Dhule News : गेल्या वर्षी अत्यल्प पावसामुळे भीषण दुष्काळाचा सामना करावा लागल्याने कृषी क्षेत्र अडचणीत आले होते. आताही जून महिन्याच्या सुरवातीस अपेक्षित पाऊस न झाल्याने साक्री तालुक्यातील पेरण्या अद्यापही रखडल्या असून शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. लांबलेल्या पावसामुळे कपाशी लागवडीचे क्षेत्र घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ( Farmers are waiting for rain in Sakri taluka )
साक्री तालुक्यात गेल्या वर्षी अत्यंत कमी पावसामुळे कृषी क्षेत्र मोठ्या अडचणीत सापडले होते. याचा परिणाम उत्पन्नावर होवून गेल्यावर्षी सर्वच पिकांचे उत्पन्न सरासरी उत्पादकतेच्या प्रमाणात निम्म्याहून कमी झाले होते. यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त होत असला तरी तालुक्यात अद्यापपर्यंत दमदार पाऊस झाला नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत.
कृषी विभागाचे नियोजन
कृषी विभागाकडून निश्चित करण्यात आलेल्या पेरणी क्षेत्रानुसार गेल्यावर्षी एक लाख १ हजार ८५० हेक्टर क्षेत्र पेरणी झाली होती. यंदा त्यात किंचित घट होवून एक लाख १४३ हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यात २८ हजार ९६५ हेक्टर क्षेत्रात मका, २८ हजार ०३० हेक्टर क्षेत्रात बाजरी, १४ हजार १२० हेक्टर क्षेत्रात कपाशी, ११ हजार ५४० हेक्टर क्षेत्रात सोयाबीन, ५ हजार ४०० हेक्टर क्षेत्रात भुईमूग, ४ हजार ५१७ हेक्टर क्षेत्रात भात, याशिवाय तृणधान्य, कडधान्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे.
यातील आतापर्यंत केवळ ४२२ हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड झाली असून, पावसाअभावी अन्य पेरण्या अद्याप होवू शकलेल्या नाहीत. लांबलेल्या पावसामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कपाशीचे क्षेत्र घटून मक्याच्या क्षेत्रात वाढ होऊ शकते, असे सांगितले जात आहे.
बियाणे, खते मुबलक
खरीप हंगामाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने कृषी विभागातर्फे विविध कार्यशाळा घेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, खरीप हंगामात शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी कृषी विभागाने नियोजन करत पुरेसे बियाणे तसेच खते उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. यात कपाशीची एक लाख पन्नास हजार पाकिटे सध्या उपलब्ध आहेत. मका पेरणीसाठी तीन हजार क्विंटल बियाण्याची मागणी आतापर्यंत नोंदवण्यात आली असून, यात वाढ होऊन ही मागणी साडेचार हजार क्विंटलपर्यंत जाण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे. (latest marathi news)
याशिवाय भातासाठी साडेतीनशे क्विंटल तर सोयाबीनचे ६०० क्विंटल बियाणे उपलब्ध करण्यात आल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. खतांची देखील संभाव्य गरज लक्षात घेऊन तीस हजार मेट्रिक टन खतांची मागणी केली आहे. गेल्या वर्षीचा शिल्लक साठा आणि आतापर्यंत उपलब्ध साठा असे एकत्रित बारा हजार मेट्रिक टन खते सध्या उपलब्ध असून, आवश्यकतेनुसार खते उपलब्ध केले जाणार आहेत.
मात्र पेरणी क्षेत्र वाढल्यास युरिया खताची काही प्रमाणात कमतरता भासणार असून, विशेषत: दहिवेल, पिंपळनेर या भागात निर्माण होणारी संभाव्य टंचाई लक्षात घेवून कृषी विभागाचे नियोजन सुरू आहे. यात कृभको कंपनीचे खत बाय रोड उपलब्ध झाल्यास ही टंचाई देखील दूर होवू शकणार असून, यासाठी प्रयत्नशील असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, कृषी विभाग खरीप हंगामाची तयारी करत असताना पशुसंवर्धन विभागाकडून देखील मान्सूनपूर्व लसीकरणाला गती देण्यात आली आहे.
साक्री तालुक्यात १,१८,१८५ गाय वर्ग, २०,६४५ म्हैस वर्ग तर ४,५१,५४० शेळ्या मेंढ्या इतके पशुधन आहे. यापैकी १५ मेपर्यंत ४४,१८० पशुधनास लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणाचा हा आकडा आता एक लाखाच्या ही पुढे गेला असून, लवकरात लवकर लसीकरण पूर्ण केले जाणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली.
आभाळाकडे नजरा
एकीकडे कृषी विभागाचे नियोजन सुरू असताना शेतकऱ्यांनी देखील पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. मात्र, दमदार पावसाअभावी पेरण्या रखडल्या आहेत. गेल्यावर्षी सरासरीच्या केवळ ८४ टक्के पाऊस झाला होता. यंदा देखील आतापर्यंत केवळ २८.२० मिलिमीटर पाऊस झाला आहे. अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा असून, दमदार पावसानंतरच पेरणीला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.
''खरीप हंगामाची तयारी कृषी विभागाने केली असून, थेट बांधावर कार्यशाळा घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. यात उगवण क्षमता चाचणी, बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक यातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. शेतकऱ्यांना सर्वोतोपरी सहकार्यासाठी कृषी विभाग सज्ज आहे.''- सी. बी. सोनवणे, प्रभारी तालुका कृषी अधिकारी, साक्री
''खरीप हंगामात शेतकऱ्यांना आवश्यक बियाणे, खते मुबलक उपलब्ध व्हावेत यासाठी सुरुवातीपासून नियोजन केले आहे. यात यंदा मका क्षेत्र वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नियोजन सुरू आहे. याशिवाय वेळेवर खते उपलब्ध होतील ह्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. समाधानकारक पावसानंतरच पेरण्यांना सुरुवात होईल.''- आर. एम. नेतनराव, कृषी अधिकारी, पंचायत समिती, साक्री
''गेल्यावर्षी दुष्काळामुळे अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने खर्च देखील भरून निघालेला नाही. यंदा चांगला पाऊस होईल असे तज्ज्ञ सांगत असले तरी अद्यापही पेरणी योग्य पाऊस न झाल्याने दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. मशागतीची कामे पूर्ण झाली असून दमदार पावसानंतरच पेरण्या होऊ शकतील.''- हेमंत देसले, शेतकरी, भाडणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.