Dhananjay Patil while distributing t-shirts and bibs as part of the marathon competition at the police drill ground, In the second photograph, the crowd gathered to check the names esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Marathon 2024 : पोलिस कवायत मैदानावर उद्या धुळे मॅरेथॉन; निरामय लोकोत्सव

पोलिस कवायत मैदानावर पहाटे पाचपासून झुम्बा डान्सने स्पर्धकांना वार्मअप सेशनद्वारे ताजेतवाने केले जाईल.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Marathon 2024 : शहरासह जिल्ह्यात सर्वांनाच उत्सुकता लागून असलेल्या रविवार (ता. ४)च्या धुळे मॅरेथॉनची अर्थात आरोग्यदायी, निरामय लोकोत्सवाची घटिका समीप आली आहे. यासंबंधी तयारी पूर्णत्वास आहे. यात पोलिस कवायत मैदानावर पहाटे पाचपासून झुम्बा डान्सने स्पर्धकांना वार्मअप सेशनद्वारे ताजेतवाने केले जाईल.

नंतर सकाळी सहाला २१ किलोमीटर, सव्वासहाला दहा किलोमीटर, साडेसहाला पाच किलोमीटर आणि पावणेसातला तीन किलोमीटरपर्यंतच्या सहभागी स्पर्धकांना झेंडा दाखविली जाईल. आकर्षक सोहळ्यात विजेत्या स्पर्धकांवर बक्षिसांचा वर्षावही केला जाईल. (Dhule Marathon tomorrow at police drill ground news)

स्पर्धेसाठी पोलिस ग्राउंड सजले आहे. आकर्षक व्यासपीठ, आरोग्यहितासंबंधी विविध नामांकित कंपन्यांचे स्टॉल (एक्स्पो), बचतगटांचे विविध स्टॉल असतील. सेल्फी पॉइंट सर्वांचेच आकर्षण असेल. झुम्बा डान्स, पारंपरिक वाद्यासह लोकनृत्य रंगत आणेल.

सहभागी नोंदणीधारक सर्वच स्पर्धकांना मोफत मेडल, रिफ्रेशमेंट बॉक्स, पाण्याची बाटली दिली जाणार आहे. शिवाय वैद्यकीय पथक, रिकव्हरी रूमची व्यवस्था मैदानावर असेल. बारीकसारीक बाबींची काळजी घेत आयोजकांनी तयारी पूर्णत्वावर भर दिला आहे.

धुळे मॅरेथॉनचा मार्ग

पोलिस ग्राउंडवरून स्पर्धकाने बारापत्थर चौक तेथे वळसा घालून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, तेथून पुन्हा वळसा घालून आग्रा रोडमार्गे मनोहर टॉकिज, श्री खंडेराव महाराज मंदिर, पाचकंदील, बॉम्बे लॉज, कराचीवाला खुंट, फुलवाला चौक, गांधी पुतळा, मोठा पूल, नेहरू चौक, देवपूर बसस्थानक, दत्तमंदिर चौक, तेथून वळसा घालून गोंदूर रोड, जिल्हा क्रीडासंकुल, वलवाडी.

तेथून वळसा घालून गोंदूर रोड विमानतळमार्गे गोंदूर गावापर्यंत आणि तेथून पोलिस ग्राउंडवर परतीचा मॅरेथॉन मार्ग आहे. यात कराचीवाला खुंट व परतीचा तीन किलोमीटर, नेहरू चौकातील अजमेरा फार्मसी कॉलेज व परतीचा पाच किलोमीटर, गोंदूर रोडवरील जिल्हा क्रीडासंकुल व परतीचा दहा किलोमीटर, गोंदूर गावापुढील स्थळापासून परतीचा २१ किलोमीटरचा मार्ग आहे.

‘चिअरअप’सह सुविधा

आयोजकांनी विशेष बैठकीतून शहरातील विविध शाळांना मॅरेथॉनमधील स्पर्धकांना प्रोत्साहन देणे व ‘चिअरअप’साठी आवाहन केले. त्यास अनेक शालेय व्यवस्थापनांनी प्रतिसाद दिला. त्यानुसार आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते गोंदूरपर्यंत विद्यार्थी अनोख्या पद्धतीने स्पर्धकांचे स्वागत करतील.

तसेच व्यापारी व सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने मॅरेथॉन मार्गावर ठिकठिकाणी स्पर्धकांसाठी पाणी, लिंबू- सरबत, ‘ओआरएस’ची उपलब्धता असेल. तसेच मॅरेथॉन मार्गावर हिरे मेडिकल कॉलेज व संलग्न जिल्हा सर्वोपचार रुग्णालय, साक्री रोडवरील जिल्हा शासकीय रुग्णालय, महापालिका आणि जिल्हा परिषद, ‘आयएमए’च्या माध्यमातून वैद्यकीय पथक कार्यरत असेल. रुग्णवाहिकांची व्यवस्थाही उपलब्ध असेल.

बक्षिसांची लयलूट

हाफ मॅरेथॉन, टायमिंग रन, ड्रीम रन, फॅमिली रन या चार प्रकारांत प्रत्येकी महिला व पुरुष धावपटूस, यातही वय वर्षे १८ ते ३५, ३६ ते ५० आणि वय वर्षे ५१ पुढील विजेत्या धावपटूस अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकास दहा हजार, सात हजार, पाच हजार, तसेच पाच हजार, तीन हजार.

दोन हजार असे एकूण साडेतीन लाखांवर रोख बक्षिसे दिली जातील. आंतरराष्ट्रीय किर्तीचे कुस्तीपटू संग्राम सिंग, सिनेतारका संस्कृती बालगुडे, धावपटू कविता राऊत, क्रांती साळवे आणि अपर पोलिस अधीक्षक तथा ट्रीपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी स्पर्धेचे विशेष आकर्षण असतील.

रोटरी क्लब, पोलिस सज्ज

पोलिस ग्राउंडवर रविवारी (ता. २) रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड आणि पोलिस दलातर्फे स्पर्धेचे व्यवस्थापन केले जाईल. रोटरी क्लबचे शंभराहून अधिक सदस्य सहभागी होतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीत आयोजन समितीचे प्रमुख अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक तथा शहराचे उपअधीक्षक हृषीकेश रेड्डी.

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, महापालिकेच्या उपायुक्त डॉ. संगीता नांदूरकर, गृह शाखेचे पोलिस उपअधीक्षक धनंजय पाटील, एलसीबीचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे.

स्पर्धेचे समन्वयक सहाय्यक पोलिस अधिकारी पंडित सोनवणे, रोटरीचे माजी गव्हर्नर आशिष अजमेरा, आशिष पटवारी, दीपक अहिरे, संग्राम लिमये, डॉ. राहुल बच्छाव, निखिल सूर्यवंशी आदी परिश्रम घेत आहेत.

मैदानावर टीशर्ट, ‘बीब’चे आज वाटप

पोलिस ग्राउंडवर शनिवारी (ता. ३) सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत मोफत नोंदणीधारक स्पर्धकांना ‘बीब’चे (छातीवर लावण्याचा स्पर्धक क्रमांक) वाटप होईल. तसेच सशुल्क नोंदणीधारकांनाही टीशर्ट व ‘बीब’चे वाटप होईल. बीब प्राप्त केल्याशिवाय स्पर्धक अधिकृत ठरणार नाही याची संबंधितांना दक्षता घ्यावी लागेल.

त्यासाठी सशुल्क व मोफत नोंदणीतील विविध गटांतील स्पर्धकांनी बीब प्राप्त करावे, असे आवाहन आयोजकांनी केले. पोलिस ग्राउंडवर रविवारी (ता. ४) सर्व स्पर्धकांना मेडल, रिफ्रेशमेंट बॉक्सचे मोफत वाटप केले जाईल. तसेच स्पर्धेसाठी नोंदणीकृत मोबाईल, ई-मेलवर सहभागाचे प्रमाणपत्र पाठविले जाणार आहे.

आयोजक स्पर्धकांच्या स्वागतासाठी सज्ज

धुळे मॅरेथॉनचे फिट धुळे- हिट धुळे हे घोषवाक्य, तर यंदा रन फॉर पांझरा, अशी थीम आहे. धुळेकरांसह राज्यातील स्पर्धकांना सहभागाचे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे- पाटील, जिल्हा परिषद सीईओ शुभम गुप्ता, जिल्हा क्रीडाधिकारी अविनाश टिळे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्यासह `सकाळ` माध्यम समूहाने केले.

जिल्हा पोलिस दलाच्या पुढाकारासह महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आणि शैक्षणिक क्षेत्रातील अग्रेसर एसव्हीकेएम संस्था, रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड, २५ दानशूर संस्था, कंपन्यांसह माध्यम प्रयोजक `सकाळ` माध्यम समूहच्या साथीने हा मॅरेथॉन लोकोत्सव होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT