साक्री : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेली कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता उपलब्ध ऑक्सीजन बेड हे कमी पडायला लागले असून यामुळे कोविड केअर सेंटर येथे ऑक्सिजन बेड वाढविण्याची मागणी होत आहे. तसेच याठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा देखील सुरळीत करण्याची गरज रुग्णांमधून व्यक्त होते आहे.
तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठत आहे. अशावेळी रुग्णांना उपचार मिळणे देखील कठीण होत आहे. खासगी दवाखान्यांमध्ये सर्वच बेड फुल होत असल्याने सगळ्यांचा ओढा आता कोविड केअर सेंटरकडे वाढला आहे. मात्र या ठिकाणी देखील मर्यादित बेड असल्याने येथेही रुग्णांची हेळसांड होते आहे. सद्यस्थिती तालुक्यातील केवळ भाडणे येथील कोविड केअर सेंटर कार्यान्वित असून संपूर्ण तालुक्यातील रुग्णांना हा एकमेव आधार उरला आहे.
या ठिकाणी 150 बेडचे कोविड केअर सेंटर असून 30 बेडचे डेडिकेटेड केअर सेंटर ज्यात ऑक्सिजन सुविधा उपलब्ध आहे. या डेडिकेटेड कोविड सेंटर येथे सद्यस्थितीत 27 रुग्ण दाखल आहेत. यात देखील काही तांत्रिक अडचणींमुळे रुग्णांना दाखल करणे शक्य होत नसले तरी सद्यस्थितीत 27 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र या ठिकाणी देखील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यास काही प्रमाणात अडचणी उद्भवत असल्याच्या तक्रारी काही रुग्णांकडून होत आहेत. अशावेळी दिवसेंदिवस रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ऑक्सिजनची सुविधा असणाऱ्या बेडची संख्या वाढविण्याची गरज असून पुरवठा देखील सुरळीत केला जावा. या सोबतच तालुक्यातील पिंपळनेर, निजामपूर या भागात देखील कोविड व डेडीकेटेड कोविड केअर सेंटर सुरु करण्याची गरज व्यक्त होते आहे.
धगधगत्या स्मशानभूमी....
दरम्यान गेल्या आठवडाभरापासून परिस्थिती अत्यंत भीषण होत असल्याचे चित्र दिसून येत असून तालुक्याच्या सर्वच भागात कोरोनाचे रुग्ण वाढायला लागले आहेत. यात शासन दरबारी हे रुग्णसंख्या व मृत्यू संख्या नगण्य दिसत असली तरी प्रत्यक्षात मात्र कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. यात आता मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढते आहे. यामुळे अनेक गावांमधील स्मशानभूमी अक्षरशः धगधगत असून हे विदारक चित्र निश्चितच धडकी भरवणारे व मन सुन्न करणारे ठरत आहे. अनेक ठिकाणी तर अख्खे कुटुंब बाधित होत असतानाच अनेकांचे जीव यात जात आहेत. सोशल मीडियात देखील दररोज पडणारे भावपूर्ण श्रद्धांजलीचे मेसेज पाहता याची भीषणता लक्षात येत असून सर्वांनीच आता काळजी घेणे गरजेचे बनले आहे. कोरोनाचे हे संकट दिवसेंदिवस भीषण होत असताना सर्वांनीच सावध होत स्वतासोबतच आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याची गरज आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.