धुळे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत खलबते सुरू आहेत. त्यात प्रमुख सर्व पक्षांनी उमेदवार निवडीसाठी मुलाखती, पसंती मतदानासह विविध प्रक्रिया राबविण्यास वेग दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (शरदचंद्र पवार) पुण्यात सर्वोच्च नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. ७) धुळे जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. (NCP demand 3 seats )
त्या वेळी त्यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जागा मिळाव्यात, या जागा पक्षाने सोडू नयेत, अशी आग्रही भूमिका मांडली. त्यामुळे राजकीय पटलावर रंगत वाढते आहे. महायुतीतील घटक पक्ष भाजप निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याने धुळे शहर मतदारसंघाची जागा शिवसेनेला (शिंदे गट) बहाल करण्यात आली आहे. महाविकास आघाडीत याच मतदारसंघाच्या जागेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे माजी आमदार अनिल गोटे उमेदवार असतील, असे संकेत खासदार संजय राऊत यांनी दौऱ्यावेळी दिले आहेत.
समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव, प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी पक्षाचे येथील पदाधिकारी ईर्शाद जहागीरदार महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी करतील, असे जाहीर केले आहे. एकूणच अशा रंगतदार चर्चांसह घडामोडी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) इच्छुकांनी जिल्ह्यातील तीन मतदारसंघातील जागा मागितल्याने रंगतदार वातावरणाची भर पडली. (latest marathi news)
निवडणूक कशी जिंकणार?
पुणे येथे नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार व अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुलाखती झाल्या. त्यात धुळे शहर, शिंदखेडा आणि शिरपूर मतदारसंघाची जागा इच्छुकांनी मागितली. धुळे शहरासाठी माजी महापौर कल्पना महाले, शहराध्यक्ष रणजित भोसले, माजी नगरसेवक संजय पाटील, उद्योजक सचिन दहिते, शिंदखेडा मतदारसंघासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कामराज निकम, प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे, शिरपूर मतदारसंघासाठी डॉ. जितेंद्र ठाकूर यांनी मुलाखत दिली. निवडणूक जिंकणार कशी ते सांगा, असा थेट प्रश्न विचारत शरद पवार यांनी इच्छुकांची क्षमता तपासली.
धुळ्यासाठी आग्रह
धुळे शहर मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. या मतदारसंघातील निवडणुकीत शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अद्याप यश मिळालेले नाही. त्यामुळे आपल्या पक्षाने धुळे शहराची जागा सोडू नये, असा आग्रह इच्छुकांनी शरद पवार यांच्याकडे धरला. शिंदखेडा, शिरपूर मतदारसंघातील इच्छुकांनीही या मतदारसंघातील जागा पक्षालाच सोडवून घ्यावी, अशी मागणी केली. त्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेसपुढे जागा वाटपाबाबत पेच असेल, असे चित्र दिसते.
...तर शिवसेना ‘उबाठा’ला जागा नाही?
धुळे ग्रामीण, साक्री मतदारसंघात काँग्रेसला जागा दिली जाणार आहे. शिंदखेडा मतदारसंघाची जागा काँग्रेसने प्रतिष्ठेची केली आहे. धुळे शहर मतदारसंघाची जागा आपल्या ‘राष्ट्रवादी’ला घ्यावी आणि शिंदखेडा मतदारसंघाची जागा काँग्रेसला द्यावी, असा बहुचर्चित सूरही या पक्षांमधून उमटत आहे. तसे जर झाले तर शिवसेना ‘उबाठा’ला जिल्ह्यात जागा मिळणार नाही का, धुळ्याऐवजी अन्य जिल्ह्यात या पक्षाकडून जागा मागितली जाईल का, असे प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात असतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.