म्हसदी : थंडी वाढली की पक्ष्यांची शाळा भरायला सुरवात होते. भक्ष्य, खाद्य शोधण्यासाठी विशेषतः बगळे पक्षी पाण्याने तुडुंब भरलेल्या पाझर तलावाच्या चौफेर सकाळी व सायंकाळी दाखल होतात.
येथील देऊर रस्त्यावरील उमराड नाल्यावरील पाझर तलावात गुलाबी थंडीचा गारवा, रम्य, सुखद वातावरणात भरलेली ‘पक्ष्यांची शाळा’ अनेकांना भुरळ घालते.
चित्रबलक, खंड्या आणि पांढरे बगळे जमतात. पक्ष्याचा किलबिलाट आणि मैना - कोकीळेचे गुंजन कानी पडते. पांढरे शुभ्र बगळ्यांचा थवा बघून...ही तर बगळ्यांची शाळा हे वाक्य आपसूक येते. (Every day in winter always show white herons Dhule News)
दमदार पावसामुळे विविध पाझर तलाव, नाला बांध यंदा तुडुंब भरले आहेत. तलावातील मासे बगळ्यांची आवडते खाद्य असल्याचे पक्षी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पाझर तलावालगत मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे असतात. काटेरी झुडपावर असलेल्या बगळ्यांचा थवा पक्षांची शाळाच भरल्याची आठवण करून देतो.
तथापि तलावालगत अनेक नवीन पक्षी देखील आढळतात. पण ते अल्प काळ थांबून स्थलांतर करतात. मात्र, बगळ्यांचा मुक्काम तलावात पाणी असे पर्यंत असतोच. पाझर तलावात मासे, बेडूक, खेकडे व अन्य जलचर प्राणी असतात.
जलचर प्राणी बगळ्यासह अन्य पक्षांचे खाद्य आहे. याभागात चिमण्या, कावळे, घुबड, वारकरी, क्लवा, वंचक, बगळा, टिबुकली, किंगफिशर, मध्यम बगळा, राखी बगळा, गाय बगळा, रात बगळा, पारवे, मैना, प्लवा बदक, खंड्या आदी पक्षी आढळतात. यंदा अंतिम चरणात जोरदार पावसामुळे सर्वच पाणवठ्यांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे.
कुडकुडणाऱ्या गुलाबी थंडीत पक्षी निरीक्षकांसाठी लगबगीचा आणि पर्वणीचा हा काळ. कारण याच काळात शेकडो पक्षी स्थलांतर करत दाखल होतात. पक्षी जगतातील नोंदी घेण्यासाठी पक्षी निरीक्षक सरसावतात अशी माहिती पक्षी अभ्यासक हिमांशू टेंबेकर यांनी दिली.
लहान - मोठ्या जलाशयावर थापट्या, शेंडी बदक, भिव्याच्या बदक, चक्रांग ही बदके तर तुतवार, लाल सुरमा, हिरवा सुरमा, बाक चोच तुतारी, मळगुजा हे किनाऱ्यावर आढळून येणारे पक्षी आहेत. माशीमार पक्ष्यात, तपकिरी माशीमार तर शिकारी पक्ष्यात दलदली भोवत्या, हिवाळी गरुड आदींचा समावेश असल्याची माहिती श्री. टेंबेकर यांनी दिली.
पक्ष्यांचा अधिवास जपणे गरजेचे
पक्षी वैभव वाचविण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा पक्षी तज्ज्ञांची आहे. तलावांचा नैसर्गिकपणा कायम ठेवण्याची गरज यानिमित्ताने वाटते. तलावाकाठची काटेरी उंच झाडे, झुडपे यांची जपणूक करावी. वेलींचे संवर्धन देणे गरजेचे आहे. तळे किंवा नद्यातील गाळ शास्त्रीय पद्धतीने काढण्याची गरज आहे. जलचर प्राण्यांचा जीव धोक्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी. पक्ष्यांचा अधिवास जपण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे.
"निसर्गाच्या सान्निध्यात अनेक नानाविध पशुपक्षी आहेत. किंबहुना ती नैसर्गिक संपत्तीच मानली पाहिजे. अलीकडे अनेक लहान पक्ष्यांचे जीवन धोक्यात आले आहे. ती जगली पाहिजेत. यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत."
-हिमांशू टेंबेकर, पक्षी निरीक्षक, धुळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.