Farmers intercropping with tractors in Dara Shivara. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Drought News : दुष्काळात चातकासारखी प्रतीक्षा पावसाचीच! वेधशाळेनेच्या संकेताने बळीराजा आंतरमशागतीत व्यस्त

Agriculture News : वेळेत पाऊस झाला तर शेतकरी सावरू शकतो. या पार्श्वभूमीवर बळीराजाला आज तरी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

दगाजी देवरे

म्हसदी : यंदा दुष्काळाच्या गडद छायेत शेती व्यवसाय सापडला आहे. खरिपापाठोपाठ रब्बीनेही मोठी निराशा केली आहे. वेधशाळेने मॉन्सून लवकर सक्रिय होण्याचे संकेत दिल्याने नेहमीच प्रत्येक संकटाला धीरोदात्तपणे तोंड देणारा बळीराजा आंतरमशागतीसाठी सरसावला आहे. वेळेत पाऊस झाला तर शेतकरी सावरू शकतो. या पार्श्वभूमीवर बळीराजाला आज तरी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. (Dhule Waiting for rain in drought farmers)

सध्या पाऊस होईल असे संकेत वेधशाळा देत असली तरी अजून पाऊस होईल अशी चिन्हे दिसत नाहीत. मृग नक्षत्रात हमखास पाऊस होईल, अशी अपेक्षा बळीराजा बाळगून आहे. तथापि, यंदाच्या दुष्काळाचा सामना करताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अनेक समस्यांनी शेतकरी हतबल झाला आहे.

साक्री तालुक्यात निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्र कोरडवाहू आहे. यंदा जवळपास ९० टक्के क्षेत्र कोरडवाहू झाले आहे. बागायती क्षेत्रात केवळ पाळीव प्राण्यांना पाण्यासाठी वीजपंप सुरू करणे शक्य असल्याचे चित्र आहे. कोरडवाहू शेतकरी प्रामुख्याने तृणधान्यातील बाजरी, मका, ज्वारी, कडधान्ये व भुईमुगाची पेरणी करतात.

वेधशाळेच्या अंदाजानुसार यंदा पाऊस लवकर होईल, या अपेक्षेने शेतकरी पेरणीपूर्वी आंतरमशागतीत व्यस्त झाला आहे. यांत्रिकीकरणामुळे ट्रॅक्टरच्या माध्यमातून नांगरणी, वखरणी, विरळणी यांसारखी कामे केली जात आहेत.

भुईमूग पेरणी होईल दुर्मिळ

कोरडवाहू शेतकऱ्यांचे पैशाचे पीक म्हणून भुईमूग पिकाकडे पाहिले जाते किंबहुना कोरडवाहू शेतकऱ्यांची आर्थिक मदारच भुईमूग पिकावर अवलंबून असते. यंदा खरिपात भुईमुगाची पेरणी नगण्य होईल, अशी परिस्थिती आहे. यंदा अत्यल्प पावसामुळे विहिरींची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत आहे.

विहिरींना पाणी नसल्याने उन्हाळ भुईमुगाची पेरणी तोकडी झाली आहे. भुईमुगाचे बियाणे महागडे आणि दुरापास्त होणार आहे. यंदा कधी नव्हे एवढे भुईमुगाचे बियाणे महाग मिळणार आहे. पूर्वी सर्वच शेतकऱ्यांकडे घरचे बियाणे उपलब्ध होत असे. अलीकडे वाढत्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना घरचे बियाणे तयार करणे अशक्य झाले आहे. मृग नक्षत्राच्या पावसात भुईमूग पेरणी कधीही लाभदायक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (latest marathi news)

कपाशी, तुरीपासून शेतकरी वंचितच

विहिरींना मुबलक पाणी असल्यावर दर वर्षी शेतकरी मेमध्ये कपाशी लागवड करत होते. यंदा हातखर्चासाठी तत्काळ पैसे उपलब्ध करणाऱ्या लवकर लागवड केल्या जाणाऱ्या तूर पिकापासूनही शेतकरी दुरावला आहे. विहिरींनी तळ गाठल्याने बागायतदार शेतकऱ्यांची हमीची समजली जाणाऱ्यारी पांढरे सोने, तूर आदी पिके नसल्याने यंदा ऐन खरीप हंगामाच्या पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना हातउसनवारी करण्याची वेळ येणार आहे.

दर वर्षी लवकर लागवड झालेले तुरीचे पीक मेमध्ये भरघोस निघत असे. यंदा अपवाद ठिकाणी गवार, भाजीपाला विक्रीसाठी नजरेस पडत आहे. गुजरातमध्ये विक्रीसाठी पाठविल्या जाणाऱ्या गवारीदेखील अपेक्षित दर मिळत नसल्याचे शेतकरी सांगतात.

पाण्याचे महत्त्व पटले

तीव्र उन्हाचे चटके सोसत शेतकरी, शेतमजूर होरपळून निघाला आहे. कधी पाऊस येईल आणि...धरणीमाता तृप्त होईल याची चातकासारखी प्रतीक्षा बळीराजा करत आहे. यंदाचा उन्हाळा जीवघेणा असल्याची प्रतिक्रिया शेतकरी, शेतमजुरांसह सर्वच घटकांतून व्यक्त केली जात आहे.

यंदाच्या दुष्काळाचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. वेधशाळा, पंजाबडग व अन्य हवामान विभागाच्या तज्ज्ञांच्या माहितीनुसार लवकर आणि मुबलक पावसाचे संकेत मिळाले आहेत. यातून दिलासा मिळणार असला तरी ज्या दिवशी पाऊस होईल तोच दिवस शेतकऱ्यांसाठी आनंद देणारा ठरणार आहे.

कारण यंदा पाण्याचे महत्त्व सर्व शेतकऱ्यांना पटले आहे. लवकर पाऊस बरसेल या अपेक्षेने बळीराजा कामाला लागला आहे. एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी, तर दुसरीकडे केवळ पाऊस आणि शेतीविषयक चर्चेत शेतकरी व्यस्त आहे. आज सत्तेचा मोह राजकारणी मंडळींना वाटत असला तरी जगाचा पोशिंदा म्हणून ओळख असलेल्या बळीराजाला मात्र खरीप हंगामाचे वेध लागले आहेत.

"यंदा दुष्काळ, उन्हाचे चटके नकोनकोसे झाले आहेत. वर्षभरात खरीप, रब्बी हंगाम घेणारा शेतकरी दोन्ही हंगामापासून वंचित राहिला आहे. आज जोरदार पाऊस होईल हीच अपेक्षा शेतकरी बाळगून आहे. निवडणुका काय येतील आणि जातीलही, पण शेतकऱ्यांची पाठ मात्र दारिद्र्य आणि दुष्काळ सोडणार नाही हेच खरे."

-सुरेश पाटील-सोनवदकर, शेतकरी, दिघावे (ता. साक्री)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT