Dhule News : कुणालाही कळू न देता खासगी कारमधून सोमवारी (ता. ८) रात्री नवनियुक्त जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे महामार्गावर तपासणी मोहिमेसाठी निघतात. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर तपासणी करताना त्यांना सोनगीर आणि धुळे तालुका पोलिस ठाण्याचे चौघे अंमलदार कर्मचारी वाहनधारकांकडून अनधिकृतपणे पैसे गोळा करण्याच्या उद्देशाने उभे दिसतात.
पोलिस दलाच्या प्रतिमेस तडा देणाऱ्या या प्रकारामुळे संतप्त श्री. धिवरे यांनी चौघा पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस मुख्यालय आणि मोटार परिवहन विभागात जमा केले आहे. या कारवाईचे स्वागत होत आहे. (Dhule district strict due to SP Shrikant Dhivare dhule News)
चौघा पोलिस कर्मचाऱ्यांचा प्रताप पाहता त्यांच्या पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडूनही खुलासा मागविण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक धिवरे यांना तपासणी मोहिमेत सोनगीर पोलिस ठाण्याचे प्रमोद मधुकर ठाकरे, सिराज सलीम खाटीक.
धुळे तालुका पोलिस ठाण्याचे दीपक गुलाबराव पाटील, वसंत नरहर वाघ हे चौघे महामार्गावर पैसे गोळा करण्याच्या उद्देशाने उभे दिसले. त्यात ठाकरे, वाघ यांना मोटार परिवहन विभाग आणि उर्वरित दोघांना पोलिस मुख्यालयात हजर होण्याचा आदेश पोलिस अधीक्षक धिवरे यांनी दिला आहे.
सात जण निलंबित
या कारवाईपूर्वी त्यांनी ३१ डिसेंबरला कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने राबविलेल्या मोहिमेत कुणाचीही पूर्वपरवानगी न घेता कर्तव्यावर परस्पर गैरहजर आढळल्याने सात पोलिस अंमलदारांना सेवेतून निलंबित करत त्यांच्यावर शिस्तभंगविषयक कारवाईचा आदेश दिला.
त्यात नियंत्रण कक्षातील महेंद्र ठाकूर, मोटार परिवहन विभागातील अमोल भामरे, साक्री आरसीपी पथकातील प्रदीप ठाकरे, राकेश बोरसे, मुक्ता वळवी, विनोद गांगुर्डे, किशोर पारधी यांचा समावेश होता. जिल्ह्यातील या पोलिस विभागांतर्गत दोन प्रमुख धडाकेबाज कारवायांमुळे कर्मचारी, अधिकारी वर्तुळात धडकी भरली आहे.
पेरलेली चर्चा हवेत विरली
पोलिस अधीक्षक धिवरे यांच्याकडून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापर्यंत जिल्ह्यात ‘टाईट’ स्थिती राहील. अधिवेशन संपल्यानंतर पोलिस विभागांतर्गत सर्व काही सुरळीत होईल, आलबेल वातावरण असेल, अशी चर्चा पेरण्यात आली; परंतु घडले उलटेच.
ती चर्चा आता हवेत विरली असून, जिल्हा पोलिस अधीक्षक धिवरे यांच्या पदभारानंतरच्या पहिल्या कारवाईपासून तर आतापर्यंत त्यात सातत्य दिसून येत असल्याने पोलिस विभागांतर्गत आणि गैरव्यावसायिकांचेही चांगलेच धाबे दणाणले आहे.
जुगारअड्डे, सट्टा, मटका, इतर उजेडात येणाऱ्या गैरप्रकारांवर कर्तव्यकठोरतेने कारवाईची भूमिका श्री. धिवरे निभावत असल्याने धुळेकरांमध्ये समाधानाचे चित्र दिसून येत आहे.
कारवाईचा धडाका सुरूच
बोगस डॉक्टरांवरील कारवाईबाबत पूर्वी पोलिस विभागांतर्गत अनेकांकडून का-कू केले जायचे. श्री. धिवरे यांच्या धडाकेबाज भूमिकेनंतर पोलिस ठाण्यातील कर्मचारी सक्रियतेने गुन्हे दाखल करताना दिसत आहेत. बोगस डॉक्टरांबाबत पूर्वीचे चित्र आणि सध्याचे चित्र पोलिस विभागातील बदलाचे बरेच काही सांगून जात आहे.
शिवाय जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, सामाजिक शांतता व एकोपा टिकून राहावा, युवकांसह तरुणांचे भविष्य उज्ज्वल व्हावे म्हणून शाळा- महाविद्यालयांजवळील गुटखा, टपऱ्यांवरील कारवाई, पालक आपल्या पाल्यांविषयी सजग राहावेत म्हणून कॅफेंवरील कारवाई.
आदी विविध कारवायांचा धडाका सुरू असताना स्व-विभागांतर्गत शिस्तीचा परिपाठ गिरवावा यासाठी कटिबद्ध पोलिस अधीक्षक धिवरे यांच्याकडून भविष्यात अंमलदारांकडून शिस्तीची अंमलबजावणी व्हावी, आगामी निवडणुका.
इतर बंदोबस्तावेळी नेटाने कर्तव्य बजावले जावे म्हणून आतापासून सहकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने नियोजनात्मक कामकाज सुरू असल्याचे दिसून येते.
पोलिस अधीक्षकांचा इशारा व आवाहन
मोहाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बनावट जीएसटी अधिकारी बनून महामार्गावर वाहतूकधारकांकडून पैसे गोळा करणाऱ्या तीन ते चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याच्या तपासात जी-जी नावे निष्पन्न होतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
असा इशारा देत पोलिस अधीक्षक धिवरे यांनी महामार्गावर कोणताही गैरप्रकार अढळल्यास त्याचे फोटो काढून धुळे पोलिस कंट्रोल रूमला कळवावे, असे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.