Dhule News : ‘फॅशन’च्या प्रभावामुळे लग्नकार्याचा खर्च वाढतच असल्याचे चित्र आहे. हळद, लग्नविधीच्या आधी ‘मेंदी’च्या कार्यक्रमाची वेगळी क्रेझ पुढे येत आहे. मेंदीच्या कार्यक्रमात करमणुकीसाठी नृत्य, गीतगायन, नाटिका सादर केल्या जातात. (Due to influence of fashion cost of wedding is increasing dhule news)
वाढत्या महागाईत असले नको ते फंडे नसावेत अशा ज्येष्ठांच्या अपेक्षेकडे स्पेशल दुर्लक्ष केले जात असल्याचे वास्तव आहे. कोरोनाच्या काळात गर्दीवर नियंत्रण आले होते. पुन्हा एकदा धामधुमीत आणि जल्लोषात विवाह सोहळे होत आहेत. ऐपतीप्रमाणे विवाह सोहळ्यात आर्थिक खर्च केला जात असला तरी फॅशनमुळे एक नव्या ‘मेंदी’ कार्यक्रमाची भर पडली आहे.
व्हिडिओ चित्रीकरणासह बग्गीचेही आकर्षण
विवाह सोहळा म्हटला म्हणजे फोटोशूट आणि व्हिडिओ चित्रीकरण आलेच. वरातीसाठी पूर्वी केवळ घोड्यावरच्या मिरवणुकीत समाधान मानले जाई. आजही ग्रामीण भागात वरातीसाठी घोड्यावरच्या मिरवणुकीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. दुसरीकडे वर-वधूच्या मिरवणुकीसाठी एक वा दोन घोड्यांच्या बग्गीला प्राधान्य दिले जात आहे.
विवाह सोहळ्यातील प्रत्येक विधीसाठी वाढता खर्च केला जात असला, तरी हे फक्त प्रतिष्ठेसाठी करावे लागत असल्याचे कोणीही नाकारू शकत नाही. सर्वाधिक खर्च जेवणावळ, वाद्यवृंद, मंडप, मंगल कार्यालयावर दिसत असला तरी प्रत्येक ठिकाणी खर्च वाढता दिसतोय.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
अलीकडे नवरदेवाच्या मिरवणुकीपेक्षा हळदीच्या दिवशी नाचगाण्यास अधिक महत्त्व दिले जात आहे. यंदा तर ‘गोंडा वाली ये पोरी..’ या गाण्यावर उशिरापर्यंत ठेका धरला जात आहे. लग्नासारखे कार्यक्रम प्रतिष्ठेचे, श्रीमंतीचा देखावा सादर करण्यासारखे झाले आहेत. दुसरीकडे ‘होऊ द्या खर्च’ असे म्हणणारेही कमी नाहीत.
बदल आणि परिवर्तन अपेक्षित
सामाजिक चळवळीत अनेक बदल आणि परिवर्तन अपेक्षित असल्याची केवळ चर्चा केली जाते. पण बदल परिवर्तनासाठी कोणीही धाडस करत नसल्याचे समाजालाही मान्य करावे लागेल. पूर्वी ‘ऋण काढून सण साजरे करू नये’ असे म्हटले जात होते आणि ते वास्तवही होते.
अलीकडे प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांची भिन्न-भिन्न प्रकारचे विचार असतात. म्हणूनच कितीही काळ लोटला तरी दिवसेंदिवस फॅशनमुळे बदल घडण्याची शक्यता धूसर होत चालली आहे हेच खरे..!
खेड्यातही मिळते सर्व काही
ग्रामीण भागातही विवाह सोहळ्यासाठी एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. ‘लग्नकार्य तुमच्याकडे सर्व व्यवस्था आमच्याकडे’ असे फलक आचाऱ्याकडे लावलेले असतात. घोडा, मंडप, भटजी, अक्षताच काय वाढपीदेखील पैसे देऊन उपलब्ध करून दिले जातात.
यात वेळ, श्रम वाचत असला तरी पैसे मात्र जास्तीचे मोजावे लागतात. सर्वच बाबतीत बदल प्रामुख्याने दिसणे अपेक्षित आहे. काही न पटणारे बदल दिसत आहेत. पारंपरिक पद्धतीच्या विवाहात आजही सनई चौघड्यांना मानाचे स्थान आहे. काही भागात अजूनही संबळ वाद्ये अस्तित्व टिकवून आहेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.