नंदुरबार जिल्ह्यातील कारखानदार शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. मागील वर्षी जाहीर केलेल्या उसाच्या दरापेक्षा प्रतिटन ५० रुपये कमी दिला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खानदेश विभागीय अध्यक्ष घनश्याम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता. ८) सकाळी प्रकाशा (ता. शहादा) गावाजवळ रस्त्यावर उसाची भरलेली वाहने अडवून जोपर्यंत कारखानदार उसाला दोन हजार ९०० रुपये प्रतिटन भाव जाहीर करत नाहीत तोपर्यंत साखर कारखान्यांकडे उसाची भरलेली वाहने जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. (farmers Association protest for sugarcane price hike in prakasha nandurbar news)
रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेकडो उसाच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे बुधवारपासून ऊसतोड बंद आणि वाहतूक बंद आंदोलनाला सुरवात झाली असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्रप्रमुख घनश्याम चौधरी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी रस्त्यावर उतरले.
गेल्या वर्षी जिल्ह्यातील कारखानदारांनी सुरवातीला दोन हजार ३५० रुपये प्रतिटन व नंतर १५० रुपये प्रतिटन असा एकूण दोन हजार ५०० रुपये टनाप्रमाणे दर दिला. या वर्षी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांची दिशाभूल करून गेल्या वर्षीपेक्षा उसाला प्रतिटन ५० रुपये कमी दर दिला जात आहे.
शेतकऱ्यांवर हा अन्याय असून, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान केले जात आहे. उसाच्या पिकासाठी लागणारी मशागत, बियाणे, वीज व पाणीप्रश्न बघता आर्थिकदृष्ट्या मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे प्रकाशा गावाजवळ उसाने भरलेली वाहने अडविण्यात आली.
जोपर्यंत उसाला दोन हजार ९०० रुपये प्रतिटन भाव मिळत नाही किंवा जाहीर केला जात नाही तोपर्यंत कोणत्याही कारखान्यापर्यंत उसाने भरलेली वाहने पोचू देणार नाही, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे घनश्याम चौधरी यांनी घेतली होती.
या वेळी शहादा पोलिसांनी घनश्याम चौधरी यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन शहादा पोलिस ठाण्यात आणले व रहदारी मोकळी केली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. उशिरापर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पोलिस ठाण्यात होते.
''उसाला भाव जाहीर करावा यासाठी आम्ही संघटनेसोबत रस्त्यावर आलो. सोयाबीन, कापसाला भाव नाही. उसालाही कमी दर मिळत आहे. खताचे दर वाढले तसेच इतर खर्चही वाढल्याने सध्याचा ऊसदर परवडत नाही. कारखान्यांनी कारखाना सुरू होण्याअगोदर उसाचा दर जाहीर करावा.''-अंबालाल पाटील, ऊस उत्पादक शेतकरी, प्रकाशा
''शेतकऱ्यांचा उसाला दोन हजार ९०० रुपये प्रतिटन भाव मिळाला पाहिजे. कारखान्याला उसापासून अनेक प्रकारचे उपउत्पादन मिळते. शेतकऱ्याला दोन पैसे कारखानदाराने दिले तर शेतकऱ्याचे जीवनमान उंचावेल. उत्पादित मालाला खर्च मोठ्या प्रमाणावर लागत आहे. अनेक अडचणींच्या सामना करत उत्पादन घेतले जाते.
येणाऱ्या काळात योग्य दर न मिळाल्यास जिल्ह्यातील ऊस वाहतुकीची शंभर टक्के वाहने थांबविले जातील. दोन दोन महिने दर जाहीर करायचे नाही ही जिल्ह्यातील कारखान्यांची परंपरा आहे मोडीत काढण्यासाठी संघटना शेवटपर्यंत लढा देईल.''-घनश्याम चौधरी, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.