Dhule Leopard News : मागील आठवडाभरापासून साक्री रोड परिसरात वावरणाऱ्या बिबट्याने नकाणे तलाव परिसरातील आसारामबापू आश्रम परिसरातील गोठ्यातील गायीच्या वासराचा फडशा पाडला. बिबट्याच्या पावलाचे ठसे, शिकार केल्यानंतर सांडलेल्या रक्ताचे नमुने वन विभागाने घेतले आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे पथक प्रयत्न करत आहेत. (leopard attack on calf in Nakane Lake area)
धुळे शहरातील साक्री रोड महिंदळे शिवारात वावरणारा बिबट्याने नकाणे तलाव परिसरात असलेल्या आसारामबापू आश्रमात घुसखोरी केल्याचे उघड झाले आहे. आश्रम परिसरात बिबट्याच्या पावलाचे ठसे आढळून आले. बिबट्याने आश्रमातील गोठ्यात जाऊन वासराचा फडशा पाडला. मृतावस्थेत वासरू आढळून आले.
दोन ते तीन ठिकाणी वासराचे रक्त पडलेले दिसून आले. मंगळवारी (ता. ३०) पहाटे तीन ते चारच्या दरम्यान बिबट्याने आश्रमात घुसखोरी केल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी पोचले. त्यांनी पंचनामा केला.
आरएफओ भूषण वाघ, वनपाल निंबा आखाडे, राकेश पाटील, प्रशांत लांडगे, राणी मुंडे, कविता पवार, सीमा पाटील यांचे पथक बिबट्याच्या मागावर आहे. महिंदळे शिवारात दहशत माजविणारा बिबट्या लळिंग कुरणातील नसून बल्हाणे आणि सांजोरीच्या जंगलातील असल्याचे आरएफओ वाघ यांनी म्हटले आहे. (latest marathi news)
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तीन पिंजरे लावण्यात आले आहेत. रात्रीदेखील बिबट्याच्या हालचालींवर लक्ष्य ठेवण्यासाठी थर्मल ड्रोनद्वारे टेहळणी केली जात आहे. पाऊस आणि गर्द झाडीमुळे बिबट्या पसार होत आहे. ज्या वासराची शिकार बिबट्याने केली त्या परिसरात सीसीटीव्ही नव्हता.
दरम्यान, जनतेने घाबरून जाण्याचे कारण नाही मात्र सतर्क राहावे, जागरूक राहावे. एकट्याने फिरू नये, बाहेर पडताना टॉर्च, काठी सोबत असू द्यावी, असा सल्ला आरएफओ वाघ यांनी दिला. काही दिवसांपूर्वी एका बंद पडलेल्या कारखान्याच्या आवारात एका वॉचमनला सर्वप्रथम बिबट्याचे दर्शन घडले.
त्यामुळे महिंदळे शिवारातील रहिवासी वस्त्यांमध्ये घबराट पसरली. बिबट्या या परिसरातून निघून गेल्याचा समज झाला. मात्र, त्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी बिबट्याचे दर्शन झाले. त्यानंतर वन विभाग ॲक्टिव्ह झाला. आरएफओसह सात जणांची टीम बिबट्याच्या शोधासाठी प्रयत्न करत आहे. पाऊस व गर्द झाडी यामुळे बिबट्याच्या शोधमोहिमेत अडचणी येत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.