Dhule News : आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळा आणि त्यातील विद्यार्थ्यांसाठी विविध वस्तू, साहित्याची खरेदी आता बंद केली जाणार आहे. त्याऐवजी थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम दिली जाणार आहे.
१ ते १० जूनदरम्यान रक्कम देऊन शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांनी वस्तूंची खरेदी केल्याची तपासणी केली जाईल, अशी माहिती या विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.(Direct funds to students of ashram schools now instead of goods dhule news)
आदिवासी विकास विभागाने शासन निर्णय प्रकाशित केला असून, राज्य शासनाच्या सुधारित खरेदी धोरणानुसार थेट लाभ हस्तांतर प्रक्रियेवर भर दिला जात आहे. त्यामुळे वस्तूंची खरेदी करून पुरवठा न करता थेट निधी लाभार्थ्यांना देण्याचे धोरण निश्चित केले आहे.
त्यानुसार आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या काही वस्तूंची खरेदी न करता त्यासाठीचा निधी थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
वस्तूंची संख्या निश्चित
नव्या निर्णयानुसार गणवेश संच, नाइट ड्रेस, शालेय साहित्य आणि लेखनसामग्री थेट लाभ द्यावयाच्या वस्तूंमधून वगळण्यात आल्या आहेत. प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी प्रतिविद्यार्थी वस्तू किंवा साहित्याची संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार वर्गनिहाय विद्यार्थ्यांनी खरेदी करावयाच्या वस्तूंचे परिमाण, संख्या निश्चित करून वस्तूनिहाय खरेदी किंमत निश्चित करण्यात येईल.
खरेदी किंमत निश्चित करताना त्या वस्तूच्या निश्चित परिमाणानुसार बाजारात उपलब्ध असलेल्या ब्रॅन्डेड वस्तूच्या किरकोळ विक्री किमतीचा आधार घेऊन वस्तूची किंमत निश्चित केली जाईल. विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुटीवर जाताना त्यांना वर्गनिहाय कोणत्या वस्तूंसाठी रक्कम मिळाली आहे, त्या वस्तूंचे परिमाण आणि संख्या यांची यादी मुख्याध्यापकांनी विद्यार्थी आणि पालकांना उपलब्ध करून देण्याची सूचना शासनाने दिली आहे.
वस्तूंऐवजी निधीचे वाटप
शासनाने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वस्तूंऐवजी निधीचे वाटप करताना वर्षासाठी वस्तूंची संख्या अशी निर्धारित केली आहे.
अंघोळीचा साबण (१०), कपडे धुण्याचा साबण (३०), खोबरेल तेल (१०), टूथपेस्ट (१०), टूथब्रश (चार), कंगवा (दोन), नेलकटर (दोन), मुलींसाठी निळ्या रिबन (जोड, चार), रेनकोट किंवा छत्री (एक), वुलन स्वेटर (तीन वर्षांतून एकदा) (एक), अंतर्वस्त्र (दोन), टॉवेल (एक), सँडल किंवा स्लिपर (एक), अन्य आवश्यक पाठ्यपुस्तके आणि सराव प्रश्नसंच.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.