Dr. Subhash Bhamre, Dr. Shobha Bachhav esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Constituency : आघाडी कायम ठेवण्याचे भाजपपुढे आव्हान! स्थानिक नेत्यांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरणार

गोकुळ खैरनार : सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : धुळे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ नेहमीच भाजपच्या बाजूने राहिला आहे. किंबहुना गेल्या चार निवडणुकीत भाजप उमेदवाराला मिळालेल्या मताधिक्क्यात वाढच होत आहे. सन २०१९ च्या निवडणुकीत डॉ. सुभाष भामरे यांना मालेगाव बाह्यमधून ९४ हजार १४७ मतांची मोठी आघाडी मिळाली होती. (Dhule Lok Sabha Constituency)

गेल्या दहा वर्षातील ॲन्टी इन्कमबन्सी, कांद्यासह शेतीमालाला मिळत असलेला कवडीमोल भाव, कडाक्याचे ऊन व मतदारांमध्ये असलेला प्रचंड अनुत्साह या बाबी पाहता ही आघाडी टिकविण्याचे मोठे आव्हान महायुतीपुढे असेल.

कॉंग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांना प्रचार यंत्रणा उभी करण्याबरोबरच अंतर्गत गटबाजी शमविण्याचे आव्हान असेल. शिवसेना-भाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघात त्या किती मते खेचून आणतात यावरच आघाडी-पिछाडीचे गणित अवलंबून आहे.

जिल्ह्याचे नेतृत्व करणारा मतदारसंघ

पुर्वीचा दाभाडी व आताच्या मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाने नेहमीच जिल्ह्याचे नेतृत्व केले आहे. भाऊसाहेब हिरे, डॉ. बळीराम हिरे, व्यंकटराव हिरे, पुष्पाताई हिरे, प्रशांत हिरे, दादा भुसे आदींनी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतानाच पालकमंत्रीपद भुषविले आहे. कॅम्प-संगमेश्‍वर, सोयगाव, कलेक्टरपट्टा या शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील ९७ गावांचा मतदारसंघात समावेश आहे.

पंतप्रधान मोदींना मानणारा मोठा वर्ग मतदारसंघात आहे. पालकमंत्री दादा भुसे गेल्या २० वर्षापासून मालेगाव बाह्यचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. मतदारसंघात भुसे यांची जबरदस्त ताकद आहे. गावपातळीवरील विकासकामे व दांडगा जनसंपर्क याचा फायदा भाजपला होणार आहे. (latest marathi news)

स्थानिक नेत्यांचा लागणार कस

शहरी भागात भाजपचे नेते सुनील गायकवाड यांचे वर्चस्व असून त्यांनी प्रचाराची सुत्रे हाती घेतली आहेत. तर ग्रामीण भागात जिल्हाध्यक्ष निलेश कचवे प्रचाराची जबाबदारी सांभाळत आहेत. शिवसेना-भाजप महायुतीचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात खासदार डॉ. भामरे यांचे पूत्र डॉ. राहूल भामरे जातीने लक्ष घालत आहेत.

भाजप पदाधिकाऱ्यांनी त्या त्या भागातील जबाबदारी वाटून घेतल्याने प्रचार यंत्रणा गावपातळीपर्यंत पोहोचत आहे. कांदा प्रश्‍नी असलेली नाराजी डॉ. भामरे कशी दूर करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. बच्छाव यांच्या समर्थकांनी प्रचार पत्रके वाटून शहरातून रॅली काढत प्रचाराला सुरुवात केली आहे.

ग्रामीण भागातही मोठ्या गावांमध्ये रॅली व वाहनातून ध्वनीक्षेपकाद्वारे मतदारांना विजयासाठी साकडे घालत वातावरण निर्मिती केली आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रसाद हिरे, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) राजेंद्र भोसले यांच्यावर त्यांची भिस्त आहे. मतदारसंघातील मुस्लीम मते कॉंग्रेसच्या पारड्यात जाण्याची शक्यता आहे.

असे असले तरी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जीवाचे रान करुन डॉ. बच्छाव यांच्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले डॉ. तुषार शेवाळे भाजपमध्ये गेल्याने डॉ. बच्छाव यांना याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अद्वय हिरे यांच्या भूमिकेकडे लक्ष

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांची तालुक्यात मोठी ताकद आहे. जिल्हा बँक कर्ज प्रकरणी ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. हिरे समर्थकांचे ५० हजारावर मतदान आहेत. त्यामुळे अद्वय हिरे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात ते आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.

ऊन आणि उदासिनता

मालेगाव शहर व परिसराला उन्हाने बेजार केले आहे. पारा दीड महिन्यापासून ४२ ते ४४ अंशादरम्यान आहे. यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. बेमोसमी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे गेल्या दोन दिवसापासून तापमान घसरले आहे. २० मेस मतदानाच्या दिवशी पारा ४० अंशावर राहण्याची शक्यता आहे.

त्यातच निवडणुकीबाबत मतदारांमध्ये प्रचंड उदासिनता आहे. कडाक्याचे ऊन व मतदारांमधील उदासिनता यामुळे मतदानाचा टक्का किती असणार याबाबत उत्सुकता आहे. मतदारसंघात युती व आघाडीच्या कोणत्याही मोठ्या नेत्याची अद्याप सभा झालेली नाही. अंतिम टप्प्यातील आर्थिक उलाढाली देखील महत्वपुर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे.

हे आहेत प्रश्‍न...

* मांजरपाडा-२ प्रकल्प कागदावरच

* कांदा निर्यात प्रश्‍नी केंद्राची धरसोड वृत्ती

* शेतमाल प्रक्रिया उद्योगांचा अभाव

* नार-पार प्रकल्प प्रलंबित

* वाढती बेरोजगारी, मोठ्या उद्योगांची प्रतिक्षा

* मनमाड- मालेगाव- इंदूर रेल्वे मार्गाची प्रतिक्षा

* कालबाह्य पाणीपुरवठा योजनांचे रडगाणे

मतदार संख्या

पुरुष - १,८७,७७५

स्त्री - १,६९,५२९

किन्नर - ७

एकूण - ३,५७,३११

यापुर्वी काय झाले...

२०१४

भाजप - १,१२,५६२

कॉंग्रेस - ४३,०७६

२०१९

भाजप - १,३२,४२२

कॉंग्रेस - ३८,२७५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT