Solar City Project and Suzlon Wind Power Project esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : कॉपर केबल खरेदी करणारे किती पकडले? साक्री तालुक्याचा निजामपूर पोलिसांना प्रश्‍न

निखिल सूर्यवंशी - सकाळ वृत्तसेवा

Dhule News : जगाच्या औद्योगिक नकाशावर जिल्ह्यासह साक्री तालुक्यास ओळख देणाऱ्या सोलर सिटी प्रकल्प आणि सुझलॉन पवनऊर्जा प्रकल्पातून कॉपर केबल चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यात सहा ते आठ सराईत गुन्हेगार टोळ्या गुंतल्या आहेत. चोरीनंतर कॉपर केबल कुठे विक्री होतात, त्यातील गैरव्यापारी, भंगार व्यावसायिकांची चांदी कशी होऊ लागली, कुणाच्या पाठबळावर हा व्यवसाय बिनदिक्कतपणे विस्तारला याचा चौकशी, तपास अहवाल निजामपूर पोलिस ठाण्याने जाहीर करावा, अशी मागणी साक्री तालुक्यातून होऊ लागली आहे. (theft of copper cables from Solar City project and Suzlon wind power project )

कॉपर केबल चोरीच्या घटनांनी अनेक गंभीर प्रश्‍न राज्यासह जिल्ह्यापुढे उपस्थित केले आहेत. गुन्हेगारी टोळ्यांमुळे अब्जावधी गुंतवणुकीच्या विकास प्रकल्पांची आबाळ आणि जिल्ह्यासह साक्री तालुक्याची बदनामी होत असताना लोकप्रतिनिधींचा सरकारी यंत्रणेवर अंकुश कसा नाही, ते असला प्रकार कशामुळे खपवून घेतात या गंभीर चर्चेला आता तोंड फुटले आहे.

‘एसआयटी’ स्थापन करा

प्रकल्प स्थापनेपासून कॉपर केबल चोरीच्या गुन्ह्यांची माहिती संकलित झाली तर मोठी जंत्रीच समाजासमोर येईल. त्यात गुन्हे किती, आरोपी किती, किती रकमेच्या मालाची रिकव्हरी झाली, मुळाशी तपास झाला का, तो झाला असेल तर गुन्हेगारी टोळ्या सक्रिय कशा, चोऱ्यांचे प्रमाण का कमी होत नाही, तपासाची दिशा काय राहिली यासह असंख्य प्रश्‍नांची उत्तरे निजामपूर पोलिस ठाणे आणि साक्री उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना समाजास द्यावी लागतील.

त्यामुळे कॉपर केबल चोरीच्या घटनांनी आता गंभीर वळण घेण्यास सुरवात केली आहे. त्यात राज्य शासनाने ‘एसआयटी’ स्थापन करून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणी साक्री तालुक्यातून होऊ लागली आहे. (latest marathi news)

वर्षभरापासून चोरी वाढली

गेल्या वर्षभरापासून दोन्ही प्रकल्पस्थळी वाढत्या चोरीच्या घटनांमुळे सुरक्षारक्षक त्रस्त झाले आहेत. गुन्हेगारी टोळ्यांच्या दगडफेकीतून तुफान हल्ल्यात जिवाचे बरे- वाईट होईल या भीतीने सुरक्षारक्षक गर्भगळित झाले आहेत. प्रकल्पांच्या संरक्षणासाठी नियुक्त सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या कंपन्या, विकास प्रकल्पाच्या देखभाल-दुरुस्तीचे कंत्राट घेतलेल्या कंपन्या या सराईत गुन्हेगार व टोळ्यांमुळे आर्थिक संकटात सापडत आहेत.

दगडफेकीतून हल्ला, दरोड्याचे प्रकार, जिवावर घाला, असे गंभीर प्रकार घडत असताना निजामपूर पोलिस ठाण्याने प्रत्येक तक्रारीची दखल घेतली का, गुन्ह्यात कुठल्या कलमांचा वापर केला, चोरी झालेल्या मालाची खरी किंमत नोंदविली का, कॉपर केबल चोरीस गेल्यावर ती कमी प्रमाणात दाखविली का अधिक या सर्व प्रश्‍नांची उकल चौकशीतून व्हावी, अशीही मागणी साक्री तालुक्यातून जोर धरू लागली आहे.

व्यापारी किती पकडले?

कॉपर केबलच्या चोरीनंतर त्याची विक्री गुन्हेगारी टोळ्यांकडून कुठे केली जाते, किती रकमेला खरेदी-विक्री होते, यातील गैरव्यावसायिक किंवा भंगारवाले किती संख्येने आहेत, ते कुठल्या भागात आहेत, त्यातही मक्तेदारी निर्माण झाली का, पैकी किती गैरव्यावसायिक, भंगारवाले पकडले, त्यांच्यावर काय कारवाई झाली, खरेदी-विक्रीला चालना मिळत असल्यानेच चोरीचे प्रकार घडत नसावेत असे कशावरून मानावे,

तपासाची दिशी नेमकी काय राहिली यासह विविध गंभीर प्रश्‍नांवरील जाब निजामपूर पोलिस ठाण्याला आज ना उद्या द्यावाच लागणार आहे, असे साक्री तालुक्याचे ठाम मत आहे. विजेचा तुटवडा आणि पर्यावरण रक्षणासंदर्भात स्थापन झालेल्या सोलर सिटी व पवनऊर्जा प्रकल्पाची आबाळ होऊ नये म्हणून काय उपाययोजना केल्या जाणार आहेत, याची तालुक्याला प्रतीक्षा आहे.

अंबापूरपासून नंदुरबारपर्यंत जाळे...

कॉपर केबल चोर, प्रकल्पावर डाका टाकणारे दरोडेखोर हे प्रकल्प परिसरातील आजूबाजूच्या गावांतील असल्याचे बोलले जाते. त्यांच्या हालचाली टिपणे पोलिसांसाठी काही अवघड नाही. काही संशयितांची नावे पोलिसांकडे आहेत. पण ठोस कारवाई होताना दिसत नाही. कॉपर केबल अर्थात तांब्याची तार विकत घेणाऱ्या गैरव्यापारी, भंगार व्यावसायिकांवर कारवाई झाली तर बऱ्याच प्रश्‍नांचे निराकरण होणार आहे.

त्यासाठी इच्छाशक्तीची गरज असेल. सद्यःस्थितीत कॉपर केबल प्रकरणातील गैरव्यापारी, भंगार व्यावसायिक अंबापूर, साक्री, निजामपूर, धुळे, सोनगीर, नंदुरबारला स्थिरावल्याचे बोलले जाते. पुढे काय होते याची पारदर्शक पोलिस तपासातूनच उकल होऊ शकेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT