Dhule News : लोकसभेच्या धुळे मतदारसंघाने यंदाच्या निवडणुकीत उमेदवाराच्या निवडीवरून वादाचे ढग घोंगावताना पाहिले. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये जाहीर झालेल्या उमेदवाराला विरोध दिसून येत आहे. नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर भाजपमधील उमेदवाराच्या विरोधातील असंतोष मावळल्याचे चित्र आहे. (Dhule Lok Sabha Constituency)
तर काँग्रेसमध्ये बंडखोरीचे संकेत आहेत. यात गटबाजीची परंपरा पाहिली तर धुळे काँग्रेस सदा पुढे असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. या दोन्ही पक्षांतील नेत्यांपुढे `डॅमेज कंट्रोल`चे मोठे आव्हान आहे. सर्वप्रथम भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतर मतदारसंघाचे काँग्रेसच्या उमेदवार निवडीकडे लक्ष लागले. त्याचे कारण काँग्रेसच्या उमेदवारावरून भाजपच्या जय- पराजयाचे आखाडे बांधले जाणार होते.
काँग्रेस पक्षांतर्गत भाजपला काटा टक्कर देणारा उमेदवार दिला जाईल, अशी कार्यकर्त्यांची अटकळ होती. परंतु, धुळे ग्रामीणचे आमदार तथा प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास नापसंती दर्शविली. त्यामुळे उमेदवाराचा शोध सुरू झाला. पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, धुळे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांचे नाव निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच मतदारसंघात अग्रभागी होते. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांना ते ठाऊक नव्हते, असे मानता येणार नाही.
निष्ठावंतांसाठी आग्रह
धुळे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात भाजपला टक्कर द्यायची म्हणजे काँग्रेसचा उमेदवार हा गरीब, बिनपैसेवाला, कार्यकर्त्यांची फौज नसलेला, उमेदवारी देऊन उपयोगाचे नाही, असा समज काही नेत्यांनी करून घेतला. त्यानुसार काँग्रेस तसेच भाजपमधील नाराज, शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेता अशी वेगवेगळी नावे उमेदवार म्हणून पुढे येऊ लागताच काँग्रेसमध्ये खदखद सुरू झाली. (Dhule Political News)
निवडणुकीत काँग्रेसचा जय होतो की पराजय हा नंतरचा भाग, प्रथम प्रतिस्पर्धी भाजपला चांगली लढत देणारा उमेदवार निवडला जावा, अशी मागणी कार्यकर्त्यांमधून जोर धरू लागली. त्यातून पक्षातील निष्ठावंतांसाठी आग्रह सुरू झाला. मतदारसंघाबाहेरील किंवा आयात उमेदवार चालणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी उघड घेण्यास सुरूवात केली. यासंदर्भात डॉ. शेवाळे यांनी पत्रकही काढले होते. त्यामुळे नेत्यांना पक्षांतर्गत घडामोडींची माहिती होती.
बंडखोरीचे संकेत
काँग्रेसमध्येही गटबाजीतून शह- काटशह, कुरघोडीच्या राजकारणाचा प्रत्यय आला. प्रमुख इच्छुक डॉ. शेवाळे, सनेर यांची नावे बाजूला सारत पक्षश्रेष्ठींनी माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली आणि कार्यकर्त्यांमध्ये आगडोंब उसळला. तो शमविण्यासाठी नेत्यांचा कस पणाला लागणार आहे. दोन दिवसांत उमेदवार बदलला नाही, तर बंडखोरी केली जाईल.
काँग्रेसने दिलेला उमेदवार डॉ. बच्छाव यांना किती मते मिळतात आणि बंडखोरास किती मते मिळतात हे दाखवून देऊ, अशा जिद्दीला कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार पेटले आहेत. ही काँग्रेससाठी धोक्याची घंटा मानली जाते. त्यात उमेदवारी मागितली नव्हती, तर पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी जाहीर केली.
असे विधान डॉ. बच्छाव यांनी केल्याने भाजपला ही निवडणूक सोपी जावी म्हणून `फिक्सिंग` तर झाले नाही ना, अशी शंका कार्यकर्ते घेऊ लागले आहेत. अशा स्थितीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उत्तर महाराष्ट्र प्रभारी माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील काय निर्णय घेतात?, पक्षांतर्गत `डॅमेज कंट्रोल` कसा करतात?, आक्रमक कार्यकर्त्यांसह बंडखोरीचा इशारा देणाऱ्या इच्छुक उमेदवारांची कशी मनधरणी करतात?, उमेदवार बदलतात किंवा कसे याकडे मतदारसंघाचे लक्ष लागून आहे.
भाजपमधील असंतोष मावळला
भाजपने तीन आठवड्यांपूर्वी आघाडी घेत विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर केली. या पक्षांतर्गत गटबाजीत एका गटाने पक्षाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. मालेगाव येथे रात्रीतून विरोधाचे बॅनर लावत खळबळ उडवून दिली. मात्र, खासदार डॉ. भामरे यांनी त्यांचे मेळावे, बैठकांचे सत्र सुरूच ठेवले.
यात पक्षाचे नेते व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी धुळ्यातील मेळाव्याला हजेरी लावत खासदार डॉ. भामरे यांची या निवडणुकीतून हॅटट्रीक साधायची आहे, असे विधान करीत तेच उमेदवार राहतील यावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर डॉ. भामरे यांच्या उमेदवारीबाबत विरोध मावळल्याचे चित्र आहे. परंतु, नाराजीची सुप्त लाट असल्यास आणि गटबाजी पाहता भाजपच्या नेत्यांना `ड्रॅमेज कंट्रोल`चे आव्हान पेलावे लागणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.