धुळे : राज्यात महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात कोणतेही ठोस काम झाले नाही. त्यानंतर महायुतीच्या सरकारने मात्र सर्व योजनांचा लाभ जनतर्यंत पोचविण्याचे काम केले. लोकसभेत ज्या चुका झाल्या यावर विचारमंथन झाले आहे. त्या सुधारून आगामी काळात राज्यात महायुतीचे सरकार आणण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, लोकसभेच्या पराभवाने न खचता पुढील निवडणुकीला सामोरे जायचे आहे, असे आवाहन केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी भाजपच्या येथील स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला. (Dhule Metropolitan BJP Convention)
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे रविवारी (ता. ४) दुपारी शहरातील कृष्णा रिसॉर्ट (गुरुद्वारासमोर, मालेगाव रोड) येथे धुळे महानगर भाजपचे अधिवेशन झाले. मंत्री सौ. खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. भाजपचे संघटन महामंत्री विजय चौधरी, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, भाजप धुळे विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल, शहर-जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, महिला जिल्हाप्रमुख वैशाली शिरसाट, राज्य उपाध्यक्षा जयश्री अहिरराव, माजी महापौर प्रदीप कर्पे, प्रतिभा चौधरी, ज्येष्ठ नेते दयानंद मेहता, हिरामण गवळी, माजी नगरसेवक देवेंद्र सोनार आदी उपस्थित होते.
मंत्री सौ. खडसे म्हणाल्या, की आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकच विचारधारा घेऊन सर्वांना काम करावयाचे आहे. पदापेक्षा विचारधारा महत्त्वाची आहे. विधानसभेत उमेदवार न पाहता पक्षाची ताकद वाढविण्याचे काम केले पाहिजे. काँग्रेसने ६० वर्षांत जी कामे केली नाहीत, ती भाजपने केवळ दहा वर्षांत केली. यापुढील काळात आपण सर्वांनी मतभेद बाजूला ठेवणे गरजेचे आहे. एकदिलाने मागील सर्व काही विसरून काम करावयाचे आहे.
संघटन महामंत्री चौधरी म्हणाले, की लोकसभेचा पराभव पक्षाने गांभीर्याने घेतला आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे. १७ हजार बोगस मतदान झाले आहे. याबाबत संबंधितांवर कारवाई होईलच. तसेच डॉ. भामरे यांना न्याय देण्यासाठी पक्ष त्यांच्या पाठीशी आहे. (latest marathi news)
माजी खासदार डॉ. भामरे यांनी मोदींना घालविण्यासाठी एका समाजाने काँग्रेसला मतदान केले. मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान झाले. त्यामुळे आपला पराभव झाला. त्याची चौकशी झालीच पाहिजे, असे सांगितले. भाजप प्रवक्ते संजय शर्मा यांनी लोकसभेप्रमाणेच आताही मराठा आरक्षणावरून विरोधकांकडून नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला.
अंतर्गत वाद चव्हाट्यावर
दरम्यान, अधिवेशनात भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. मंत्री सौ. खडसे यांच्या आगमनापूर्वी अधिवेशनस्थळी कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. विशिष्ट वक्तव्यावरून कार्यकर्त्यांत गोंधळ उडाला. भाजपचे दोन गट समोरासमोर आल्याने पक्षांतर्गत खदखद यानिमित्ताने चव्हाट्यावर आली.
भाषणादरम्यान हिरामण गवळी यांनी निवडणुकीसाठी निधी, सर्व काही देऊनही काहींनी काम केले नाही, असे सांगितले. त्यावर नागसेन बोरसे यांनी आक्षेप घेतल्याने गोंधळ उडाला. त्यात रोहित चांदोडे यांनीही आक्षेप घेतल्याने गोंधळात भर पडली. पंधरा मिनिटे हा गोंधळ सुरू होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.