Dhule Crime News : शहरात विशेष अभियानांतर्गत पोलिसांनी शनिवारी (ता.८) कॅफे, पानटपऱ्या तसेच दुचाकींची तपासणी मोहीम राबविली. यात कॅफेत आढळलेल्या ४३ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पालकांना चर्चेसाठी बोलविले. त्यांना समज देत संबंधित विद्यार्थ्यांना पालकांच्या ताब्यात दिले. तसेच मोटार वाहन कायद्यान्वये १०३ चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करीत दीड लाखाचा दंड वसूल केला. दामिनी पथकाने शैक्षणिक परिसरात विद्यार्थिनींचे प्रबोधन केले. (103 two wheeler drivers fined Rs 1 lakh for crime in city )
महिलांना मौल्यवान वस्तू सांभाळण्याबाबत खबरदारीची सूचना केली. उन्हाळी सुटीनंतर शाळा व महाविद्यालये सुरु होत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शनिवारी सकाळी दहा ते दुपारी साडेबारादरम्यान शहरात अचानकपणे विशेष मोहीम राबवली. या दरम्यान शहरातील शाळा व महाविद्यालय परिसरातील टवाळखोर मुले, ट्रीपलसीट दुचाकीस्वार विद्यार्थी व विनापरवाना वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला.
कॅफेवर कारवाईची संक्रांत
शैक्षणिक परिसरातील सहा कॅफे, १६ पानटपऱ्यांची पोलिसांनी तपासणी केली. कॅफेमध्ये आढळलेल्या ४३ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पालकांना समक्ष बोलावून समज देत संबंधित विद्यार्थ्यांना त्यांच्या हवाली केले. या विशेष अभियानात एकूण १०३ दुचाकी वाहनचालकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून एकूण एक लाख ५३ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला.
यात प्रामुख्याने ट्रीपलसीट व विनापरवाना वाहन चालविणारे प्रत्येकी २८, अल्पवयीन वाहनचालक १३ आणि अन्य ३४ वाहनचालकांवर गुन्हे नोंदविले. यात एकूण २२ अल्पवयीन मुलांच्या पालकांना कारवाईस्थळी बोलावून मुलांना वाहने चालविण्यास देऊ नये, याबाबत सक्त सूचना दिल्या.
बुलेटस्वारावरही बडगा
देवपूर भागातील जयहिंद महाविद्यालयासमोर मुलींना पाहून फटाके फोडत ट्रीपलसीट बुलेट वेगाने पळविणाऱ्या अल्पवयीन मुलावर देवपूर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. त्याच्या पालकाला बोलावून समज दिली. तसेच पालकाकडून १३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. देवपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक बी. बी. पाटील, मिलिंद सोनवणे, सौरभ कुटे, राहुल गुंजाळ, गजेंद्र पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
शहरातील संतोषी माता चौक, बारा पत्थर चौकातही पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण कोते व शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात कारवाई झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.