Nandurbar News : विहीर मंजूर करून त्याची अनुदान रक्कम मिळवून देण्यासाठी शेतकऱ्याकडे पाच हजारांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारताना नंदुरबार पंचायत समितीचे विस्तार अधिकारी भय्यासाहेब निकुंभ यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (ता. १९) पकडले. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, त्यास अटक करण्यात आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईची दिलेली माहिती अशी : रनाळे खुर्द (ता. जि. नंदुरबार) येथील ५५ वर्षीय शेतकऱ्यास शेतात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर मंजुरीचा प्रस्ताव मंजूर करून विहिरीच्या अनुदानाची रक्कम तक्रारदार यांना मिळवून देण्यासाठी १२ जूनला नंदुरबार पंचायत समितीतील विस्तार अधिकारी भय्यासाहेब निकुंभे याने तक्रारदार शेतकऱ्याकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. (Extension officer Nikumbh Arrested accepting bribe from farmers Nandurbar Crime News)
संबंधित शेतकऱ्याने नाइलाजास्तव अडकलेले काम काढण्यासाठी निकुंभ यास सोमवारी लाचेची रक्कम देण्याचे निश्चित केले. संबंधित तक्रारदार शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागास ही माहिती दिली.
पथकाने ठरलेल्या परिसरात सापळा रचला. नियोजनानुसार पंचायत समितीच्या परिसरात चहाच्या टपरीवर शेतकऱ्याकडून पाच हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने निकुंभ यास ताब्यात घेतले.
त्याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, अटक करण्यात आली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक समाधान वाघ, हवालदार विजय ठाकरे, विलास पाटील, ज्योती पाटील, पोलिस नाईक संदीप नावाडेकर, देवराम गावित, मनोज अहिरे, अमोल मराठे व चापोना जितेंद्र महाले यांनी केली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.