Nandurbar News : जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या काकडदा (ता. धडगाव) येथील शेतकऱ्यांनी भारत सरकारच्या सेंट्रल सेक्टर स्कीमअंतर्गत ‘आमु आखा एक से शेतकरी उत्पादक कंपनी’ स्थापन करून प्रगतीकडे वाटचाल सुरू केली आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन या कंपनीचे संस्थापक लालसिंग वन्या वळवी यांना स्वातंत्र्यदिनी दिल्ली येथे आमंत्रित करण्यात आले असून, लाल किल्ल्यावर साजरा होणाऱ्या स्वातंत्र्य महोत्सवाच्या कार्यक्रमात त्यांचा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मान होणार आहे.
पंतप्रधान त्यांच्याशी संवादही साधणार आहेत. आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब असून, दुर्गम भागातील आदिवासी शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. (farmer in remote village will be honored by the Prime Minister Lal Singh Valvi from Kakdada brought about change nandurbar)
अल्पभूधारक गरीब शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने महत्त्वाकांक्षी सेंट्रल सेक्टर स्कीमअंतर्गत संपूर्ण देशामध्ये एकूण दहा हजार शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे.
यानुसार नंदुरबार जिल्ह्यात नाबार्डच्या अर्थसहाय्याने व नाबार्डची सहाय्यक संस्था डीएससी (डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर)च्या मार्गदर्शनात पाच शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात आली आहे. या सर्व शेतकरी कंपन्या केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेऊन प्रगती साधत आहेत.
दुर्गम भागातील काकडदा येथे लालसिंग वन्या वळवी व आशा लालसिंग वळवी यांच्या नेतृत्वात या कंपनीतची दोन वर्षांपूर्वी स्थापना झाली असून, परिसरातील १७ गावांतील सुमारे ५८९ शेतकरी यात सहभागी झाले आहेत.
ज्यात ७२ महिला शेतकरी आहेत. या कंपनीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अल्पभूधारक आदिवासी शेतकरी आहेत. ते डोंगरउतारावरील शेती पारंपरिक पद्धतीने करीत आलेले आहेत.
मात्र आता केंद्र सरकारच्या गटाने शेती करण्याच्या योजनेतून आर्थिक लाभ व मार्गदर्शन घेऊन यातील शेतकरी गटाने शेती करू लागले आहेत. शेतकरी या गटाच्या माध्यमातून खत विक्री, धान्य व आमचूर खरेदीचाही व्यवसाय करू लागले आहेत.
यातूनही त्यांना चांगला पैसा मिळू लागला आहे. सोबतच दुर्गम भागात होणाऱ्या देशी तूरडाळ, भगर, तांदूळ यांसारख्या अनेक पिकांचे उत्पादन घेऊन या गटातील पुरुष व महिला शेतकरी एकत्रितपणे स्वतःच या धान्यांवर विविध प्रक्रिया व त्यांची व्यवस्थित पॅकिंग करून सरळ ग्राहकांना त्याची विक्री करू लागले आहेत.
या भागात आंब्यांची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. शेतकरी थेट आंबे न विकता स्वतः व महिला बचतगटाच्या महिलांसोबत त्याची आमचूर व आमचूर पावडरही बनवू लागले आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्याचबरोबर सीताफळाचीही आता उघड्यावर विक्री न करता त्याची बॉक्समध्ये व्यवस्थित पॅकिंग करून विक्री करू लागल्याने सीताफळाचीही मागणी वाढून त्यांना चांगला पैसा पदरी पडू लागला आहे.
सातपुड्याच्या जंगलात बांबूची झाडे मुबलक आहेत. या कंपनीतील महिला व पुरुष बांबूपासून विविध संसारोपयोगी वस्तू बनवू लागले आहेत. त्यात रंगीत टोपल्या, खराटे आदींचा समावेश आहे.
आमचूर बनवणे व धान्यांवर प्रक्रिया व पॅकिंगचे कार्य कंपनीतील सर्व महिला शेतकरी बचतगटाच्या महिलांच्या माध्यमाने करीत असल्याने महिलांच्या हातालाही काम मिळाले आहे. व्यापाऱ्यांची मध्यस्थी नाहीशी झाल्याने त्यांना जास्त नफा मिळू लागला आहे.
डीएससी संस्थेच्या माध्यमातून बेंगळुरू येथे आयोजित आंतरराष्ट्रीय भरडधान्य प्रदर्शनामध्ये या शेतकरी कंपनीने सहभाग नोंदविला आहे, तर अहमदाबाद (गुजरात) येथे नाबार्डच्या माध्यमातून आयोजित सहयोगी मेलामध्ये कंपनी सहभागी झाली व त्यात नावीन्यपूर्ण व कमी रासायनिक वस्तूच्या श्रेणीमध्ये कंपनीला तृतीय पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
"माझ्यासारख्या दुर्गम भागातील शेतकऱ्याचा स्वातंत्र्यदिनी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार होणार आहे याचा मला खूप आनंद होत आहे. हा माझा सत्कार नव्हे तर तो दुर्गम भागातील सर्व आदिवासी शेतकऱ्यांचा आहे. यातून जिल्ह्यातील इतर शेतकरीही प्रेरणा घेणार आहेत." -लसिंग वन्या वळवी, संचालक, आमु आखा एक से शेतकरी उत्पादक कंपनी, काकडदा
"सेंट्रल सेक्टर स्कीम या योजनेतील कंपन्यांसाठी नाबार्डमार्फत शेतकरी उत्पादक कंपनी व नेमलेल्या संस्थेला पाच वर्षांसाठी प्रशिक्षण, क्षमताबांधणी, व्यवसाय विकास यासाठी आर्थिक सहकार्य करण्यात येत आहे. नाबार्डमार्फत आमचूर या उत्पादनाला भौगोलिक मानांकन (जीआय) मिळविण्यासाठीदेखील प्रयत्न केले जात आहेत. ज्यात आमु आखा एक से कंपनी ला ‘नंदुरबार आमचूर’ या जीआय उत्पादनासाठी आवेदक म्हणून निवडण्यात आले आहे."
-प्रमोद पाटील, सहाय्यक महाप्रबंधक, नाबार्ड
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.