Dhule News : शहरातील प्रभाग २ मधील नवतेज कॉम्प्लेक्सजवळील तसेच धरती कॉलनीमागील रस्त्याचे काम सुमारे नऊ महिन्यांपासून अर्धवट आहे. अर्धवट कामामुळे सुमारे २६ कॉलनीवासीयांचे हाल होत आहेत. नव्याने निविदा काढून भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने हे काम अपूर्ण ठेवले आहे का ? (Dhule Road works partial since 9 months 26 plight of colonists)
असा सवाल करत या दोन्ही रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण न झाल्यास शिवसेना (ठाकरे गट) स्टाइल आंदोलन करू असा इशारा पक्षाचे विधानसभा संघटक ललित माळी यांनी धुळे महापालिका आयुक्तांना दिला आहे. प्रभाग २ मधील नवतेज कॉम्पलेक्सपासून पश्चिमेकडे असलेला प्रमुख रस्ता व धरती कॉलनी येथील रस्ता सुमारे नऊ महिन्यांपासून केवळ मोठी खडी टाकत त्यावर नाममात्र बारीक डांबर, वरवर बारीक खडी टाकून अपूर्णावस्थेत सोडून दिला आहे.
बारीक खडी आता मुख्य रस्त्यावरून रस्त्याच्याकडेला आली आहे तर संपूर्ण रस्त्यावर मोठ्या आकाराची अणकुचीदार खडी, दगडवर आली आहेत. त्यामुळे कॉलनीतील नागरिकांना पायी चालणे कठीण झाले आहे. दुचाकी स्लीप होते, गंभीर स्वरूपाचे अपघात सात्यत्याने होत आहेत. किरकोळ स्वरूपाचे अपघात जवळपास रोजच घडतात. दुचाकी व चारचाकी वाहने अणकुचीदार दगडांमुळे वारंवार पंक्चर होतात.
बारीक खडीमुळे प्रचंड धुळीचा त्रासही नागरिकांना होत आहे. प्रमुख रस्ते असल्याने सुमारे २६ कॉलनीतील रहिवाशांचा या रस्त्यांवरून वापर आहे. हे रहिवासी गेल्या नऊ महिन्यांपासून या समस्येने त्रस्त आहेत. याबाबत नागरिकांनी तसेच शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही वारंवार प्रशासनाकडे तक्रारी केल्या मात्र समस्या कायम असल्याचे श्री. माळी यांनी म्हटले आहे. (latest marathi news)
भ्रष्टाचारासाठी रस्ते अपूर्ण
सद्यःस्थितीत धुळे महानगरपालिकेत रस्त्यांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे. काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या मर्जीतील ठेकेदारांनी प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून भ्रष्टाचार करण्याचे नवनवीन फंडे काढले आहेत.
नवीन रस्ते अथवा अपूर्ण अवस्थेतील रस्त्यांचे पुन्हा टेंडर काढून त्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करायचा असे फंडे वापरले जात आहेत असा आरोपही श्री. माळी यांनी केला आहे. त्यामुळे नवतेज बाजाराजवळील व धरती कॉलनी येथील दोन्ही रस्त्यांची सुमारे २३ टक्के बिले अदा केल्यानंतरही रस्त्यांची कामे अपूर्णावस्थेत का आहेत ? असा सवालही केला आहे.
...अन्यथा आंदोलन
धरती कॉलनीजवळील रस्त्यांची मागील पाच वर्षात कोणतेही निविदा काढलेली नाही, कार्यारंभ आदेश नाही. त्यामुळे सदर रस्ता कोणत्या योजने अंतर्गत होत आहे, ठेकेदार कोण आहे याबाबत महापालिकेकडे अनेकदा कागदपत्रांची मागणी केली मात्र मनपाकडून कोणतेही कागदपत्र विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेले नाही.
त्यामुळे गौडबंगाल काय, रस्ता नऊ महिन्यांपासून अपूर्ण का? असे सवाल करत रस्त्याचे काम त्वरित पूर्ण न झाल्यास शिवसेना स्टाइल आंदोलन करू असा इशारा श्री. माळी यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.