Dhule News : स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत मंजूर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या मंजूर निधीतून धुळे महापालिकेने सुमारे पाच कोटी रुपये खर्च करून ७९ घंटागाड्यांची खरेदी केली. गेली सुमारे पाच वर्ष या घंटागाड्यांच्या माध्यमातून शहरातील कचरा संकलनाचे काम सुरू आहे. मात्र, यातील बऱ्याचशा घंटागाड्यांची स्थिती भंगारवस्थेकडे असल्याचे पाहायला मिळते.
साधारण २० घंटागाड्या दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये आहेत, असे असले तरी एक गाडी दुरुस्ती झाली की दुसरी गॅरेजमध्ये टाकावी लागते, अशी स्थिती आहे. त्यामुळे कचरा संकलनाच्या कामावरही त्याचा परिणाम होत आहे. शासन निधीतून नवी मालमत्ता घ्यायची आणि ठेकेदाराच्या हातून ती भंगार करून घ्यायची अशा या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. (Dhule municipality 5 crore clockwork towards scrap Arrangement)
धुळे महापालिकेला २०१७ मध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी २५ कोटी ८५ लाखांचा प्रकल्प मंजूर झाला. या प्रकल्पात विविध कामांचा समावेश होता. यातील चार कोटी ९३ लाख ७५ हजार रुपये खर्चातून ७९ घंटागाड्यांची खरेदी करायची होती. मे-२०१९ मध्ये धुळे महापालिकेने ७९ घंटागाड्या खरेदी केल्या.
त्यानंतर या घंटागाड्या कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराच्या ताब्यात दिल्या. प्रथम वॉटरग्रेस कंपनीकडून व त्यानंतर स्वयंभू ट्रान्स्पोर्ट कंपनीतर्फे धुळे शहरातील कचरा संकलनाचे काम सुरू आहे. अर्थात सुमारे साडेचार-पाच वर्षांपासून या घंटागाड्यांच्या माध्यमातून शहरातील कचरा संकलनाचे काम सुरू आहे.
अर्थात पहिल्या दोन-अडीच वर्षातच या नव्याकोऱ्या घंटागाड्यांना नादुरुस्तीचे ग्रहण लागले, ते आजपर्यंत कायम आहे. अगदी वॉटरग्रेस कंपनीकडून काम सुरू असताना २०२१ मध्येही तब्बल ३० घंटागाड्या नादुरुस्त असल्याने कंपनीला पर्यायी वाहनांची व्यवस्था करून कचरा संकलनाचे काम करावे लागत होते. मध्यंतरीच्या काळात तर काही घंटागाड्या एका खासगी गॅरेजमध्ये बिल अदा न झाल्याने अनेक महिने पडून होत्या. नंतर त्या प्रशासनाने ताब्यात घेतल्या.
आताही स्थिती नाजूक
सद्यःस्थितीत घंटागाड्यांची स्थिती नाजूक असल्याचे दिसते. कारण, सुमारे २० घंटागाड्या दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये असल्याने स्वयंभू ट्रान्स्पोर्ट कंपनीनेही पर्यायी २० इतर वाहने (छोटा हत्ती) कचरा संकलनासाठी लावल्या आहेत. अर्थात केवळ या २० घंटागाड्यांचा प्रश्न नाही. इतर घंटागाड्यांची अवस्थाही फारशी चांगली नसल्याचे सांगण्यात येते.
कारण, ज्या घंटागाड्या दुरुस्तीनंतर गॅरेजमधून काढल्या जातात, त्यांच्या जागेवर दुसऱ्या घंटागाड्या दुरुस्तीसाठी टाकल्या जातात. त्यामुळे हे चक्र सुरुच आहे. अर्थात घंटागाड्या नादुरुस्त होणे व त्या दुरुस्तीला टाकणे ही प्रक्रिया नेहमी चालणारी आहे. मात्र, मोठ्या संख्येने गाड्या नादुरुस्त होणे व त्यामुळे पर्यायी वाहनांची व्यवस्था करावी लागणे यातच घंटागाड्यांची समस्या गंभीर असल्याचे लक्षात येते. (latest marathi news)
कर्मचाऱ्यांच्याही तक्रारी
घंटागाड्यांची स्थिती चांगली नसल्यामुळे या घंटागाड्यांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडूनही घंटागाड्या दुरुस्तीची मागणी वारंवार होताना दिसते. ही सर्व स्थिती लक्षात घेता सुमारे पाच कोटीच्या घंटागाड्या आता भंगारावस्थेकडे निघाल्या का, असा प्रश्न पडतो. त्यामुळे यातून मार्ग कसा निघणार हा प्रश्न आहे.
असा प्रयत्न शक्य
कचरा संकलनाचे काम सध्या स्वयंभू ट्रान्स्पोर्ट कंपनीकडून सुरू आहे. या कंपनीला तब्बल सात वर्षांचा ठेका दिला आहे. मात्र, तो सात वर्ष हे काम चालेल का यावर प्रश्नचिन्ह आहे. नवीन ठेकेदाराची नियुक्ती झाल्यास, संबंधित ठेकेदारानेच घंटागाड्यांचीही व्यवस्था करावी (ठेकेदाराच्याच घंटागाड्या) असाही एक प्रयत्न होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.