ्यांची धडपड
एकीकडे पतंग आकाशात उंच झेपावण्याचा आनंद लुटणारे तरुण, त्यांच्या कुटुंबातील बालके छतावरून पतंग उडविण्याचा व काट करण्याचा जल्लोष करीत होते.
मात्र ज्यांना पतंग उडविण्यापेक्षाही काट होऊन जमिनीवर पडणारा पतंग लुटण्यातच सर्वोच्च आनंद अनेक गरीब मुलांना होत होता. पतंग काट झाल्याच्या आरोळ्या ऐकल्या रे ऐकल्या ते हातात काटेरी झुडपे, बांबू धरून प्रतीक्षेत असलेले तरुण व बालके पतंग कोणत्या दिशेला पडता.
त्याचा अंदाज घेत अनवाणी पायांनी खड्डे, गटार, टेकडे यांचा विचार न करता ती लुटण्यासाठी धडपड करीत होते. त्यातच त्यांना हाती लागलेला पतंग व मांजा घेऊन आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद नक्कीच कमालीचा वाटत होता.
सापडलेला पतंग आम्ही विकतो
या वेळी पतंग लुटण्यासाठी धावपळ करणारा कालूसिंग वळवी (वय १५) या मुलाला विचारले असता, तो म्हणाला, की आम्हाला दिवसभरात मोठ्या प्रमाणात पंतग मिळतात.
ते आम्ही दुकानदारांना कमी दराने का होईना विकून टाकतो किंवा उडविणारेही विकत मागतात त्यांना देतो. त्यातून ५०-१०० रुपये मिळतात. त्यातच आम्हाला आनंद वाटतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.