Dhule News : गेल्या वर्षी अल्पपावसामुळे खरिपासह रब्बीनेही मोठी निराशा केली. अनेक जुजबी समस्यांनी ग्रस्त बळीराजा यंदाचा पावसाळा ‘अच्छे दिन’ घेऊन येईल या अपेक्षेवर काळ्या मातीत रममाण झाला आहे. कोरडवाहू क्षेत्र म्हणून साक्री तालुक्याची वेगळी ओळख आहे. कोरडवाहू क्षेत्रात तृणधान्याची पेरणी सर्वाधिक केली जाते. (Gavran millet on way to extinction Encroachment of hybrids in Sakri taluka)
तृणधान्यातील बाजरी पिकाला पारंपरिक महत्त्व आहे. यंदा साक्री तालुक्यात २१ हजार ४२० हेक्टरवर तृणधान्यातील बाजरीचा पेरा होत असल्याचा अंदाज तालुका कृषी विभागाने व्यक्त केला आहे. संकरित वाणाच्या अतिक्रमणामुळे गावरान बाजरी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कोरडवाहू बाजरी पीक साक्री तालुक्याची ओळख राहिली आहे. अलीकडे कमी खर्च आणि लवकर तयार होणाऱ्या मका पिकाकडे शेतकरी वळल्याचे चित्र उभे आहे.
पूर्वी साक्री तालुक्यात पिकविल्या गेलेल्या गावरान बाजरीला खानदेशभर मागणी असायची. आज ती परिस्थिती राहिली नसली तरी कोरडवाहू क्षेत्रात तृणधान्यातील बाजरी अजूनही अस्तित्व टिकवून आहे. उत्पादकता कमी झाल्याने व शेतकऱ्यांनी मक्यासारख्या नगदी पिकाकडे लक्ष दिल्यामुळे यापूर्वी कोरडवाहू क्षेत्रात निम्म्या क्षेत्रात तृणधान्यातील बाजरीची होणारी पेरणी ४० टक्क्यांवर आली आहे.
चाऱ्यासाठी तृणधान्याची पेरणी
अलीकडे मनरेगासारख्या शासकीय योजनेत सिंचन विहिरी वाढल्यामुळे बागायती क्षेत्र वाढले आहे. तथापि, गेल्या वर्षीच्या तीव्र दुष्काळामुळे अजूनही विहिरींना अपेक्षित पाणी नसले तरी भविष्यात बागायती क्षेत्रात वाढ होण्याची आस शेतकरी बाळगून आहेत. बागायती क्षेत्रापेक्षा जिरायती क्षेत्र अधिक आहे. चारापीक व कमी खर्चात, कमी कालावधीत तृणधान्याची पिके परवडत असल्याचे शेतकरी सांगतात. (latest marathi news)
दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचा मका लागवडीकडे कल दिसून येतो. गेल्या वर्षीच्या चाराटंचाईच्या अनुभवामुळे शेतकरी सावध झाला आहे. कारण गेले वर्षभर बळीराजाला चाऱ्यासाठी भटकंती करावी लागली होती. पाणी, चाराटंचाईमुळे पशुपालक, शेतकरी हतबल झाले होते. समस्यांनी त्रस्त शेतकऱ्यांवर पशुधन विकण्याची दुर्दैवी वेळही आली होती.
भरड धान्यात बाजरीचा समावेश
राज्यातील सर्वाधिक उत्पादन असलेले, सर्वाधिक जमिनीवर उगवणारे व सर्वाधिक लोकांचे अन्न असलेले भरड धान्य अधिकाधिक वापरले जावे, या उद्देशाने २०२३ पासून आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. शासनाने भरड धान्यात बाजरीचाही समावेश केला आहे. पूर्वी उखळ, मुसळ वापरून ज्या धान्यातील साल किंवा कवच भरडून काढले जात असे, त्यानंतर गरजेनुसार जात्यावर दळून पीठ तयार केले जात असे, त्याला भरड धान्य असे म्हणतात.
भरड धान्य म्हणजे लहान बीज असलेल्या तृणवर्गीय पिकांचा एक अत्यंत वैविध्यपूर्ण गट, जे सर्वत्र जनावरांचा चारा व मानवी अन्नासाठी धान्य म्हणून मोठ्या प्रमाणात पिकविले जाते. भरड धान्य हे श्रीअन्न म्हणूनही ओळखले जाते. बाजरी, ज्वारी ही साधारणतः आकाराने मोठे असलेले धान्य असून, त्याला शास्त्रीय भाषेत ग्रेटर मिलेट, तर आकाराने बारीक असलेली नाचणी, वरी, राळा, कोदो, बर्टी, प्रोसो, ब्राउनटॉप ही सर्व मायनर मिलेट अथवा बारीक धान्य म्हणून ओळखली जातात. तसेच राजगिरा व बकव्हीट (कुट्टू) यांना स्यूडो मिलेट म्हणतात.
गावरान बाजरीस ७० दिवस!
अलीकडे संकरित बाजरीचा पेरणी केली जात असल्याचे चित्र आहे. कमी पाण्यात लवकर तयार होणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. संकरित बाजरी नव्वद ते शंभर दिवसांत आणि तेही कमी पाण्यात तयार होते. दुसरीकडे अवघ्या पंधरा दिवसांचा अधिक कालावधी गावरान बाजरीला लागत होता, अशी माहिती जुने जाणकार शेतकरी देतात. पूर्वी गावरान (आडची) बाजरीची पेरणी केली जात होती. सुमारे ७० दिवस म्हणजेच अडीच महिन्यांत तयार होणाऱ्या बाजरीला आडची म्हटले जाई. गावरान बाजरीचेही अनेक प्रकार असल्याचे सांगितले जाते.
"गावरान बाजरी चवीला रुचकर आणि पाचक होती. अलीकडच्या हायब्रिड (संकरित) बाजारीला फारशी चव नाही. अजूनही काही भागात गावरान बाजरीची पेरणी केली जाते. प्रत्येक शेतकऱ्याने किमान स्वतःच्या कुटुंबासाठी तरी गावरान बाजरीची पेरणी करावी." - भटू नामदेव बेडसे, ज्येष्ठ शेतकरी, ककाणी (ता. साक्री)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.